मनोगत पान ९

आरोग्यदायी राहण्यासाठी आयुर्वेदच लाभदायक

दि. १ मे २०१४ – आयुर्वेद हाच माणसाचा आयुष्याचा मूलाधार आणि तारणहार आहे. बदलत्या जीवनशैलीतील हा मूलाधार गमावला तर भविष्यातील वाटचाल भयावह आहे. मानवी जीवनशैली आयुर्वेदापासून दूर चालल्याने आरोग्याच्या समस्या गंभीर झाल्या आहेत.

ज्ञानावर आधारित आयुर्वेदाचा आधार घेतल्याशिवाय जीवन सुखकर होणार नाही. जगात बदलाची गती प्रचंड असून वातावरणाचा परिणाम होण्यापर्यंत हे बदल होत आहेत. प्रत्येक क्षेत्र, यंत्रे उत्क्रांत होत असताना माणसातील उत्क्रांतशक्ती मात्र घटत चालली आहे. या बदलाचा मानवावर मोठा दुष्परिणाम होत आहे. हा दुष्परिणाम मर्यादित ठेवण्याकरिता आयुर्वेद आपल्याला उपयोग ठरेल.

आपल्या दैनंदिन जीवनात दूध आणि मधाचा वापर वाढविला पाहिजे. गहू, तांदळासह विविध कडधान्यांचा वापर देखील वाढविला पाहिजे. गहू-तांदळासह विविध कडधान्यांचा वापरही समतोल प्रमाणात करावा. फिरणे, चालणे, सूर्यनमस्कार आवश्यक करावे.

बालाजी तांबे


शेतमालाच्या दरासाठी ठोस यंत्रणा हवी

दि. ७ मे २०१४ – आपल्या देश कृषिप्रधान समजला जातो. शेती व्यवसाय हा मुख्य मानला जातो. परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर ठरविण्यासाठी देशात अजूनही ठोस यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्यांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय वाटत नाही.

केंद्राच्या समितीचा हमीभाव जाहीर करण्याची पद्धत चुकीची असून उत्पादन खर्चही भरून निघत नाही. शेतमालाचे भाव वाढले की सर्वत्र आरडओरड सुरू होते. मात्र चित्रपट किंवा लक्झरी सुविधांचे भाव वाढले की मात्र कोठेही ओरड होत नाही. परंतु कांदा ४० रूपये किलो झाला की ग्राहकांपासून सर्वत्र ठिकाणी ओरड सुरू होते.

शेतमालाचा भाव निश्चित करण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन केली असली तरी तिला फारसे अधिकार नाहीत. कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची समिती देखील केवळ तांत्रिक मुद्यांवर चर्चा करते.

सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे शेतमालाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. शेतीला उशिरा सुरूवात करावी लागते तर अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान होते.

पाशा पटेल


नव्या पिढीने छत्रपती शिवराय व झाशीची राणी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.

दि. ९ मे २०१४ – आजच्या काळात १६ वर्षांची मुले-मुली काय करतात आपल्याला माहिती आहे. त्यांच्यावर सुसंस्कार झाले तर ते अभ्यास करतात. परंतु अनेक जण मोबाईलवर टाईमपास करीत आपल्या जीवनातील अमूल्य वेळ वाया घालवितात याचा पालक आणि नव्या पिढीने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वयाच्या १६व्या वर्षी छत्रपती शिवरायांना गड-किल्ले घेऊन स्वराज्‍य स्थापनेचे वेध लागले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुलांनी वागावे. रणमर्द झाशीची राणी हिने रणांगणात शौर्य गाजवत इंग्रजांशी लढा दिला होता. मुलींनी शूरपणा अंगी बाळगावा. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाबाई, बहिणाबाई चौधरी असे कितीतरी आदर्श मुलींसमोर आहेत.

वयाच्या १६व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून सृष्टीला ईश्वरी मार्ग सोपा करून सांगितले. अनेक संत, कवी, शाहीर यांनी समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले. त्यांची आठवण ठेवण्याची गरज आहे.

