मनोगत पान ६

चित्रकलेतून समाजप्रबोधन शक्‍य

दि. १३ मे २००६ – चित्रातील चेहऱ्यांपेक्षा कल्‍पना महत्त्‍वाची असते. जगाला हलविण्याची ताकद चित्रात असू शकते. त्‍यामुळे चित्रकलेचा वापर समाजप्रबोधनासाठी होणे आवश्यक आहे.

चित्र हे शस्‍त्र आहे. ते नीट वापरले पाहिजे मात्र प्रसिद्धीसाठी कोणताही मार्ग चित्रकार वापरतात. एम.एफ. हुसेन सारखे चित्रकार असा प्रकार करतात. समाजात कित्‍येक गोष्टी घडत असतात त्‍यावर विनोद निर्मिती करणारे चित्र काढता येते. दर्जेदार चित्रांना चांगली प्रसिद्धी मिळते.

व्‍यंगचित्र हे चांगल्‍या पद्धतीने रेखाटणे गरजेचे आहे. चित्रात कल्‍पकता हवी, त्‍यातून कलावंताला दाद मिळायला हवी. ही दाद चटकन मिळाली तर कलावंताचा उत्‍साह वाढतो. सध्याचे विनोदाचे स्‍वरूप हे बदललेले आहे. ते शोधण्याचे काम कलावंतांनाच करावे लागणार आहे.

ज्ञानेश सोनार


समतोल आहार हेच चांगल्‍या आरोग्याचे रहस्‍य

दि. १६ मे २००६ – प्रत्‍येकाने समतोल आहार घेणे आवश्यक आहे. कारण समतोल आहार हेच चांगल्‍या आरोग्याचे रहस्‍य आहे. कुठल्‍याही आहारात दोष नसतो. मात्र आपल्‍या प्रकृतीनुसार आहार घ्यावा. समतोल आहार हा शरीरास योग्य आहे.

माणसाने आपल्‍या राहणीमानात बदल केला, शारीरिक मेहनत कमी केली परंतु आपल्‍या पारंपरिक खाण्यात बदल केलेला नाही. खाण्याच्‍या प्रकारातही नावीन्‍य शोधले पाहिजे. नवनवीन प्रयोग केले तर भोजनाचा उत्तम आस्‍वाद घेता येतो.

मी लहानपणापासून काहीतरी आगळे वेगळे करण्याचे ध्येय समोर ठेवले होते. त्‍यानंतर यशाचे शिखर गाठत गेलो. कुठल्‍याही क्षेत्रात मेहनतीचे काम केले तर त्‍यात यश निश्चितच मिळते. नाशिककरांनी खाण्याचे दहा प्रकार लोकप्रिय केले पाहिजेत. खाण्यामध्ये प्रचंड शक्‍ती आहे.

संजीव कपूर


जागतिकीकरणामुळे गावगाडा उद्‌ध्वस्‍त

दि. १५ मे २००६ – जागतिकीकरणामुळे समाजात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जागतिकीकरणामुळे गावगाडा उद्‌ध्वस्‍त झाला आहे. जागतिकीकरणामुळे प्रत्‍येक क्षेत्रात स्‍पर्धा निर्माण झाली आहे. या स्‍पर्धेमागे धावताना माणूस हा गुलाम बनला. कामाच्‍या मागे धावताना तो मानसिक स्‍वास्‍थ हरवून बसला आहे. आत्‍मिक समाधान, आनंद याच्‍यापासून माणूस दूर गेला आहे.

आज जागतिकीकरण घराघरात पोहचले आहे. जगाशी नाते जोडण्याचा हा कार्यक्रम आहे. भारतीय व्‍यक्‍ती ज्‍या संस्‍कारात वाढली आहे तो संस्‍कार त्‍यांना पटकन बदल स्‍वीकारण्यास प्रवृत्त करत नाही.

जागतिकीकरणात माणूस भरडला जात आहे. घराघरात सध्या जागतिकीकरण दिसून येत आहे. जागतिकीकरण अनेकांशी नाते जोडणारे आहे. मात्र पूर्वीच्‍या पिढीला जागतिकीकरण मान्‍य नव्‍हते. एखादी व्‍यक्‍ती परदेशात गेली तर मोठा गुन्‍हा समजला जायचा

लक्ष्मण गायकवाड


अभ्यास, सरावाने उत्‍कृष्ट निवेदक होता येईल

दि. १७ मे २००६ – उत्‍कृष्ट भाषेचा वापर, आवाजाची लय व चढउतार, शब्दांची पखरण आणि बोलण्यातील आत्‍मविश्वास यातून उत्‍कृष्ट निवेदक घडू शकतो.

