मनोगत पान ५

जनतेला आर्थिक सुधारणा, जागतिकीकरण हवे पण त्‍याचा वेग कमी हवा

दि. २० मे २००४ – अमेरिकेच्‍या प्रशासनाप्रमाणे जाणारे आपले देशातील एकीकडे तर दुसरीकडे निश्चितच धिम्‍या गतीने जाणारी जनता या दोन भिन्‍न संस्‍कृतीत मेळ बसत नव्‍हता. जनतेला आर्थिक सुधारणा, जागतिकीकरण हवे असले तरी त्‍याचा वेग कमी असावा ही त्‍याची इच्‍छा होती. त्‍यामुळे नवीन आर्थिक धोरणांच्या विरोधात जनतेने मतदान केले असून जनमत प्रवाह बदलाची सुरुवात निकालातून स्‍पष्ट दिसून येते.

भाजप तथा वाजपेयी सरकारच्‍या काळात भारतात एक वेगळीच संस्‍कृती आणण्याचा प्रयत्‍न झाला. ती जनतेला मानवली नाही. देशातील बहुसंख्य वर्गाचे प्रश्न, पाणी, वीज, रस्‍ता, शिक्षण, आरोग्य असताना त्‍याकडे दुर्लक्ष झाल्‍याने भाजप ऐवजी काँग्रेसच्या हाती सत्ता गेली.

प्रशांत दीक्षित


लोककलेतून मराठी मनाचे भावदर्शन

दि. २२ मे २००४ – मराठी लोकलेतील प्रत्‍येक कलेत सामर्थ्य असून लोककलेने घडविलेल्या प्रबोधनाने महाराष्ट्राची संस्‍कृती जिवंत राहिली आहे. मराठी मनाचे भावदर्शन हे लोककलेत दडलेले आहे.

पोवाडा, ओव्‍या, भारूड, वासुदेवाची गाणी या सारख्या अनेक लोकगीतांतून महाराष्ट्राचा मराठी बाणा जागता ठेवण्यात आला आहे. पोवाड्यामध्ये वीरश्री व पुरूषार्थ आहे. डफावर थाप पडली की मराठी मन चैतन्‍याने फुलून येते. इतिहास हा बखरीत नाही तर शाहिरांच्या कवनात आहे.

प्रत्‍येक लोकलेच्‍या चाली ठरलेल्या आहेत. लोकगीत हे चालीच्‍या अंगाने लोकांपर्यंत जाऊन पोहचत असते. संतांचे विचवार या लोककलांमध्ये दडलेले आहेत. परंतु आताच्‍या काळात लोककलांचा ऱ्हास होत आहे.

डॉ. रामचंद्र देखणे


सुदृढ आरोग्यासाठी खळखळून हसण्याचा उपाय

दि. २४ मे २००४ – अतिशय उत्तम दर्जाचा विनोद हा मुलांच्या निरागस स्‍वभावातून आणि बावळट दिसण्यातून निर्माण होतो. परंतु दु:खाची किनार असलेला विनोद हाच सर्वोत्तम असतो.

माणसे मनापासून हसतच नाहीत, मोकळेपणाने वागत नाहीत. सततच्‍या दडपणामुळे हिरमुसल्‍यासारखी दिसतात. जी माणसे सतत हसतात, त्‍यांचे आरोग्य सुदृढ राहून ते दीर्घायुषी होतात. हसण्याचा शारीरिक स्‍वास्थ्याशी संबंध आहे. हसण्याने स्‍नायूंना व्‍यायाम मिळतो. ग्रंथी, यकृत, हृदयरोग देखील जास्‍त चांगल्‍याप्रकारे कार्यरत राहतात.

माणसांचे दैनंदिन तणावग्रस्‍त आयुष्य त्‍याचे रक्‍त शोषून घेत असते. जगभर फिरताना माणसे हास्‍याची भुकेली असल्‍याचे मला आढळले.

वसंत बोधे


सहवासातून उलगडले व्‍यक्‍तिमत्त्‍वाचे पैलू

दि. २७ मे २००४ – विविध क्षेत्रांतील नामवंतांबरोबर एक-एक दिवस घालविल्‍याने त्‍यांच्या व्‍यक्‍तिमत्त्वाचे विविध पैलू समजले. विविध क्षेत्रातील व्‍यक्‍ती आपल्‍या कामकाजात कशा वागतात, त्‍यांचा इतर व्‍यक्‍तींशी संबंध कसा असतो त्‍यासाठी महाराष्ट्रातील अनेक नामवंत २६ व्‍यक्‍तींबरोबर एक-एक दिवस घालविला.