देवानंद माळी (शाहीर)


जीवनात संधी ओळखून यशस्वी व्हावे

दि. १० मे २०१४ – प्रत्येकांच्या जीवनात संधी खूपच कमी येतात. आलेली संधी वेळीच ओळखून तिचे चीज करण्याचे सामर्थ्य आजच्या तरुणाईत यायला हवे. यासाठी महापुरूषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची गरज आहे.

आजच्या तरूणांनी सामाजिक जीवनात सदसद्‌विवेक बुद्धीला स्मरून आचरण करावे. आज देशासमोर दहशतवाद, नक्षलवाद, अंमली द्रव्यांची तस्करी, मूलतत्त्ववाद, आदिंची आव्हाने आहेत. आजचा तरूण या दुष्टचक्रात सापडू शकतो. आयुष्यात चांगले – वाईट क्षण येत असतात. त्यांचा बारकाईने अभ्यास करून वेळीच उपाय योजना केल्यास यश तुमच्या हाती असते.

समाजाची बदलती मानसिकता देशहिताच्या दृष्टीने घातक आहे. तरूणांना चंगळवादी जीवनशैलीची पडलेली भुरळ ही देशहितासाठी योग्य नाही. इंटरनेट सोशल साईटमुळे जितकी जगजागृती झाली त्यापेक्षा दुप्पट वेगाने कुटुंब व ज्येष्ठांशी संवाद संपून युवा पिढीमध्ये विकृती निर्माण होत आहे. त्यातून गुन्हेगारी वाढीस लागते.

विश्वास नांगरे पाटील


भावी पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज

दि. १७ मे २०१४ – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा देवधर्माला विरोध नसून ज्या ठिकाणी देवधर्माच्या नावावर शोषण होते त्याला विरोध करण्याचे काम करते. अंनिसची भूमिका जागत्याची आहे.

राज्यात जादुटोणा विरोधी कायदा व्हावा म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुमारे २० वर्षे लढा दिला. देशात खऱ्या अर्थाने मानवतावादी धर्मचळवळ रूजविणे गरजेचे आहे.

अंनिसचे प्रवर्तक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर राज्यातील शेकडो शाखांमधून हजारो कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलनाचा हा विवेकाचा वारसा चालवत आहेत. रक्ताने चालतो तो वारसा, विचाराने चालतो तो वसा.

देशात धर्माच्या नावाने काही शक्ती एकत्र येत असून दुसऱ्या बाजूला भ्रष्ट राज्यव्यवस्था अशा कोंडीत सर्वसामान्य सापडला आहे. सॉक्रेटिस, गॅलिलिओ यांच्यासारख्या सामाजिक वसा पुढे चालविणाऱ्यांची कुचेष्टा करून त्यांना संपविण्यात आले.

आपल्याकडेही गौतम बुद्धांपासून ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या सारख्यांना दुर्लक्षित करून संपविण्याची परंपरा असून समाजाने त्यांचा मान ठेवण्याची गरज आहे.

हमीद दाभोळकर


शास्त्रीय संगीताचे संस्कार कीर्तन परंपरेतून आले

दि. २० मे २०१४ – महाराष्ट्रात अभिजात तथा शास्त्रीय संगीताचे संस्कार खऱ्या अर्थाने कीर्तन परंपरेतून आले आहेत. भारतीय संगीताला भरभक्कम शास्त्रीय चौकट असून त्यातून अनुकरण नाही तर संस्कार ग्रहण करण्याची गरज आहे.

हजारो वर्षांचा कालखंड लोटला सांस्कृतिक, ऐतिहासिक परिवर्तनाच्या लाटाही या देशावर आदळल्या. मात्र भारतीय संगीताचा डौल आजही कायम आहे. भारतीय अभिजात संगीताच्या या चिरंतन वाटचालीला गुरू – शिष्य परंपरेचा अमृतस्पर्श आहे.

आधुनिकीकरणाच्या तरंगावर वाहून जाण्याइतके भारतीय संगीत तकलादू नाही. संस्कृतीचे रक्षण करण्याचा ध्यास घेऊन त्यासाठी जीवनाचे समर्पण करणाऱ्या साधकांची परंपरा भारतीय संगीताला लाभली आहे.

