दि. १२ मे १९९७ – खुल्या अर्थव्यवस्थेच्या नावाखाली चाललेला चंगळवाद थांबविणे आवश्यक आहे. जनतेने उदासीन राहण्याऐवजी त्याविरूद्ध आवाज उठवायला हवा. माणसा-माणसातील जिवंत सुसंवाद नष्ट होत चालला आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
टिव्ही वरील कार्यक्रमांमुळे आपली सांस्कृतिक बैठक उद्ध्वस्त होत चालली आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. त्याविरूद्ध बळकट सांस्कृतिक चळवळ उभारून समाजाने लढा पुकारणे ही काळाची गरज आहे.
नट हा कधीच स्थिर नसतो. तो रंगभूमीवरील चैतन्य असतो. त्याला आवाज, संभाषण व शरीर या बाबी आवश्यक असतात. त्याचे शरीर हे वाघ असते त्यामुळे ते सांभाळायला हवे. स्वत:कडे तटस्थपणे पाहण्याचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. नाटक रंजन व प्रबोधन करते, तेच आपले सांस्कृतिक जीवन बनविते.
प्रा. लक्ष्मण देशपांडे

दि. १४ मे १९९७ – वत्कृत्व कला ही कोणालाही सोपी वाटते ! त्यात काय उभे राहून काहीही आणि कोणत्याही विषयावर बोलायचे ! परंतु वक्तृत्वकलेसाठी पूर्वतयारी आणि आत्मविश्वास आवश्यकच असतो. पूर्वतयारी नसेल तर धांदल उडते. तसेच धीटपणा आणि आत्मविश्वास असल्यास भाषण करण्याचा सराव चांगला होऊ शकतो.
भाषेत अनेक शब्द असतात, त्यांना अर्थाच्या व उच्चाराच्या वेगवेगळ्या छटा असतात. याचे भान न ठेवल्यास अर्थाचा अनर्थ होत असतो. अलीकडे भाषण हा कंटाळवाणा प्रकार होत चालला आहे. कारण त्यात वक्त्याला विषयाचा अभ्यास नसतो. वक्ता हा तोंडासह शरीराने बोलत असतो.
आचार्य अत्रे यांचे वक्तृत्व अफाट होते. त्यांनी पत्रकारिता, नाट्य, काव्य आदि विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी केली.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आचार्य अत्रे यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या भाषणाने माणसे पेटून उठली होती. तसेच अत्रे यांनी महाराष्ट्राला खळखळून हसविले.
द. मा. मिरासदार
दि. २० मे १९९७ – महाभारत हा प्राचीन ग्रंथ आपल्या भारतीय संस्कृतीचा मोलाचा ठेवा आहे. जीवनात काय करावे आणि काय करू नये हे या ग्रंथातून शिकायला मिळते. आचार, विचार, नीतीधर्म आदि संस्कारमय शिकवण देणाऱ्या महाभारत ग्रंथाच्या तत्त्वप्रणालीचा देशात अग्रक्रमाने विचार होणेही आजची गरज आहे.
रामायण, महाभारत या धार्मिक ग्रंथांनी प्राचीन काळापासून भारतीय जनमानसावर प्रभाव पाडला आहे. महाभारत या विश्वात्मकरूप असलेल्या ग्रंथाचे मानवाने चिंतन, मनन, निरीक्षण करायला हवे.
राष्ट्रातील सर्वच क्षेत्रात अंधकारमय वातावरण दिसत असताना महाभारतातील विचारांचे अवलोकन करण्याची गरज आहे. महाभारतातील नावीन्य कधीही कमी होणार नाही. महाभारताने साहित्याची शान वाढविली आहे.
महाभारतातील श्रीकृष्ण, द्रौपदी, भीष्म, अर्जुन आदि पात्रे आपली अनंत काळातील सोबती आहेत. पराक्रम व पुरुषार्थावर या ग्रंथात प्रकाश टाकला आहे. दुर्जनांविरूद्ध सज्जनांनी कसे लढावे हे या ग्रंथात सांगितले आहे.
