दि. ४ मे २००२ – भारतात एकत्र राहताना एकमेकांचे धर्म समजून घेतले पाहिजेत. हिंदूंनी मुस्लीम धर्मातील कुराणाचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे एकमेकांच्या धर्माबद्दल चर्चा घडवून येऊन सुधारणेला वाव मिळतो.
इस्लाम धर्माची शिकवण अत्यंत सोपी आहे. प्रेषित महंमद पैगंबर यांनी अल्लाचा संदेश मुस्लीम बांधवांना अत्यंत सोप्या भाषेत सांगितला. महमंद पैगंबर यांनी सर्वप्रथम बंधुतेची भावना याविषयीची शिकवण सर्वांना दिली.
वर्षानुवर्ष आपण एकत्र राहतो तेव्हा एकमेकांचा धर्म काय आहे हे समजून घेतले पाहिजे. कुणीही मुस्लीम धर्माची व्यवस्थित मराठी भाषेत अभ्यासपूर्ण मांडणी केलेली नाही. त्यामुळे असा प्रयत्न मी केला असून अन्य लोकांनी असा प्रयत्न केल्यास आपल्या ज्ञानात भर पडेल.
प्रा. शेषराव मोरे
दि. ६ मे २००२ – भारतातील ऐतिहासिक नाणे हा सांस्कृतिक वारसा असून तो जपण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकाने करावा. भारतात नाण्यांची सुरुवात इ.स. पूर्व ६०० मध्ये झाली तरीही त्याकाळात वस्तुविनिमय पद्धत प्रचलित होती. त्यानंतर प्रत्येक राज्यसत्तेच्या काळात नाण्यांचा आकार, धातू आणि स्वरूप बदलत गेले.
ऐतिहासिक काळातील राजसत्तांचा अभ्यास करण्यासाठी नाणेशास्त्राचा प्रमुख साधन म्हणून उपयोग होत असे. कुशाण सम्राटाने सर्वप्रथम सोन्याचे नाणे काढले.
नाण्यावरून त्या त्या राज्यातील पोशाख पद्धती, आर्थिक स्थिती, सत्तेचे केंद्र आणि विस्तार, राहणीमान आदिंचा अभ्यास करता येतो. सातवाहन राज्याच्या काळात सोने, चांदी, तांबे आदि धातूंची नाणी होती. नाणे शास्त्र हे इतिहासाचे प्रमुख साधन आहे.
दिलीप बळसेकर
दि. १३ मे २००२ – आरोग्य संपन्न आणि दीर्घायुषी-शतायुषी होण्यासाठी योग्य आहार-विहार, व्यायाम आवश्यक आहे. तसेच जगात शाकाहार हा उत्तम आहार आहे. आयुर्वेद हा माणसाला चांगले जगायला शिकवतो.
पृथ्वीवरील सर्वांत चांगले आणि आठ अंगांनी परिपूर्ण असे शास्त्र म्हणजे आयुर्वेद होय. योगासने व्यायाम, दिनचर्या, ऋतुचर्या, आहार-विहार याचे योग्य वेळापत्रक पाळल्यास माणसाला कोणताही आजार होणार नाही. निसर्ग माणसाला चांगले जगायला शिकवतो.
सकाळी लवकर उठावे, दुपारी योग्य जेवण घ्यावे, रात्री कमी व हलका आहार असावा, गाईचे दूध, तूप, पालेभाज्या, ताक, उसळी, फळे, सुकामेवा असा आहार घ्यावा. आयुर्वेदाचा अंगीकार केल्यास कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही.
विनायकराव खडिवाले
दि. २१ मे २००२ – देशातील सत्तर टक्के समाज खेड्यापाड्यातून पसरलेला आहे. अद्यापही या समाजापर्यंत बालशिक्षण पोहाचलेले नाही, ही वस्तुस्थिती सुजाण माणसाला अस्वस्थ करणारी आहे. ग्रामीण भागातील जनतेला सुशिक्षित आणि आत्मनिर्भर केल्याशिवाय देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार नाही.