माझ्या जीवनात छंदातून मी निवेदक झाले. त्‍यातून व्‍यावसायिकता व त्‍यामधून छंदाचा आनंद घेता येतो. आवाजाच्‍या माध्यमातून एक चांगले निवेदन करता आले. त्‍यात कला व कारागिरी असावी लागते. निवेदनात विविध विषयांचा व्‍यासंग असावा लागतो.

दूरदर्शनच्‍या युगाने संधीची दालने खुली झाली. पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यावर आधारित कार्यक्रमाचे नेतृत्‍व करण्याची संधी मिळाली. त्‍या कार्यक्रमातून अनेक धडे मिळाले, भाषेची शूचिता प्रामाणिकपणे पाळता आली.

आकाशवाणी मधील गंमतजंमत, दूरदर्शनवरील ज्ञानदीप कार्यक्रमामुळे खूप काही शिकायला मिळाले. मुलाखती घेताना अनेकांना बोलते केले.

मंगला खाडिलकर


जिद्दीमुळे समुद्रातून प्रवास साध्य

दि. २० मे २००६ – प्रत्‍येक महिलेमध्ये सुप्‍त गुण असतात. त्‍यांना चालना दिली तर त्‍या संधीचे सोने करून दाखवितात. मी हे अनुभवातून सिद्ध केले आहे. शेतकरी कुटुंबात जन्‍मलेली असले तरी साहसी वृत्ती असल्‍याने सर्वसामान्‍य मुलींपेक्षा वेगळे करण्याची जिद्द मनात बाळगली पाहिजे. त्‍यातूनच समुद्रातून प्रवास करण्याची हिंमत दाखविता आली.

मुंबई ते कोलंबो व कोलंबो ते मुंबई असा नौकानयनासाठी २४ दिवसाच्‍या प्रवासाची संधी मिळाली. उघड्या शिडाच्‍या होडीतून प्रवास करण्यासाठी ६ महिने सराव केला. १९७८ मध्ये पहिल्‍यांदा ही सफर झाली. जेकस या होडीतून आम्‍ही प्रवास केला. ही सफर अतियश यशस्‍वी झाली. या सफरीसाठी शासकीय अनुदान देखील मिळाले होते. त्‍यानंतर इंग्लड ते मुंबई प्रवास केला. त्‍यासाठी स्‍वतंत्र बोट घेतली. तेथे आम्‍हाला अनेक त्रासाला सामोरे जावे लागले.

उज्‍ज्‍वला धर-पाटील


माहिती तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात क्रांती होणार

दि. २१ मे २००६ – संगणक तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात येत्‍या काही वर्षांत प्रचंड बदल होतील, त्‍यामुळे मानवी जीवनात प्रचंड क्रांती घडून येणार आहे. त्‍याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल.

शिक्षण, शेती उत्‍पादन, आरोग्य आदि सर्वच क्षेत्रात वेगळे बदल होणार आहेत. उद्याच्‍या जगात नोटा, नाणी, चेकबुक, क्रेडिट कार्ड याची गरज भासणार नाही. स्‍वत: जवळच्‍या डिस्‍कचा वापर करून खरेदी करता येऊ शकेल.

वेळेची बचत होईल. सुरक्षेची आवश्यकता राहणार नाही, कागद राहणार नाहीत. इलेक्‍ट्रॉनिक वर्तमानपत्रे राहतील. विविध कार्यालये नष्ट होतील. प्रत्‍येक व्‍यक्‍ती घरी बसून कार्यालयातील काम करू शकेल. ताशी ४०० किलोमीटर वेगाने धावणारी वाहने असतील.

येत्‍या ४० ते ५० वर्षांत भारत माहिती तंत्रज्ञानाच्‍या क्षेत्रात सर्वोच्‍च स्‍थान नक्‍की मिळवेल. संगणकाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत सर्व माहिती पोहचविणे गरजेचे आहे.