निर्मलकुमार फडकुले
दि. २२ मे १९९७ – टिव्हीवरील विविध चॅनेल्समुळे दूरदर्शनच्या मालिकांना वाईट दिवस आले आहेत. याला जबाबदार मराठी माणूसच आहे. चांगल्या मालिका येण्यासाठी योग्य कथा हवी, तसेच निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षक या सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत.
पूर्वी ‘कथास्तू’ सारखी चांगली मालिका आली होती. त्यासाठी नाशिकरांनी सहकार्य केले होते. आता आपण हिंदी मालिकेत काम करीत आहोत परंतु चांगली भूमिका मिळाली तर मराठी देखील काम करू शकतो. ‘माणिक मोती’ सारखा कार्यक्रम आम्ही संपूर्ण ताकदीने बसवला असून रसिक प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी भारती आचरेकर यांच्या प्रमाणेच ‘मंगल गाणी दंगल गाणी’ चे निर्माते व गायक – कलाकार अशोक हांडे यांनीही मुलाखतीद्वारे संवाद साधला. आपल्या कार्यक्रमाद्वारे जुने ते सोने असल्याचे आपण पटवून दिल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वीस वर्षांत मराठी चित्रपटाने लक्षात राहतील असे गाणे दिले नाही.
भारती आचरेकर
दि. २६ मे १९९७ – बदलत्या काळात काही वेगळे बदल निश्चित होणार पण या प्रश्नाकडे आपण कसे पाहतो हे महत्त्वाचे आहे. याशिवाय चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण स्वत:पासून करणे गरजेचे आहे. एकमेकांशी असलेली बांधिलकी वाढायला हवी.
स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना आपण काय कमावले व काय गमावले याचा अभ्यास सुरू करणे गरजेचे आहे. सध्या जगात नवनवीन तंत्रज्ञान प्रवाह घेऊ लागले असून आदर्शवाद, तात्त्विक भूमिका घेऊन समाज चालणार नाही असे मत पाश्चात्त्य देशात मांडले जात आहे.
आपण नव्या पिढीपुढे मोठ्या प्रमाणात आदर्श ठेवल्याने आणि ढासळत चाललेल्या परिस्थितीचे चित्र उभे करीत असल्याने या पिढीला जीवनाचा कंटाळा येऊ लागला आहे. मुळातच आपल्या यशाच्या, प्रतिष्ठेच्या व लौकिकांच्या संकल्पना बदलत चालल्याने मूल्यांची घसरण होऊ लागली आहे.
अनंत दीक्षित

दि. २७ मे १९९७ – टिव्ही मालिका व चित्रपटातील भूमिका मी केवळ पैसे व प्रसिद्धी मिळते म्हणून करतो. मात्र अभिनय करण्याचे खरे समाधान हे रंगभूमीवरच मिळते. मी इतर माध्यमांपेक्षा रंगभूमीवर काम करणे पसंत करीन. या क्षेत्रात माझे गुरू म्हणून अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, राजा गोसावी आहेत.
आजचा मराठी चित्रपटाचा दर्जा खालावण्याचे कारण म्हणजे दिग्दर्शकाची मागणी निर्माता पूर्ण करू शकत नसल्याने उच्च दर्जाचा चित्रपट तयार होत नाहीत. या स्थितीला निर्मातेच जबाबदार आहेत. संगीत नाटक सादर करायला अनेक अडचणी आहेत.
मी अभिनया इतकाच गायनाचाही अभ्यास केला आहे. गाण्यांचे अनेक कार्यक्रम मी केले आहेत. माझ्या गाण्यापेक्षा रसिकांना अभिनय अधिक आवडला म्हणून मी अभिनेता झालो. मी ५०५५ दिवसात ५०४८ नाटकातून काम केले त्याची नोंद गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे.