सुरेश तळवलकर


अंध व्यक्तींना सहानुभूती नको, प्रोत्साहनाची गरज

दि. २६ मे २०१४ – अंध व्यक्तींनी स्वत:ला कमजोर समजू नये. तसेच अंध व्यक्तींना डोळसांची सहानुभूती नसावी तर त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

शारीरिक व्यंग असले तरी त्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. अंध असले तरी मनाने अंध असता कामा नये. मला लहानपणापासून जगावेगळे करण्याची इच्छा होती. अंध असून त्यातून मी मित्रांसमवेत गोंदिया ते वैष्णवदेवी पर्यंत सुमारे ५६०० कि.मी. असा सायकलवर प्रवास केला. या प्रवासाची नंतर लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंद झाली. या प्रवासाने जगण्याची दिशा मिळाली.

महाबळेश्वर येथे हातगाडीवर मेणबत्ती विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यातून मेणबत्ती व्यवसायाचे उद्योगात रूपांतर झाले. सध्या आम्ही ९७०० प्रकारच्या डिझाईनच्या मेणबत्त्या बनवितो. ‘रिलायन्स उत्कृष्ट अंध उद्‌योजक’ म्‍हणून पुरस्कार मिळाला आहे.

भावेश भाटिया


पर्यावरण समतोलासाठी वन्य प्राण्यांचे रक्षण

दि. २७ मे २०१४ – वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी नैसर्गिक वातावरण समतोल ठेवणे गरजेचे आहे. मनुष्य प्रत्येकाला ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. मात्र पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यप्राण्यांचे रक्षण आवश्यक आहे.

शहरात वन्यप्राणी येण्याचे कारण म्हणजे मानवाने त्यांच्या जंगलावर अतिक्रमण केले आहे. वन्य प्राण्यांचे संरक्षण केले नाही तर भावी पिढीला केवळ छायाचित्रांच्या माध्यमातून वन्यजीव पाहायला मिळतील.

प्राणिसंग्रहालयामध्ये वन्य जीवांचे संरक्षणाचे काम होत असते. प्राणी संग्रहालयात वन्य जीवांना ठेवताना नैसर्गिक वातावरणनिर्मिती केली जाते. त्यामुळे वन्यजीवांची संख्या वाढल्यानंतर त्यांना जंगलात सोडणे सहज शक्य होते. अहमदाबाद येथील प्राणिसंग्रहालयात भारतातील सर्वोत्कृष्ट साप घर बनविण्यात आले असून फुलपाखरू उद्यानही बनविण्यात आले आहे.

आर.के.साहू


आर्थिक, सामाजिक विषमता हाच लोकशाहीला खरा धोका

दि. ३० मे २०१४ – संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये जनता ही सार्वभौम असते. परंतु सामाजिक आर्थिक विषमता हाच भारतीय लोकशाहीला खरा धोका आहे. आपल्या देशात विषमता फोफावत चालली असून देशातील ३० टक्के लोक प्रचंड श्रीमंत आहेत. उद्योगपती आहेत. त्यांच्याकडे एकूण संपत्तीच्या ८० टक्के संपत्ती आहे. तेच आपल्या देशाचा पंतप्रधान कोण होणार हे ठरवतात.

सूडाचे राजकारण हे लोकशाहीसाठी घातक आहे. राजकारणात अनेक स्थित्यंतरे होत असल्याने लोकांनी त्याचा तटस्थपणे विचार करण्याची गरज आहे. सत्तेचा वापर लोकांच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. भारतात सार्वभौम जनता हीच सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे लोकांना आपले अधिकार समजले पाहिजेत.

डॉ. भालचंद्र मुणगेकर


मन प्रसन्न असेल तर जग सुंदर दिसते

दि. ३१ मे २०१४ – मन प्रसन्न असेल तर जग सुंदर दिसते. मनाची प्रसन्नता टिकवून ठेवणे अपल्या हाती असते. ज्या गोष्टीने मन दु:खी होते त्याकडे दुर्लक्ष करणे आवश्यक ठरते. आनंदी जीवन जगताना दु:खाच्या प्रसंगाला महत्त्व देऊ नये. तसेच दु:खाच्या घटना घडल्यानंतर त्याविषयी चर्चा करण्यात अमूल्य वेळ वाया घालवू नये. जीवनातील दु:खाच्या प्रमाणात घट करण्यासाठी मनाला विशाल करा.