शहरामध्ये पिढ्यान्पिढ्या शिक्षणाचे वातावरण आहे. म्हणून शिक्षणाचे महत्त्व आपल्याला कुणी समजावून सांगावे लागत नाही. परंतु अद्यापही ग्रामीण भागात, दुर्गम आदिवासी भागात खेड्यापाड्यात आणि वाड्यावस्त्यात बालशिक्षण पुरेशा प्रमाणात पोहचलेले नाही.
मुंबई-पुणे शहरात बालवाडीत प्रवेश घेण्यासाठी हजारो-लाखो रूपये डोनेशन (देणगी) द्यावे लागते. खेड्यात मात्र बालवर्गाला शिकविण्यासाठी शिक्षिका मिळत नाही. बालशिक्षणाच्या मदतीसाठी समाजाने पुढे यावे.
निर्मला पुरंदरे
दि. २८ मे २००२ – गुंतवणूकदारांच्या तक्रारी या स्थल, काल आणि व्यक्तिसापेक्ष असतात. कालानुरूप गुंतवणूकदारांच्या तक्रारी कमी झाल्या आहेत.
गुंतवणूक क्षेत्रातील कोणत्याही अडचणीवर तत्काळ उपाय काढला जात नाही. शेअर बाजार घोटाळा प्रकरण बरेच गुंतागुंतीचे होते. देशभरात अर्थविषयक अनेक घोटाळा प्रकरणे उघडकीस येत असतात. परंतु काही काळानंतर पुन्हा विस्मृतीत जातात.
कोणत्याही घोटाळा प्रकरणाचा फटका प्रथम सर्वसामान्य नागरिकांना बसतो. त्यानंतर कायद्याची उपाय योजना केली जाते. सन १९८८ नंतर गुंतवणूक क्षेत्रात प्रचंड बदल झाले आहेत.
गुंतवणूक क्षेत्रात फायदा असतो तसाच धोकाही असतो. एखाद्या बँकेत घोटाळा झाला म्हणजे सर्वच बँक तशा नसतात.
चंद्रशेखर टिळक
दि. २९ मे २००२ – चित्रपट पाहणे हा मराठी माणसाचा आवडता छंद आहे. हिंदी आणि मराठी असे दोन्ही भाषेतील चित्रपट मराठी माणसाला आवडतात. चित्रपट सृष्टीत ४० वर्षांत म्हणजे १९४० ते १९८० या दरम्यान मला भेटलेली, मी पाहिलेली आणि मला आवडलेली माणसे लाख मोलाची होती.
भालजी पेंढारकर यांच्या ‘वाल्मीका’ चित्रपटात राजकपूर यांनी नारदाची भूमिका केली होती. त्याबद्दल भालजी यांनी राजकपूर यांना १९४५ मध्ये या भूमिकेबद्दल पाच हजार रूपये दिले होते. पृथ्वीराज कपूर यांनी ते पैसे परत करण्याचा प्रयत्न केला परंतु भालजींनी ते पैसे घेण्यास नकार दिला. त्याच पैशातून चेंबूर येथे पृथ्वीराज कपूर यांनी जागा घेऊन आर. के. स्टुडिओ स्थापन केला.
राजकपूर यांनी वृद्धापकाळात कोल्हापूरला भेट दिली होती. भालजींची भेट होऊ शकली नाही परंतु त्यांनी त्या जमिनीची माती कपाळाला लावली.
इसाक मुजावर
दि. ३१ मे २००२ – स्वर हे चिरंजीव तथा चिरंतन असून निसर्गाशी एकरूप करणारे आणि एकरूप पावणारे प्रभावी माध्यम असून सुरांनीच स्वरांनी माणूस जवळ येतो. कारण स्वर हे नैसर्गिक आहेत. परंतु शब्द हे माणसाला मोहून टाकतीलच असे नाहीत.
शब्द बोलण्यासाठी तर स्वर हे गायनासाठी वापरतात. स्वर हा मंगल, नितळ, निर्मळ असतो. त्यामुळे स्वरांनी संबंध ठेवताना मनुष्यानेही निर्मळ, नितळ, मंगल असले पाहिजे. अन्यथा त्या स्वराला विकृत स्वरूप येऊ शकते.