त्‍यात प्रामुख्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्‍पष्टवक्‍तेपणा, शरद पवार यांना माणसांची असलेली जाण, जयंत नारळीकर यांचा मिश्कील स्‍वभाव तसेच मनोहर जोशी, विलासराव देशमुख, रामदास फुटाणे अशा अनेक प्रकारच्‍या दिग्‍गज माणसांचा स्‍वभाव जाणून घेता आला. त्‍याच बरोबर शंतनु किर्लोस्‍कर, शंकरराव चव्‍हाण आणि अमिताभ बच्‍चन यांची मुलाखत मात्र घेता आली नाही.

ह. मो. मराठे


सामाजिक न्‍यायाचे साधन म्‍हणजे मानवी हक्‍काचा कायदा

दि. २६ मे २००४ – मानवी हक्‍कांची गळचेपी केवळ अत्‍याचार, दडपशाहीमुळेच होते असे नव्‍हे तर दारिद्र्य, बेकारी, उपासमार यांमुळे ही गळचेपी होते. सामाजिक न्‍याय व मानवी हक्‍क यांचा निकटचा संबंध असून सामाजिक न्‍यायाचे साधन म्‍हणून मानवी हक्‍क यांचे संरक्षण म्‍हणून मानवी हक्‍क संरक्षण कायदा अस्‍तित्‍वात आला आहे.

माणसाला माणूस म्‍हणून जगण्याचा हक्‍क असला पाहिजे हे सांगणे जेवढे सोपे तेवढेच अंमलात आणणे अवघड आहे. सन १९४२ मध्ये संमत झालेल्या मानवी हक्‍कांचा जाहीरनामा नेहमीच स्‍फूर्तिदायक ठरला आहे. सर्वांसाठी मानवी हक्‍क हे संयुक्‍त राष्ट्रसंघटनेचे ध्येय आहे. प्रत्‍येक नागरिकाला स्‍वाभिमानाने जगण्याची हमी राज्‍यघटनेने आपल्‍याला दिली आहे.

न्‍या. अनंत माने


मुलांकडून वाढत्या अपेक्षा ठेवणे चुकीचेच

दि. १ मे २००५ – आई-वडिलांनी आपली पालकत्‍वाची भूमिका पार पाडताना मुलांचे कलागुण आणि त्‍यांची क्षमता तपासून घेणे गरजेचे आहे. मुलांकडून वाढत्‍या अपेक्षा ठेवून त्‍यांचे मन अस्‍थिर करण्यात पालकांचा वाटा असतो. त्‍यामुळे पाल्‍य आहे त्‍या स्‍थितीत त्‍याला स्‍वीकारायला आपण शिकले पाहिजे.

प्रत्‍येक पालकाने मुलांना घडविताना आपल्‍या इच्‍छा न लादता त्‍याच्‍या क्षमतांची जाणीव करून घेऊन त्‍यांची स्‍वयंप्रतिमा उज्‍ज्‍वल करण्यासाठी आणि व्‍यक्‍तिमत्त्व विकासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

मुलांचा सर्वांगीण विकास साधताना केवळ अभ्यासाच्‍या चौकटीचा विचार करू नये, त्‍याला त्‍याच्‍या इच्‍छेनुसार वर्तन करू द्यावे, मुलांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकासावर भर दिला जावा.

संजय मालपाणी


अमेरिकेप्रमाणे भारत-चीन सामर्थ्यशाली महासत्ता बनणार

दि. २ मे २००५ – एक दोन दशकात अमेरिकेप्रमाणे भारत व चीन हे दोन देश सामर्थ्यशाली व बलवान बनणार असून एक महासत्ता म्‍हणून पुढे येणार आहे. चीनची खेळणी व अन्‍य वस्‍तू आता भारतीय बाजारपेठेत येत आहेत.