अच्‍युत गोडबोले


वीज चोरी टाळण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक

दि. ३१ मे २००६ – विजेची चोरी टाळण्यासाठी वॉचडॉग म्‍हणून काम करणे गरजेचे असून नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. केंद्र आणि राज्‍य यांनी हातात हात घालून वीजेच्‍या माध्यमातून विकासदर वाढविणे गरजेचे आहे. त्‍यासाठी विजेची प्रचंड निर्मिती करणे गरजेचे आहे. वीज बचतीसाठी वीज उपकरणांवर एक ते पाच स्‍टार देण्यात येणार आहेत. लहान मुलांना वीज बचतीचे शिक्षण दिले जाणार आहे.

वीजनिर्मिती ही निरंतर राबविणारी प्रक्रिया हवी, वीजनिर्मिती करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्‍यादृष्टीने कुठलाही प्रयत्‍न झालेला नाही. वीजेच्‍या निर्मितीसाठी मोठा निधी देण्याची गरज.

व्‍याख्यानमालेतून बुद्धीला ऊर्जा मिळते. विविध वाहिन्‍यांवर अनेक कार्यक्रम असूनही व्याख्यानमालेत नागरिकांचा मोठा सहभाग असतो. कारण लोकांच्या मनात भाषण ऐकण्याची मोठा ऊर्मी दिसून येते.

सुशीलकुमार शिंदे


आरक्षण हा ओबीसींचा अधिकार; त्‍यासाठी रस्‍त्‍यावर उतरा

दि. १ मे २००७ – हजारो वर्षांपासून सर्व क्षेत्रात मागे राहिलेल्या ओबीसी समाजाला आरक्षण मिळणे हा राज्‍यघटनेने दिलेला अधिकार आहे. तो अधिकार मिळविण्यासाठी रस्‍त्‍यावर उतरण्याची गरज आहे.

अनेकांनी आरक्षणाला विरोध केला. देशाला स्‍वातंत्र्य मिळून ५७ वर्षे झाली तरी ओबीसींना आरक्षणासाठी झगडावे लागत आहे. आरक्षणा संदर्भात जागृती झालेली नाही.

आरक्षणाला विरोध दर्शविणाऱ्यांनी आपल्‍या देशाचा इतिहास अभ्यासावा म्‍हणजे त्‍यांना राजर्षी शाहू महाराज, महात्‍मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाला पुढे आणण्यासाठी केलेले कार्य समजेल.

तब्‍बल दोन हजार वर्षे मनुस्‍मृतीने बहुजन समाज आणि स्‍त्रियांना शिक्षण व संपत्तीपासून वंचित ठेवले आहे.

छगन भुजबळ


राजकीय स्‍पर्धेमुळे मुस्‍लिमांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

दि. ११ मे २००७ – सुधारणावादी प्रवाहाला राजकारणात अडथळे आणले गेले. राजकारणात मुस्‍लिमांच्‍या प्रबोधना संदर्भात भूमिका घेतल्‍या गेल्‍या नाहीत. मुस्‍लिमांच्‍या मतांसाठी आणि राजकारणातील वैयक्‍तिक स्‍पर्धांमुळे मुस्‍लिमांच्‍या प्रश्नांना बगल दिली गेली.

मुस्‍लिमांच्या प्रश्नांचा विचार केला तर काही प्रश्न समाजाने निर्माण केलेले आहेत तर काही प्रश्न ओढवून घेतलेले दिसतात. मुस्‍लीम समाजातील काही प्रथा, काही प्रवृत्तीमुळे मला अभिमानापेक्षा काही वेळा संकोच वाटतो.

मुस्‍लीम सत्‍यशोधन मंडळ ही क्रांतिकारी संघटना आहे. हमीद दलवाई आणि सुधारक गोपाळ गणेश आगरकर हे माझे आदर्श आहेत. प्रत्‍येक धर्मात त्रुटी असतात, परंतु त्‍या सुधारणा करण्यासाठी वाव मिळायला हवा.

समसुद्दीन तांबोळी


समाजकारणाची राजकारणाशी सांगड घालण्याची गरज

दि. १२ मे २००७ – समाजकारणाची राजकारणाशी सांगड घालून तरुणांनी देशाच्‍या प्रगतीत योगदान देणे गरजेचे आहे. तेच राष्ट्राला प्रगत करेल. प्रत्‍येक तरुणाचा विकास झाला तरच देशाच्‍या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.