प्रशांत दामले
दि. २ मे १९९८ – प्रसिद्ध नाटककार वि.वा. शिरवाडकर यांनी अनेक विषयांत विपुल आणि वैविध्यपूर्ण लेखन केले. मात्र शिरवाडकर हे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज नावानेच अधिक प्रसिद्ध झाले कारण त्यांनी तेजस्वी कवितेची परंपरा कायम ठेवली.
स्वातंत्र्यवीर सावरकर ते गोविंदाग्रज अशा ज्येष्ठ-श्रेष्ठ कविवर्यांची परंपरा खऱ्या अर्थाने कविश्रेष्ठ कुसमाग्रजांनी सांभाळली.
‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या कवितेतून अनेकांना प्रेरणा आणि स्फूर्ती मिळाली. या कवितेने एक नवमंत्र समाजाला आणि राष्ट्राला दिला. कुसुमाग्रजांच्या प्रत्येक कविता अर्थपूर्ण आहेत. त्या पुन्हा ऐकाव्याशा वाटतात. तसेच समजून घ्याव्याशा वाटतात.
भाऊ मराठे
दि. ३ मे १९९८ – व्यंगचित्रकारांमध्ये भविष्याचा वेध घेण्याची क्षमता असावी. ज्याला ही कला अवगत झाली तोच खरा राजकीय व्यंगचित्रकार होऊ शकतो.
व्यंगचित्र केवळ हास्यविनोदातून नव्हे तर गंभीर घटनेतून देखील निर्माण होऊ शकते. एकदा विमानाला अपघात झाला होता, म्हणजे ही गंभीर घटना असतानाही त्यातून व्यंगचित्र निर्माण केले होते.
व्यंगचित्र रेखाटताना प्रत्येक रेषा ही महत्त्वाची असते. कमीत कमी रेषांमधून व्यंगचित्र रेखाटता येते. महात्मा गांधी यांचे चित्र केवळ तीन रेषांमधून काढता येऊ शकते.
व्यंगचित्रकाराला कल्पनाशक्ती, निरीक्षण, भाषेचा व्यासंग या गोष्टी आवश्यक ठरतात. चित्र असो की व्यंगचित्र हे एकप्रकारे बोलके असावे तरच प्रेक्षकांना त्याचा आनंद मिळतो.
विकास सबनीस
दि. ४ मे १९९८ – सामाजिक समस्यांचे जिवंत प्रतिबिंब म्हणजे नाटक होय. नाटक पाहताना प्रेक्षकांना घरातील प्रसंग बघत आहोत असा आभास होतो तेच नाटक यशस्वी होते.
आमच्या दोघांच्याही कलागुणांची सुरूवात ही नाटकाद्वारे झाली. दूरदर्शन, चित्रपट आणि नाटक यापैकी नाटकातून भूमिका करणे एक आव्हान आहे तर चित्रपटात यशस्वी होण्यासाठी प्रेक्षकांची पसंती आवश्यक ठरते. नाटकातून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया लगेच मिळतात.
नाटक म्हणजे लेखक, तंत्रज्ञ, दिग्दर्शक व कलाकार यांच्या सामूहिक परिश्रमाचा परिपाक असतो. त्यांचे यश-अपयश हे प्रेक्षकांवर अवलंबून असते.
‘चाहूल’ या नाटकातील विषय क्रांतिकारी असल्याने हे नाटक लोकप्रिय ठरत आहे. नाटकाचा विषय आणि आशय प्रेक्षकांना भावला आहे.
सोनाली कुलकर्णी (सिनियर)/ तुषार दळवी
दि. ९ मे १९९८ – बहुतेक लेखक व पत्रकारांनी विनोदाचा वापर हा मनोजरंजनासाठी केला. आचार्य अत्रे यांनी मात्र पत्रकारितेच्या लेखनातून विनोदाच्या माध्यमातून माणसे जोडली.