आता मातीचे गणपती विक्रीस येतील. यापुढे व्‍यापारच देशाचे भवितव्‍य ठरविणार आहे. अमेरिका-युरोपात चीनचा माल जाऊन पोहोचत आहे. चीनची लोकसंख्या १३० कोटी आहे, तर जगाची ६५० कोटी लोकसंख्या आहे. भारत व चीनची लोकसंख्या एकत्र केल्‍यास ती जगाच्‍या तुलनेत एक तृतीयांश आहे.

भारत व चीन हे दोन्‍ही देश एकत्र आले तर महासत्ता बनतील अशी भीती सर्वांना वाटू लागली आहे. भारताच्‍या लोकसंख्या वाढीचा वेग हा चीनच्‍या पुढे आहे. गुंतवणुकीत चीन पुढे असून भारताला त्‍यादृष्टीने प्रयत्‍न करावे लागणार आहेत.

अरुण साधू


प्राचीन भारतीय ग्रंथातील विज्ञान अभ्यासण्याची गरज

दि. ५ मे २००५ – स्‍वातंत्र्योत्तर काळात भारतात मौलिक चिंतनात कमतरता आली. आपले विद्वान लोक मूलभूत संशोधन करणे, आत्‍मनिर्भरता बाळगणे हे विसरून परकियांचे अनुकरण व भ्रष्ट नक्‍कल करू लागले आहेत. परिणामी आत्‍मविश्वास गमावून आपली पिछेहाट झाली आहे.

प्राचीन भारतीय ग्रंथातील विज्ञान अभ्यासपूर्वक तपासून पाहण्याची गरज आहे. विज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात क्रांती झाली आहे. पावलागणिक आपण विज्ञानाची मदत घेतली आहे.

भारताला श्रेष्ठ दर्जाची संशोधन परंपरा लाभली आहे. गणित, खगोलशास्‍त्र, आयुर्वेदशास्‍त्र, योगसिद्ध, वास्‍तुशास्‍त्र, धातूशास्‍त्र आदि विषयांत प्राचीन भारतीयांनी केलेले संशोधन कार्य हे मौलिक होते. पारतंत्र्यामुळे अपेक्षित वैज्ञानिक आपल्‍या देशात झाला नाही.

प्रभाकर कुंटे


समाज जीवनातील प्रसंगातूनच व्‍यंग चित्राच्‍या कल्‍पना सुचतात

दि. ६ मे २००५ – व्‍यंगचित्रकार हा समाज जीवनातील चुका दाखवित असतो. व्‍यंगचित्रकाराला छोटया-छोटया प्रसंगातून कल्‍पना सुचतात. व्‍यंगचित्राच्‍या कल्‍पना या बातम्‍यांमध्ये समाज जीवनात घडणाऱ्या प्रसंगांमध्येच दडलेल्या असतात.

विसंगतीतून विनोद निर्माण होऊन व्‍यंगचित्राच्‍या कल्‍पना सूचतात. सुसंगतीला जेव्‍हा तडा जातो तेथे विसंगती निर्माण होते. परिस्‍थितीतील बदल हा देखील व्‍यंगचित्राचा विषय बनतो.

चार्ली चॅप्‍लिनच्‍या विसंगत वेशभूषेमुळे विनोद निर्माण होऊन मनुष्याची करमणूक होत असे. अपेक्षाभंग, हजरजबाबीपणातून विनोद निर्मिती होत असते. व्‍यंगचित्रकार हा व्‍यंगचित्राच्‍या माध्यमातून समाजाच्‍या चुकांवर भाष्य करीत असतो. उत्‍कृष्ट व्‍यंगचित्र निर्मितीसाठी सतत प्रयत्‍नशील राहावे लागते.

संजय मिस्‍त्री


विज्ञानाला अध्यात्‍म, शाकाहाराची जोड हवी

दि. ८ मे २००५ – दैनंदिन धावपळीच्‍या जीवनात सुखी, निरोगी आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी नियमित व्‍यायाम व आध्यात्‍मिक आरोग्याची आवश्यकता आहे. सुखी जीवनाचा मूलमंत्र हा आहार-विहार, आचार-विचारात असून त्‍यात खंड पडल्‍यास दुष्परिणाम भोगावे लागतात.