माणसाच्या मनातील अहंकारच आपल्याला दु:ख देतो. सुख पाहण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. जीवन जगताना दुसऱ्याला ओझे वाटणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या अस्तित्वाने दुसऱ्याला आनंद कसा मिळेल हे पाहणे महत्त्वाचे आहे. जीवनातील दु:खाच्या प्रमाणात घट करण्यासाठी मनाला विशाल करा.

ऋषी नित्यप्रज्ञाजी


खरा भारत हा खेड्यातच, त्‍याकडे लक्ष देण्याची गरज

दि. १ मे २०१६ – आपला भारत देश हा शहरात नव्‍हे तर खेड्यात वास करीत असून तेथेच अनेक प्रकारच्‍या गैरसोयी आहेत. त्‍याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भारतीय केवळ एक जीवनशैली किंवा धर्म नव्‍हे तर त एक चेतना आहे. आज माणुसकीचा लढा तीव्र झाला असून गंगा-यमुना अशा मोठ्या नद्या रूपाने जणू काही भारतमाताच रडत आहे.

भारतीय संस्‍कृतीची हजारो वर्षांची परंपरा आहे. भारत समजून घेण्यासाठी ग्रामीण भागाकडे जावे कारण खरी भारतमाता ही खेड्यातच आहे.

भारतीयत्‍व म्‍हणजे फुलांनी फुलवलेले उद्यान आहे. समान चालणारा, बोलणारा, वागणारा एकसारखा समाज हे भारतीयत्‍व नव्‍हे. माझे कुटुंब मूळ अफगाणिस्‍ताना-मधील आपले पूर्वज फाळणीनंतर भारतात आले त्‍यामुळे माझे भारतीयत्‍व वाघा बॉर्डरपासून सुरू होऊन बंगालच्‍या सीमेवर संपत नाही. जाती-धर्म हा नवा देश बनवण्याचा आधार होऊ शकत नाही. भारतीयत्‍व ही व्‍यापक संकल्‍पना आहे.

विनोद दुआ


भारत – पाक मैत्रीची गरज पण मानसिकता नाही

दि. २ मे २०१६ – भारत-पाकिस्‍तान या दोन्‍ही राष्ट्रामध्ये मैत्री होण्याची गरज आहे परंतु मानसिकता दिसत नाही. त्‍यामुळे एकाही राजकीय पक्षाच्‍या जाहीरनाम्‍यात पाकशी मैत्रीचा उल्‍लेख नाही. भारताच्‍या पाकविषयी धोरणात सातत्‍याचा अभाव आहे.

आपण पाकविषयी दरवेळी तात्‍पुरती भूमिका घेता आणि एखादी घटना घडल्‍यावर ती बदलून टाकतो. दोन्‍ही परराष्ट्र सचिवांत चर्चा होणार होती. मात्र पठाणकोट हल्‍ल्‍यामुळे ती चर्चा होऊ शकली नाही.

पाकिस्‍तानमधील सामान्‍य माणसाचा विचार केला तर आजमितीला त्‍याला शांतता हवी आहे. त्‍यासाठी तो त्‍याच्‍या सरकारला साकडे घालतो आहे. युद्धाचे परिणाम वाईट आहेत ते आपण भोगतोच आहोत.

सध्या भारताकडे ८० तर पाकिस्‍तानकडे १०० अण्वस्‍त्रे आहेत. त्‍यांनी ठरविले तर पृथ्वी २००० वेळा नष्ट होईल इतकी ताकद त्‍या अस्‍त्रांमध्ये आहे. त्‍यामुळे मैत्रीचे संबंध असावेत.

जतीन देसाई


भारताचे तुकडे करण्याचा दहशतवाद्यांचा डाव

दि. ३ मे २०१६ – मनुष्यप्राणी जन्‍माला आला तेव्‍हा पासून दहशतवाद आहे. मात्र एकविसाव्‍या शतकातील आतंकवाद हा चिंतेचा विषय आहे. एखाद्या महत्त्‍वाच्‍या व्‍यक्‍तीला ठार मारा आणि हजारो व्‍यक्‍तींना दहशतीखाली आणा अशी दहशतवाद्यांची रणनीती आहे. त्‍यामुळेच ते महत्त्वाच्‍या व्य‍क्‍ती व स्‍थळावर हल्‍ले करतात.