आचार्य अत्रे यांच्यात राष्ट्रीय व सामाजिक आर्त होती. माणसांची मने त्यांनी पाहिली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असेल तर ते पेटून उठत. दांभिक माणसाचे मुखवटे ओढल्याचे काम त्यांनी केले. त्यांनी चांगल्या माणसांची नेहमी स्तुती केली आणि पुरोगामीत्वाचा पुरस्कार केला.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आचार्य अत्रे यांचे मोठे योगदान होते. त्यांनी मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यावर विलक्षण प्रेम केले. आचार्य अत्रे त्यांच्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात प्रतिष्ठा प्राप्त झाली.
गंगाधर पानतावणे
दि. १२ मे १९९८ – परमेश्वराने माणसाचे आयुष्य हे कोड्याप्रमाणे बनविलेले आहे तर काही व्यक्तींचे आयुष्य हे गणिताप्रमाणे मानून आकडेमोड करण्याचा प्रयत्न करतात. तसेच आयुष्य हे एक काव्य आहे. त्याच्याकडे कलेच्या दृष्टीने बघितले तर सोपे होते.
कोठेही गेले तरी मन हे संस्कार विसरत नाही. मन हे सर्वांत गतिशील असते. कोठेही भरकटत असले तरी अवयव त्याची पाठ सोडत नाहीत.
देशातील लोकांची मनोवृत्ती ही नुसती कायदे करून बदलणार नाही तर ती मनापासून बदलायला हवी. परंतु सर्वसामान्य माणूस अधिक सहनशील असल्याने त्याचे नुकसान होते. सरकार देखील त्याच्या सहनशीलतेचा फायदा घेऊन महागाई वाढविते.
व. पु. काळे
दि. १३ मे १९९८ – नोकरशहा हाच देशाचा खरा आधारस्तंभ असून तोच भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहे. मात्र नोकरशहांनी ठरविले तर देश भ्रष्टाचारापासून मुक्त होऊ शकतो. त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक नागरिकाने ठरविले की, मी भ्रष्टाचार करणार नाही आणि करू देणार नाही, तर देश निश्चितच भ्रष्टाचारापासून मुक्त होईल.
शाळा प्रवेश, रेशन दुकानासह आज अनेक ठिकाणी भ्रष्टाचार दिसतो, तेथील गैरव्यवहाराला थोडा जरी संघटित विरोध झाला तर परिस्थिती बदलू शकते.
जगातील चांगले लोक एकत्र आले तर वाईट गोष्टी सहज नष्ट होऊ शकतात. परंतु अहंकरामुळे ते एकत्र येत नाहीत त्यातून भ्रष्टाचाराचे फावते. अंधार नष्ट करण्यासाठी पणती व्हावे लागेल.
अविनाश धर्माधिकारी

दि. १६ मे १९९८ – प्राचीन काळापासून आजपर्यंत पुरूष प्रधान संस्कृतीने स्त्रियांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु स्त्रियांच्या मागे राहण्याला पुरूषांप्रमाणेच स्त्रिया देखील जबाबदार आहेत.
स्त्रीची पत्नी आणि आई अशी दोनच रूपे समोर आणली जातात. दोन टक्के स्त्रियाच स्वतंत्र विचार करू शकणाऱ्या आहेत. अनेक आधुनिक गोष्टींचा आणि साधनांचा फायदा शहरातील स्त्रियांना झाला पण ग्रामीण भागातील स्त्रिया अद्यापही यापासून वंचित आहेत.
व्यक्तिगत आयुष्यात सन्मानाने जगण्यासाठी स्त्रियांनी काही चौकटी बाहेरचा निर्णय घेतला तर सामाजिक संकेतांना धक्का बसून संघर्ष निर्माण होतो. त्यावेळी स्त्री समोर प्रश्नचिन्ह उभे राहते. जगण्यासाठी आता काय करावे असा संभ्रम तिच्या जीवनात निर्माण होतो. समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
निशिगंधा वाड
दि. २२ मे १९९८ – कोणत्याही विषयावर लेखन करणे सोपी गोष्ट नसते. सामाजिक परिस्थितीवर लेखन करताना कुणावर टीका वाटणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अत्याचारग्रस्त, बुवाबाजी करणारे, तसेच कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर भरपूर लेखन केले. सर्व लिखाण वृत्तपत्रातील लेखाच्या स्वरूपात होते.