भारताला २०१० मध्ये महासत्ता बनविण्यासाठी तरुण पिढीच योगदान देऊ शकेल अशी प्रमोद महाजन यांची धारणा होती. देशाच्‍या विकासासाठी विचारधारेची गरज असते. राजकारणात समाजकार्य कुठेही मर्यादा नसते. स्‍थानिक पातळीपासून व्‍यापक प्रमाणात समाजकारण करता येते.

देशातील निम्‍म्‍यापेक्षा जास्‍त लोकसंख्या तरुणांची असून देशाचा विकास तरुणांच्या हाती आहे. त्‍यामुळे देशविकासासाठी तरुणांनी राजकारणात येऊन योगदान द्यावे.

पूनम महाजन


जीवन रसिकतेने जगता आले पाहिजे

दि. १९ मे २००७ – कविता म्‍हणजे भावभावनांचा खेळ आणि जीवनाचा मेळ असतो. आयुष्य हे अनेकरंगी इंद्रधनुष्यासारखे असते. जीवन हे तडजोडींच्या पायावर उभे असते. जीवनात स्‍त्रियाप्रमाणे पुरूषांनाही तडजोड करावी लागते. आयुष्य हे सुंदर असून ते रसिकतेने जगता आले पाहिजे.

इंद्रधनुष्याचे सात रंग जीवन फुलवतात. प्रत्‍येकाच्‍या वाट्याला आले तर आयुष्य आणखी सुंदर होते. सासू-सूनेच्‍या नात्‍याची सुरुवात ही जिव्‍हाळ्याने व्‍हायला हवी. दोन पिढ्यांमधील तफावत ही सुरूच राहणार आहे. परंतु दोन्‍ही पिढ्यांनी सामंजस्‍याने वागायचे ठरविले तर भविष्य उज्‍ज्‍वल होईल.

आयुष्य ही शाळा असून आयुष्यात काहीही चुकीचे नसते. सुख-दु:ख म्‍हणजे गोड-तिखट जोडी होय.

पूनम सारडा


पक्षभेद विसरून जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडण्याची गरज

दि. २१ मे २००७ – विधिमंडळाविषयी राज्‍यातील जनतेच्‍या अपेक्षा उंचावत आहेत. चांगल्‍या लोकांचा राजकारणात सहभाग वाढण्याची आवश्यकता आहे. जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडण्याची गरज असून तरच त्‍यांना न्‍याय देता येणार आहे.

सामान्‍यांशी निगडित प्रश्नांना विधिमंडळात न्‍याय मिळायला हवा. त्‍यात काम करण्यापेक्षा भांडणात वेळ घालविणे योग्य नाही. सभागृहात अभ्यासकात चर्चा होणे आवश्यक आहे.

सभागृहात जेवढे काम केले जाईल. तेवढाच भत्ता मिळावा असा बदल प्रस्‍तावित आहे. अनेकांची त्‍याविषयी नाराजी आहे. मात्र संसदीय कार्यप्रणालीत असे निर्णय घ्यावे लागतात. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीच विधिमंडळ सभागृह उत्तम व्‍यासपीठ आहे.

हर्षवर्धन पाटील


जगाचे नेतृत्‍व करण्यासाठी भारताला उत्तमतेचा ध्यास धरावा लागेल

दि. २२ मे २००७ – जगाचे नेतृत्‍व करण्यासाठी भारताला उत्तमतेचा ध्यास धरावा लागणार आहे . त्‍यासाठी सामाजिक नीतिनियमांचे भान ठेवून देशाला वाटचाल करावी लागेल. त्‍यासाठी देशातील प्रत्‍येक नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे.

भारत जगाचे नेतृत्‍व करेल याविषयी सर्वत्र बोलले जात आहे. त्‍यामुळे प्रत्‍येकाच्‍या अपेक्षा उंचावल्या आहेत. परंतु भारत कोणाच्‍या जोरावर हे नेतृत्‍व करणार या विषयी मात्र अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. कोणा चार उद्योगपतींच्या जोरावर ही बाब शक्‍य नसून त्‍यासाठी सर्वसामान्‍यांचा सहभाग आवश्यक आहे.

देशाला विश्वनेता होण्यासाठी घरा-घरातून तयारी करावी लागेल. एकमेकांचे दोष न दाखविता उत्तमतेचा ध्यास धरूनच ते शक्‍य आहे. वर्तमान किती भक्‍कम आहे यावरच देशाचे भवितव्‍य ठरते.