सध्या जगात सुमारे ६८ राष्ट्रे ही दहशतवादाच्‍या छायेखाली आहेत. रोम, इस्रायल पाठोपाठ भारत हा दहशतवाद्यांचा सर्वांत मोठा शत्रू असून आपल्‍याला सावध राहण्याची गरज आहे.

अतिरेक्‍यांचे मुख्य टार्गेट युरोप, इस्रायल आणि भारत आहे. या देशाचे राष्ट्रीयत्‍व संपवा हेच प्रमुख धोरण राबविले जात आहे. त्‍यामुळे समाजाला जागरूक राहण्याची वेळ आली. यासाठी युवा वर्गावर मोठी जबाबदार येऊन पडली आहे.

डी. बी. शेकटकर


जाती, धर्मापेक्षा मनात राष्ट्रप्रेम रूजवण्याची गरज

दि. ७ मे २०१६ – प्रत्‍येक भारतीयाने जाती-धर्मापेक्षा मनात राष्ट्रप्रेम अधिक रूजविले तर या देशाची व्‍यवस्‍था आणि लोकशाही अधिक बळकट होईल. समाजाने आंधळेपण घेतलेले आहे. रस्‍त्‍यावर कचरा पडलेला असेल तर तो उचलायला आपल्‍याला महापालिका लागते. सरकारचेही तसेच आहे, मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होते.

जीवनावश्यक वस्‍तूंचा कांद्यात समावेश करणे दुर्दैवी गोष्ट आहे. शेतकऱ्यांच्‍या कष्टाला येथे थारा नाही. या देशातील नागरिक चमत्‍कारापुढे जास्‍त झुकत असल्‍याने देशाची समाजव्‍यवस्‍था दुबळी व संवेदनाहीन बनत चालली आहे.

सरकार, अधिकारी आणि नेत्‍यांना दोष देण्यापेक्षा प्रत्‍येक नागरिकाने आपण भारतीय आहोत याची जाणीव ठेवून जर आपले देशाविषयी असणारे कर्तव्‍य प्रामाणिकपणे पार पाडणे गरजेचे आहे.

तसेच सरकारनेही जनतेची काळजी घ्यावी, सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होतो. परंतु अपंग बांधवाला मात्र महिन्‍याला सहाशे रूपये मिळतात. इतक्‍या कमी पैशात त्‍याने कसे जगायचे?

आमदार बच्‍चू कडू


शेतकरी आत्‍महत्‍या रोखण्यासाठी सरकारला अपयश

दि. ११ मे २०१६ – छत्रपती शिवाजी महाराजांच्या कळातही दुष्काळ पडत होता, परंतु तेव्‍हा शेतकरी आत्‍महत्‍या करत नव्‍हते. आता मात्र दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्‍महत्‍या वाढतच आहेत. देशातील कोणतेही राज्‍य असो आत्‍महत्‍या होतच आहेत. आतापर्यंत देशात चार लाख शेतकऱ्यांनी आत्‍महत्‍या केल्‍या आहेत. शेतकरी आत्‍महत्‍या रोखण्यात सरकारला अपयश आले आहे.

स्‍वातंत्र्य मिळाले तेव्‍हा देशात ४० कोटी जनतेसाठी पुरेल इतकेही धान्‍य उत्‍पादन होत नव्‍हते. मात्र आज सव्‍वाशे कोटी लोकांना पुरून उरेल इतके धान्‍य बळीराजा पिकवतो. दुर्दैवाने त्‍याच्‍याकडे सन्‍मानाने बघितले जात नाही.

शेतकऱ्यांच्‍या आत्‍महत्‍यांना रोखण्यास राज्‍यकर्त्यांचे धोरण जबाबदार आहे. आजवर बळीचे राज्‍य कधी आलेच नाही. शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांवर आत्‍महत्‍येची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना योग्य न्‍याय मिळण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना केंद्र स्‍थानी ठेवून योजना राबविल्‍या पाहिजेत.