अनेक शहरात आणि खेड्यापड्यात फिरून मी अनेक घटनांची माहिती घेतली. अनेक लोकांना भेटून समस्या जाणून घेतल्या. समाजप्रबोधनासाठी फिरताना समाज जवळून पाहिला. त्यातील ज्वलंत अनुभवांवर लेखन केले. त्यामुळे त्यात पीडितांच्या वेदना आल्या. विशेष म्हणजे त्यांच्या समस्या सुटल्या. त्यातून कामाचा हुरूप येऊन माझ्याकडून सातत्याने लेखन झाले.
पत्रकार असो की लेखक त्यांनी कोणत्याही विषयावर लेखन करताना केवळ कल्पना करून टेबल खुर्चीवर बसून लेखन करण्याऐवजी जर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थिती जाणून लेखन केल्यास ते अधिक सकस होऊ शकते, याची जाणीव ठेवावी.
डॉ. अनिल अवचट
दि. २४ मे १९९८ – अर्थसंकल्पाकडे व्यक्तिगत किंवा वैयक्तिक फायदा म्हणून सरकारने आणि जनतेने पाहू नये तर फायदा-तोट्याचा विचार करण्याऐवजी जनतेकडून कररूपाने येणारा पैसा आणि अनुदानाच्या रूपाने मिळणाऱ्या सवलती यांची योग्य सांगड घालून त्यातून देशाच्या विकासाला दिशा देण्याचे काम घडावे.
अर्थसंकल्प तयार करताना आणि सादर करताना अर्थमंत्र्याला मोठी कसरत करावी लागते कारण जनतेला सवलतीची अपेक्षा असते. मात्र जनतेने सरकारकडून जास्त सवलती आणि स्वस्ताईची अपेक्षा करणे चुकीचे आहे. कारण कोणत्याही गोष्टीचे उत्पादन एकदम वाढत नाही, त्यामुळे अनुदान देऊन स्वस्ताई केली की चलनवाढ होते. चलन फुगवटा देशाला परवडत नाही.
शासकीय यंत्रणेवर खर्च होणारी रक्कम वाढत चालण्याने महागाई वाढत आहे. अनुदानाचे दुष्टचक्र हे देखील देशाला घातक ठरणारे आहे.
राजीव साने
दि. ३१ मे १९९८ – सध्याच्या काळात मराठी भाषेची दुर्दशा सुरू आहे. कोणतीही साहित्यकृती कींवा भाषण कला यासाठी शब्दमांडणी किंवा शब्दरचना आवश्यक ठरते. परंतु आज सर्वत्र मराठी भाषे ऐवजी सर्रासपणे इंग्रजीसह अन्य भाषेचा वापर वाढला आहे. मराठी शाळांची अवस्था वाईट दिसत आहे.
मराठी भाषा ही अमृताचा कलश आणि कल्लोळ असल्याचे संत ज्ञानेश्वरांसह अनेक संतांनी सांगितले आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी देखील वेळोवेळी मराठी भाषेबद्दल चिंता व्यक्त केली होती.
सरकारने देखील मराठी भाषेचा विकास होईल आणि मराठी भाषेचे संवर्धन होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आज सर्वत्र इंग्रजीचे अंधानुकरण सुरू आहे.
प्रतिमा इंगोले
दि. १ मे २००० – आपल्या देशातील नागरिकांमध्ये नकारात्मक प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अशाप्रकारच्या प्रवृत्तीमुळेच देशाची प्रगती थांबली आहे. खरे म्हणजे सकारात्मक प्रवृत्ती वाढायला हवी.
सध्या सगळ्याच माध्यमांतून देशातील जनतेवर नकारात्मक विचारांचा मारा केला जात आहे. अशा नकारात्मक विचारांचे उदात्तीकरण टिव्ही, सिनेमा, वृत्तपत्र आणि अगदी धार्मिक कथांमधून देखील करण्यात येते.