विवेक घळसासी


रामदास स्‍वामी यांची मठ ही चालती-बोलती विद्यापीठे

दि. २४ मे २००७ – राष्ट्रकल्‍याण हे राष्ट्रसंत रामदास स्‍वामी यांचे जीवनकार्याचे सूत्र होते. त्‍यांनी ११०० मठांची स्‍थापना केली. स्‍वामींचे मठ म्‍हणजे चालती बोलती विद्यापीठे होती. द्रष्ट्या रामदास स्‍वामी यांनी तरूणांच्या माध्यमातून संघटनवृत्ती रूजवली. देशावरचे कोणतेही आक्रमण थोपवण्याची शक्‍ती युवकातच असते हे ओळखून त्‍यांनी राष्ट्र उभारणीला प्रेरणा दिली.

समाजरचना बदलताना समर्थांनी संस्‍काराला महत्त्‍व दिले आहे. रामदास स्‍वामी यांनी ‘श्रीराम जय राम, जय जय राम’ हा मंत्र सिद्ध केला. समर्थांनी आपले सारे जीवितकार्य समाजासाठी केले. त्‍यांचे नुसते नाव घेतल्‍यावर चैतन्‍य, शक्‍ती प्राप्‍त होते. समर्थांच्‍या चरित्रात अनेक चमत्‍कार बघायला मिळतात.

मोहनबुवा रामदासी


पर्यटन उद्योगाचा शिस्‍तबद्ध विकास व्‍हावा

दि. २६ मे २००७ – धार्मिक तीर्थयात्रा किंवा मौजमजेसाठी पर्यटन एवढाच पर्यटनाचा अर्थ नाही तर पर्यटन विषयीच्‍या दृष्टिकोनात सकारात्‍मक बदल होणे आवश्यक आहे. शिस्‍तबद्ध पद्धतीने पर्यटनाचा विकास करणे गरजेचे आहे. इतर राज्‍यांइतकेच महाराष्ट्र राज्‍यही पर्यटनाच्‍या क्षेत्रात पुढे असून केवळ प्रचारात मागे आहे.

राज्‍यातील किल्‍ले-दुर्ग, समुद्रकिनारे, जंगल संपत्ती, अजिंठा-वेरूळ सारखी ऐतिहासिक पर्यटन स्‍थळे आणि तीर्थक्षेत्र याद्वारे देश-विदेशातील पर्यटकांना आपल्‍या राज्‍याचे दर्शन घडविले जाते. मूलभूत सुविधा उपलब्ध करून अनेक दुर्लक्षित पर्यटन स्‍थळांचा विकास पूर्ण क्षमतेने करायला हवा. कला, संस्‍कृती, वैशिष्टये यांचे दर्शन घडवून महाराष्ट्रातील पर्यटनाचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्‍न करण्यात येत आहेत.

भूषण गगराणी


माणसांमध्ये सुसंवाद राहणे गरजेचा

दि. ३ मे १९९७ – संत एकनाथ यांनी संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचे सूत्र तसेच धर्मसुलभ करून सर्वसामान्‍य लोकांपर्यंत पोहोचविला. तसेच धर्माच्‍या नावाखाली अनिष्ट रीतींवर कडाडून प्रहार केला. सर्व धर्मीयांमध्ये समतेचा विचार निर्माण करण्याचे काम संत एकनाथ महाराज यांनी केले. त्‍यामुळे संत एकनाथ केवळ धर्मप्रसारक नव्‍हे तर लोकशिक्षक होते.

धर्मप्रसारात एकनाथांनी ज्ञानेश्वरीचे महत्त्व ओळखले त्‍यामुळे ते ज्ञानेश्वरीचे पहिले संशोधक ठरतात. संत एकनाथ हे उत्‍कृष्ट कीर्तनकार होते. तसेच त्‍यांनी भारूड हा काव्‍यप्रकार प्रथम निर्माण केल्‍याने ते त्‍याचे जनक ठरतात. एकनाथांच्या भारूडात जैन, शीख, इस्‍लाम, शूद्र अशा अठरा पगड जाती-जमातीं मधील चित्रण आढळते.

एकनाथांनी विपुल आणि विविध विषयांवर लेखन केले. त्‍यातून विविध जाती धर्मांचे लोक एकत्र आले. त्‍यांच्यात समतेची भावना निर्माण झाली. त्‍यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केले म्‍हणून ते केवळ संत नव्‍हे तर समाजसुधारक होते.

डॉ. यू. म. पठाण