सदाभाऊ खोत


महिलांनी सहन करण्यापेक्षा आपल्‍या दु:खाला वाचा फोडावी

दि. १२ मे २०१६ – आजच्‍या काळात केवळ मुस्‍लीमच नव्‍हे तर सर्वच समाजातील महिलांना कौटुंबिक, लैंगिक व शारीरिक हिंसेला सामोरे जावे लागत आहे. खरेतर महिलांकडे समानतेच्‍या दृष्टीने बघणे आवश्यक आहे. मात्र ते घडून येत नाही. त्‍यामुळे महिलांना आपले दु:ख, त्रास, कष्ट सहन करण्यापेक्षा त्‍याला वाचा फोडण्याची गरज आहे.

आजही रूढी, परंपरा, धर्माच्‍या नावाखाली महिलांवर अनेक वेळा अन्‍याय, अत्‍याचार होतात. स्‍त्री – पुरूष भेदभाव करण्यापेक्षा दोन्‍हींचा समतोल साधणारे धोरण स्‍वीकारणे गरजेचे आहे.

इस्‍लाम धर्मात सांगितलेल्या बाबींचा चुकीचा अर्थ लावून महिलांना तलाक देण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या दर तीन घरांमागे एक महिला तलाकपीडित आहे. एकूणच समाजातील पुरूषप्रधान संस्‍कृतीला आव्‍हान देऊन महिलांना समानतेचा अधिकार देण्याची गरज आहे. महिलांनी अन्‍याय विरोधात गंभीरपणे उभे राहिले पाहिजे.

रूबिना पटेल


छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य प्रेरणादायी

दि. १४ मे २०१६ – छत्रपती संभाजी महाराज यांचा औरंगजेबाने प्रचंड छळ केला. त्‍यांच्या हत्‍येने मराठी मन पेटून उठले. त्‍यानंतर मराठा सैन्‍याने औरंगजेबाला पळताभुई थोडी केली. छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य अत्‍यंत प्रेरणादायी आहे.

जीवन जगल्‍यानंतर सर्वजण मातीत मिसळतात पण मातीसाठी जगणारे कमी असतात. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपले संपूर्ण जीवन महाराष्ट्राच्‍या मातीसाठी वेचले. वडूबुद्रूकच्‍या जंगलात वयाच्‍या ३२व्‍या वर्षी त्‍यांनी धीरोदात्तपणे मृत्‍यूला कवटाळले. त्‍या संभाजी महाराजांचे चारित्र्य संपूर्ण जगासाठी दीपस्‍तंभासमान आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्‍यूनंतर अनेक संकटे येऊनही छत्रपती संभाजी महाराज डगमगले नाहीत. आपले अवघे आयुष्य संघर्षात घालविले. त्‍यांच्याबद्दल असलेले अनेक गैरसमज आज इतिहासकारांनी व संशोधकांनी खोटे असल्‍याचे सिद्ध केले आहे.

प्रशांत देशमुख


विवेकवादी आचार-विचारातूनच निकोप समाजनिर्मिती शक्‍य

दि. १९ मे २०१६ – महाराष्ट्रासह आपल्‍या भारत देशाला विवेकवादीची मोठी परंपरा लाभली आहे. मात्र अलीकडच्‍या काही शतकात ही परंपरा लोप पावत चालली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी विजयासाठी नव्‍हे तर विवेकी विचारांच्या प्रसारासाठी कार्य केले. त्‍यांच्यावर गोळ्या झाडल्‍या गेल्‍या तरी विवेक प्रसाराचे कार्य थांबलेले नाही. विवेकवादी कृत्‍य व विचार हेच बंदुकीच्‍या गोळ्यांना समर्पक उत्तर आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा फुले यांनी विवेकवादाचा विचार रूजवला. त्‍याची जोपासना करण्याचे काम अंनिसद्वारे सुरू आहे. समाज म्‍हणून आपण विज्ञानाची सृष्टी अंगीकारली परंतु विज्ञानाची दृष्टी आत्‍मसात केली नाही.