ख्याल हा आपल्या संस्कृत परंपरेत येत नाही म्हणून त्याचा शास्त्रीय संगीतात समावेश होऊ शकत नाही.
किशोरी अमोणकर
दि. ६ मे २००३ – कोणत्याही राष्ट्राचा भूतकाळ हा महत्त्वाचा असतो. त्यावरच वर्तमानकाळ अवलंबून असतो आणि त्यातूनच भविष्य घडत असते. महाभारतासारख्या ग्रंथातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते.
श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेतून पूर्णपणे आचारणात आणले. त्यामुळे महाभारताचा खरा नायक हा भीम होता. व्यासांनी लिहिलेल्या महाभारतात भीमाच्या पराक्रमात नावीन्यता आढळते. ती कृष्ण, अर्जुन, कर्ण यांच्या वर्णनात आढळत नाही. भीम हा कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला, बलवान, पराक्रमी, राजकारणी होता. त्याचप्रमाणे त्याचे सौंदर्यही वाखाणण्याजोगे होते.
आपल्या भारतीय संस्कृतीतील रामायण, महाभारत सारख्या ग्रंथांचा सर्वांनी सविस्तर अभ्यास करायला हवा.
डॉ. प. वि. वर्तक
दि. १० मे २००३ – अमेरिका आणि युरोपची अर्थव्यवस्था खनिज तेलावर अवलंबून असल्याने खनिज तेलावरील नियंत्रणासाठी इराक युद्ध झाले असून हे युद्ध झाल्याचा परिणाम भारत-पाक संबंधावर होतो.
लोकशाही व मानवीहक्क जपण्यासाठी हे युद्ध झाले असे सांगितले जात असले तरी खनिज तेलावर कब्जा मिळवण्यासाठी हे युद्ध लादले गेले. अमेरिका व युरोपीय देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था खनिज तेलावर अवलंबून आहे. जगाच्या एकूण साठ्यापैकी इराककडे २० टक्के खनिज तेलाचा साठा आहे. तर ५० टक्के साठे अरेबिया या देशांमध्ये अधिक प्रमाणात पसरलेले आहेत.
सन १९९१ च्या अमेरिका-इराक युद्धात साडेपाचहजार लोक मारले गेले होते. परंतु या युद्धात वित्तहानी सर्वाधिक झाली. त्यावेळी एकही मुस्लीम देश इराकच्या मदतीला धावला नाही.
कुमार केतकर
दि. ११ मे २००३ – समाजाने किंवा महिलांनी स्त्रीवादी भूमिका स्वीकारण्यापेक्षा स्त्रीसंवादी भूमिका स्वीकारल्यास विकास साध्य होईल. वादविवादाने कोणतीही चांगली गोष्ट किंवा हेतू साध्य होत नाही. याउलट संवाद केल्याने सुसंवाद निर्माण होतो.
स्त्रियांना अवतीभवती जे अनुभव येऊ लागले, ते त्यांना व्यक्त करावेसे वाटले ते मांडण्यासाठी स्त्री साहित्याची निर्मिती झाली. मात्र कालांतराने स्त्री जीवनाचे चित्रण चुकीच्या पद्धतीने केले जाऊ लागले. त्यातून पुढे स्त्री समीक्षिका, लेखिका पुढे आल्या.
महाराष्ट्र व पश्चिम बंगालने मोठ्या प्रमाणावर सामाजिक प्रगती केली आहे. स्त्रियांच्या विकासाच्या वाटचालीत पुरूषांचाही मोठा सहभाग आहे.
विजया राजाध्यक्ष
दि. १४ मे २००३ – निरोगी मन ठेवल्यास शरीरही निरोगी राहते. मनाचा शरीरावर परिणाम होत असल्याने मन उत्तम ठेवण्याची गरज असून उत्तम आरोग्य हाच फलदायी जीवनाचे स्तर आहे. आरोग्य मानवी जीवनाच्या प्रगतीचे अंग आहे. तसेच सामाजिक सुदृढतेचे, उच्चस्तरीय जीवनाचे ध्येय आहे.