शेजाराच्या लोकांना सुखी पाहून मनुष्य दु:खी होतो. दुसऱ्याला कमजोर करण्यात आपण धन्यता मानतो त्यामुळे देशाची प्रगती होणार नाही तर एकजुटीने सकारात्मक विचार केल्यास अस्वच्छता, रोगराई, महागाई, बेरोजगारी हे प्रश्न नाहीसे होतील. “पेड की उँचाई पाने के लिए धरती में गढना जरूरी है ।”
सुरेंद्र शर्मा

दि. ७ मे २००० – सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही संसदीय लोकशाहीची दोन अपत्ये असून या दोघांच्याही लोकप्रतिनिधींनी आपआपली जबाबदारी ओळखून कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. एकाच नाण्याच्या या दोन बाजूंनी सामंजस्याने जनहित साधले तरच लोकशाही रूजेल.
सन १९६५ पूर्वी संसदेत आणि सन १९७० पूर्वी महाराष्ट्रातील विधीमंडळात चर्चेला एक चांगला दर्जा होता. सभ्य लोकप्रतिनिधींचे ज्ञान व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सर्वांना मिळत होते. अलीकडच्या काळात ते उरले नाही.
राज्यकर्तांच्या कारभारामुळे देशातील, राज्यातील नानाविध प्रश्न आणि समस्या आजही जैसे थे आहेत. आमदारांप्रमाणेच विधानसभा अध्यक्षांना देखील आचारसंहिता असावी. मात्र विधानसभेत अनेक प्रश्न चर्चेविना संमत होतात.
नारायण राणे
दि. ९ मे २००० – अलीकडच्या काळात क्रिकेटमध्ये सौदेबाजी वाढल्याने क्रीडारसिकांच्या मनातील भावनेला तडा गेला आहे. काही तरूणांच्या घरात देवांच्या फोटोऐवजी क्रिकेट खेळाडूंचे फोटो असतात. परंतु सध्या गाजत असलेल्या सौदेबाजीमुळे खेळाडूंवरील विश्वास उडाला आहे.
क्रिकेट या खेळावर जाहिरात उद्योग चालतो. क्रिकेटच्या बॅट, स्टम्प, पॅड, बूट तयार करण्याचा व्यवसाय क्रिकेटवरच चालतो. क्रिकेटियर हे व्यावसायिक झाले आहेत. मात्र त्यांचा दर्जा टिकायला हवा. सर्वच सामान्यात सौदेबाजी होत नाही. परंतु क्रिकेटचा दर्जा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी क्रीडा व्यवहारात पारदर्शकता हवी. एकदिवसीय सामने व कसोटी सामने यांचे प्रमाण ठरवायला हवे.
व्ही.व्ही. करमरकर

दि. १० मे २००० – आजच्या काळात हिंदी-इंग्रजी चित्रपटांमधून भावनाशीलता संपली आहे. प्रत्येक चित्रपटात क्रौर्य वाढत आहे. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटात देखील अशाप्रकारे क्रौर्याचे उदात्तीकरण होऊ शकते. त्यामुळे समाजाची गरज ओळखूनच चित्रपटाची निर्मिती व्हायला हवी.
चित्रपटांमध्ये कलानुरूप बदल होत असून पौराणिक चित्रपटापासून सुरू झालेला हा प्रवास धार्मिक चित्रपटापर्यंत येऊन पोहचला आहे. सामाजिक जाणिवेचे चित्रपट, प्रबोधनपर चित्रपट , ऐतिहासिक आणि विनोदी असे चित्रपटाचे अनेक प्रकार आहेत. मात्र हिंसक चित्रपटाचा समाज मनावर वाईट प्रभाव पडू शकतो.
पूर्वी प्रेम विषय हाताळताना विविध देवदेवतांचे संदर्भ दिले जात होते. चित्रपटात कालानुरूप बदल होत गेले. ‘पिंजरा’ ते ‘नटरंगी नार’ असा मराठी चित्रपटांचा वेगवेगळ्या टप्प्यात प्रवास झाला आहे.
जगदीश खेबूडकर