विवेकवादी विचारांची जाणीव प्रत्‍येकात निर्माण करायला हवी. त्‍यातूनच खऱ्या अर्थाने वैज्ञानिक क्रांती घडेल. वैज्ञानिकता हाच विवेकाचा विचार असल्‍याचा प्रचार व प्रसार प्रत्‍येक सामान्‍य व्‍यक्‍तीपर्यंत पोहचण्याची गरज आहे. त्‍यादृष्टीने वाटचाल सुरू असून यात सर्व घटकातील कार्यकर्त्यांचा सहभाग वाढायला हवा.

मुक्‍ता दाभोळकर


आई-वडील हेच मुलांचे खरे विद्यापीठ असते

दि. २२ मे २०१६ – मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्‍या शाळा व क्‍लासला पाठवले जाते. शाळेत जरूर पाठवा, परंतु घरातील शाळा बंद करू नका. कारण आई-वडील हे मुलांसाठी विद्यापीठ असते. मुलांना धनदौलत, मालमत्ता, इस्‍टेट वगैरे काही दिले नाही तरी चालेल पण त्‍यांना संस्‍काराचा वारसा मात्र आवर्जून द्या. कारण तीच जीवनातील सर्वांत मोठी गोष्ट असते.

आपण कोण आहोत आणि या जगात का आलो आहोत याचा तुम्‍ही कधी विचार केला ? मी या जगात आलो की आणला गेलो ? जर आणला गेलो असेन तर त्‍यामागे काही उद्देश असेल. हा उद्देश शोधण्याची गरज आहे. तुम्‍ही डोळे बंद करून स्‍वत:च्‍या अंतरंगात डोकावून पाहा आणि स्‍वत:ला प्रश्न विचारा तेव्‍हा तुम्‍हाला अनेकविध भावना, माणसे, घटना जाणवतील.

आजच्‍या काळात वाढदिवसाला केक कापला जातो. मदर्सडे, फादर्सडे, फ्रेंडशिपडे हे दिवस साजरे केले जातात. पाश्चात्त्‍य देशात नाती मजबूत नसल्‍याने त्‍यांना ते करावे लागते. आपल्‍याकडे त्‍याची गरज नाही.

खासदार विजय दर्डा


स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर राजकीय हेतूने टीका

दि. २८ मे २०१६ – अंदमानच्‍या जेलमध्ये सर्वाधिक शिक्षा भोगणारे स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्रामध्ये कुठलाही माफीचा उल्‍लेख नाही. मात्र सावरकरांच्या सुटकेबाबत विरोधकांनी अपप्रचार मोठ्या प्रमाणावर केला. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानातील सुटकेनंतर त्‍यांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला त्‍यामुळे काँग्रेस पक्षातून सावरकरांना विरोध सुरू झाला.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्‍व हे सर्वसमावेशक होते. परंतु त्‍यांच्या या विचारांचा सोयीस्‍कर अर्थ त्‍यांच्या विरोधकांनी लावून त्‍यांना बदनाम केले. सावरकरांचे अष्टपैलू व्‍यक्‍तिमत्त्व होते. तसेच ते जातीपातीला मानत नव्‍हते. अस्‍पृश्यता व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला त्‍यांचा नेहमीच पाठिंबा होता.

रणजित सावरकर


जनतेचे प्रबोधन करणे हा भारूडाचा उद्देश

दि. ३१ मे २०१६ – संत एकनाथ महाराजांनी भारुडाची परंपरा महाराष्ट्रात रूजवली. त्‍याकाळात परकीय आक्रमण आणि शत्रूपासून जनतेचे संरक्षण करण्यासाठी भारूडाचा उपयोग होत असे. भारूड कला कालौघात लोप पावत असून त्‍याचे जतन करण्याची गरज आहे.

भारुडातून भारतीय संस्‍कृतीचे दर्शन घडते. तुळशीची पूजा करणे वैज्ञानिकदृष्टया महत्त्‍वाचे ठरते. भरकटलेल्या तरूणांना जागेवर आणण्यासाठी अध्यात्‍माशिवाय पर्याय नाही. देशातील अनेक प्रश्नांना भारुडातून वाचा फोडता येते. आपल्‍या देशाला एक संस्‍कृती आहे ती जोपासण्याची गरज आहे. सध्या मोबाईलमुळे माणूस विवेकाने पांगळा आणि बुद्धीने आंधळा झाला आहे.

शाहीर निरंजन भाकरे