शरीर आणि आहारशास्त्र हे महत्त्वाचे शास्त्र आहे. निरोगी मन शरीर निरोगी ठेवत असल्याने निरोगीपणासाठी उत्तम मनाच्या चांगल्या सवयी महत्त्वाच्या आहेत.
आरोग्य ही सुखाची गुरूकिल्ली असून निरोगी आरोग्याशिवाय आपण सुखाचे द्वार उघडूच शकणार नाही. निरोगी शरीर हे पवित्र मंदिरासारखे असते.
प्रकाश म्हात्रे

दि. १७ मे २००३ – अभिनय करताना त्या व्यक्तिरेखेला काय अपेक्षित आहे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच स्वत:चे अस्तित्व रंगमंचावर न टिकविता केवळ भूमिकेला न्याय देणे त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे ठरते.
चित्रपट व दूरदर्शन वाहिन्यांपेक्षा कलाकाराला नाटक अधिक आवडते. कारण त्यात केलेल्या कामाची पावती लगेच मिळते. तसेच चुकाही त्वरित लक्षात येतात.
मालिका आणि चित्रपटामुळे कलाकाराचा घराघरात प्रवेश होत असल्याने लोकप्रियता वाढते आणि उत्पन्न देखील वाढते. परंतु कलावंताने समाधान महत्त्वाचे मानले पाहिजे. पैसा व समाधान दोन्ही योग्य पद्धतीने देणारे माध्यम म्हणजे नाटक होय.
भरत जाधव
दि. १८ मे २००३ – विविध टिव्ही वाहिन्या आणि पाश्चात्त्य संस्कृतीच्या आक्रमणामुळे शाहिरीकला लोप पावत चालली आहे. परंतु अन्य कलांमधून केवळ मनोरंजन करण्यात येते. मात्र शाहिरीकलेमधून खऱ्या अर्थाने लोकप्रबोधन करण्यात येते. शाहिरांनी लोकप्रबोधन हा मुद्दा सोडलेला नाही.
शाहिरीला असलेला तीनशे वर्षांचा इतिहास हा आज नागरिक विसरत चालले आहेत. त्यामुळे आता ‘नवीन पोपट हा’ आणि ‘बुगू-बुगू वाजतंय’ या सारखेच गाणे गणेशोत्सवाच्या काळात वाजवले जाते.
शाहिरीकला आज लोप पावत चालली असली तरी ही कला जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
बालशाहीर शीला लोंढे
दि. २० मे २००३ – कोणतीही संस्कृती भाषेशिवाय टिकू शकत नाही. भाषा प्रवाही असेल तरच ती टिकेल. भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल. राजकारण, खेळ, सैन्यभरती अशा कितीतरी क्षेत्रात देशपातळीवर मराठी माणसाचे स्थान काय आणि किती आहे हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुंबई सारख्या महानगरामधून मराठी माणूस हद्दपार होत चालला आहे. सध्या मुंबईत मराठी माणसाचे प्रमाण केवळ २८ टक्के आहे.
भाषेत नवीन शब्द, कल्पना आल्या पाहिजेत, अन्यथा भाषा मरून जाईल. सर्व क्षेत्राचा आढावा घेतला तर मराठी माणूस देशात फार मागे आहे असे दिसून येते. देशाबरोबर राज्यातही मराठी माणूस मागे पडत आहे.
भरतकुमार राऊत
दि. १ मे २००४ – चित्रपटांमधील गीतांना चाली देण्यातून आनंद मिळाला. मात्र संगीत क्षेत्राला मी आणि माझे मोठे बंधू कल्याणजी यांनी कधीही व्यवसायाच्या भूमिकेतून पाहिले नाही. रसिकांमध्ये एवढे मानाचे स्थान मिळेल, असे देखील कधीही वाटले नाही.
कोणत्याही क्षेत्रात संघर्षाला पर्याय नाही. पण आम्हाला संघर्ष करावा लागला नाही. देवाच्या कृपेने सर्वकाही मनासारखे घडले. परंतु आजच्या काळात काळानुरूप संगीताची अभिरुची बदलली असून संगीताची कदर केली जात नाही.
गंमत म्हणून संगीत शिकलो अन् त्याचे रूपांतर व्यवसायात झाले. घरातील शिकवण, संस्कार चांगले होते. जे काम करायचे त्याच्याशी प्रामाणिक राहायचे अशी आई-वडिलांची शिकवण होती. पैशासाठी आम्ही संगीत विकले नाही. संगीतकाराच्या नशिबी उपेक्षाच येते परंतु पुढील काळात संगीतकाराला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे.
संगीतकार आनंदजी
दि. ३ मे २००४ – मुंबईतून मराठी माणूस आणि मराठी भाषा हळूहळू नामशेष होत आहे. यशवंतराव चव्हाण वगळता सर्वच मुख्यमंत्र्यांनी मुंबईशी कृतघ्नपणाची वर्तणूक केली. परप्रांतीय, राजकारणी नेते, उद्योजक आणि बिल्डर यांनी मुंबईचे अक्षरश: लचके तोडले असून आपलं ओरबाडणं सुरूच ठेवलं आहे.
मराठी माणसाने मुंबई वाचविण्यासाठी पुढाकार घेतला नाही तर मुंबईचे मराठीपण हे नावाला देखील शिल्लक उरणार नाही. मुंबईवर पहिला हक्क हा मराठी माणसाचा आहे. तुमच्या खिशात पैसे नसले तरी कुठल्याही परिस्थितीत तुम्ही मुंबईत राहू शकता हे मुंबईचे वैशिष्ट्य आहे.
दिवसेंदिवस मराठीची स्थिती बिघडत चालली आहे. मुंबईतील मराठी शाळा ओस पडत आहेत. दोन मराठी माणसेही एकमेकांशी मराठीत बोलत नाहीत. मुंबई आणि मराठीला वाचविणे हे प्रत्येक मराठी माणसाचे काम आहे.
राधाकृष्ण नार्वेकर
दि. ६ मे २००४ – आपल्या अवतीभवती देखील अनोखे जग आणि जिद्दीने जगणारी माणसे असतात. ती बघायला नजर हवी. मला अशाच भेटत गेलेल्या माणसाचं वेगळेपण, त्यांच्या जीवनाचा कोणालाही न उलगडलेला कप्पा मुलाखतींतून मांडत गेलो. त्यातही पुलंची शाब्दिक स्तुती तर आशाताईंची पाठीवर पडलेली थाप हे जीवनातील सर्वोत्तम क्षण वाटतात.
मला भेटलेल्या माणसांपैकी आशा भोसले यांच्यात सर्वोत्तम माणूसपण दिसले, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे हे सर्वोत्तम विनोदीवीर तर दादा कोंडके, शरद तळवलकर हे सर्वोत्कृष्ट हजरजबाबी तसेच शरद पवार हे माणसाची व महाराष्ट्राची नस माहीत असलेले उत्तम राजकारणी त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हे सर्वांत दिलखुलास माणूस वाटले. इंदिरा गांधी यांची मुलाखत घेताना त्यांच्या अचाट स्मरणशक्तीचे रहस्य जाणून घेता आले. या सर्व महान व्यक्तींना सलाम केला.
सुधीर गाडगीळ
दि. १० मे २००४ – स्पर्धेच्या युगात चांगली सेवा पोहोचविण्याऐवजी काही बँकांनी ग्राहकांना फसविण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे बँकिंग करताना ग्राहकांनी सर्व बाजूंचा विचार करूनच गुंतवणूक करावी.
बँकिंग प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक असून योग्य बँकिंग कसे करावे हे जाणून घेणे आवश्यक ठरते. बँकिंग क्षेत्रात नवे घोषवाक्य म्हणजे जास्त व्याजदर जास्त धोका होय. मात्र सर्वसामान्य ग्राहक याचा विचार करत नाही.
पूर्वी सहकारी बँकेत जास्त व्याजदर देत असत. परंतु रिझर्व्ह बँकेने सहकारी बँक आणि व्यापारी बँक यांच्यामधील व्याजदर समान केल्याने त्यात तफावत राहिली नाही. काही बँका स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ग्राहकांची फसवणूक करतात. कुठलीही बँक अगर संस्था स्वत:चे आर्थिक नुकसान करून घेणार नाही, हे ग्राहकांनी लक्षात ठेवून व्यवहार करावे.
विद्याधर अनासकर
दि. ११ मे २००४ – फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तानी जनतेच्या मनात विष पेरण्याचे काम राजकारणी लोकांनी केले. त्यामुळे एकमेकांविषयी अर्धवट आणि चुकीची माहिती पसरविली जाते. प्रत्यक्षात पाकिस्तानात भारतीय जनतेविषयी प्रेमाची, आदराची आणि बंधुत्वाची भावना असून जनतेला भारताबरोबर दुश्मनी नव्हे तर मैत्रीचे धागे फुलवणारा दोस्ताना हवा आहे.
भारत आणि पाकिस्तानचे संगीत एकच आहे. साहित्य, इतिहास एकच आहे. दोन्ही देशांचे राहाणीमान, खाणे-पिणे सारखेच आहे. एवढेच काय दोन्ही देशातला माणूसही सारखाच आहे. एकमेकांबद्दल त्यांना आदरही आहे. मात्र एकमेकांविषयी त्यांच्या मनात जाणूनबुजून गैरसमज पसरवण्यात येत आहे. भारतीय संगीत, चित्रपट आणि क्रिकेटपटू पाकिस्तानात प्रचंड लोकप्रिय आहेत.
संजीवनी खेर
दि. १७ मे २००४ – विपरित परिस्थितीतून काही जण गुन्हेगारीकडे वळतात. काही मानसिकतेतून तर काही शारीरिक दुर्बलतेतून गुन्हेगारीकडे वळतात. मात्र प्रबोधन आणि शिक्षा करून गुन्हेगारी प्रवृत्तीवर मात करणे शक्य होऊ शकते. मात्र गुन्हेगारी नियंत्रण आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांना जनतेचे सहकार्य आवश्यक ठरते.
गुन्हे प्रतिबंधावर आजही उपाय नाही. गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करून गुन्हा घडण्यापूर्वीच अशा गुन्हेगारांना ताब्यात घ्यावे. त्यानंतर त्यांचे प्रबोधन करावे म्हणजे त्यांना गुन्हे करण्याची संधी मिळणार नाही.
गुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हेगारी शास्त्राचा वापर वाढायला हवा. समाजाचे नैतिक अध:पतन झाल्याने गुन्हेगार आणि गुन्हेगारीचे व्यावसायिकरण होत आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
भास्कर मिसर
दि. १८ मे २००४ – आपण जर माणसांमध्ये रस दाखवला तर तेही आपल्यात रस दाखवतात. जीव लावतात, खूप काही शिकवून जातात. माझ्या आयुष्यात मला भेटलेल्या विविध माणसांनी माझं अनुभवविश्व असेच समृद्ध केले.
गाडीत, प्रवासात, घरी-दारी, शहरात-खेड्यात, अगदी पुस्तकातही आपल्याला अनेक ठिकाणी माणसे भेटतात. काहीही कारण नसताना ते आपल्याला जीव लावतात आणि आपल्याही ती कायमच स्मरणात राहतात.
मला प्रवासात अनेक जाती पंथाची, धर्माची स्वभावाची माणसे भेटली. त्यांनी आपल्या आयुष्य गारूड केले. दूरदर्शनवर ‘मुलखावेगळी माणस’ या मुलाखतीच्या कार्यक्रमानिमित्त अनेक माणसांना भेटण्याची संधी मिळाली. त्यातून माणसांचे वेगवेगळे पैलू कळत गेले.
शं.ना. नवरे