पृथ्वीवरील प्रत्‍येक जीव हा सुखी जीवनाचा व अस्‍तित्‍व टिकविण्यासाठी प्रयत्‍न करतो. सुख, समाधान दुसरीकडे शोधण्यापेक्षा निरोगी शरीर हाच सुखाचा दागिना आहे. यासाठी पैसा, संपत्ती खर्च करण्याची गरज नसते. तसेच सुखाच्‍या शोधात शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्याचा विचार करीत असतो. मात्र त्‍याच बरोबर आध्यात्‍मिक स्‍वास्‍थ्याचा देखील विचार करण्याची गरज आहे. योगसाधना, प्राणायाम व ध्यानसाधनेला महत्त्वाचे स्‍थान आहे.

डॉ. कल्‍याण गंगवाल


राज्‍यातील महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी पुरूष आमदारांनीही आवाज उठवावा

दि. ९ मे २००५ – विधिमंडळाच्‍या दोन्‍ही सभागृहात महाराष्ट्रातील जनतेच्‍या प्रश्नांना वाचा फोडण्यात येते मात्र अजूनही महिलांचे प्रश्न महिला आमदारच मांडतात. पुरूष आमदारांनी देखील महिलांच्या प्रश्नांवर चर्चा करायला हवी.

अनेक वेळा मंत्र्यांच्‍या उत्तरात त्रुटी असतात. महिलांनी स्वत:ची सक्षमता वाढविण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. राजकारणात येणाऱ्या नवीन महिलांनी प्रबोधनाच्‍या परंपरा समजून घ्याव्‍यात.

राज्‍यातील जनतेच्‍या प्रश्नांचा सातत्‍याने पाठपुरावा करावा लागतो. हा पाठपुरावा करताना त्‍या प्रश्नांचा सर्व बाजूंचा विचार करणे गरजेचे आहे.

केवळ आवाज चढवून किंवा गोंधळ घालून प्रश्न मार्गी लागत नाहीत. अनेकदा विघातक वर्तनाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळते. पण विधायक वर्तनाला पुरेशा प्रमाणात प्रसिद्धी मिळत नाही.

नीलम गोऱ्हे


शब्द व अर्थ हा गझलचा गाभा

दि. ११ मे २००५ – कोणत्‍याही गझलमध्ये शब्द व त्‍याचा अर्थ हेच दोन महत्त्वाचे भाग आहेत. या दोघांच्या जोरावरच गजल गायक श्रोत्‍यांना मैफलीत खिळवून ठेवू शकतो. आता गझलमध्ये नवीन प्रकार जन्‍माला येत असून अनेक गजल गायक आता सुरांचा आधार घेत असतात.

अर्थपूर्ण शब्दांच्या जोरावरच श्रोते गझलमध्ये रमून जातात.तसेच श्रोते रमताच गझलची मजा अणखी वाढत जाते. प्रत्‍येक गझलकार कवी थोड्या शब्दांत बरेचसे सांगून जातात. बहिणाबाईंनी दोन ओळींच्या ओव्‍यामध्ये समर्थपणे तत्त्‍वज्ञान सांगितले आहे.

गझलचा परिणाम अनेक वर्षे जाणवतो. गालिब यांच्याबद्दल लोक अजूनही चर्चा करतात. एकलेपणाची भावना त्‍यांच्या गझलमधून समर्थपणे व्‍यक्‍त होत आहे.

शरू रांगणेकर


धर्माच्‍या आधाराने संस्‍कृतीचा विकास

दि. १३ मे २००५ – प्रत्‍येक समाजात धर्माला वैशिष्ट्यपूर्ण स्‍थान असून धर्माच्‍या आधारानेच संस्‍कृतीचा विकास घडून येतो. जीवनात चांगले विचार, चांगली प्रेरणा कधीही नष्ट होत नाही. ही प्रेरणा धर्मातून प्राप्‍त होत असते.

सद्‌भावना एकवटण्याचे काम धर्म करीत असतो. मात्र राजकारण्यांनी धर्माला बदनाम केले आहे. धर्म आणि राजकारण याची गल्‍लत केली जात आहे. विचारी माणसांनी धर्माविषयी सावधतेने विचार करण्याची गरज आहे.

राजकारणी मंडळी सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी धर्माचा वापर करतात. कर्मकांडाच्‍या माध्यमातून गोरगरिबांचे शोषण केले जात आहे. काही प्रमाणात कर्मकांड आवश्यक आहे. मात्र त्‍याचा व्यापार होता कामा नये. धार्मिक माणसाने जागृत राहून धर्माचे मूळ स्‍वरूप पाहणे आवश्यक.

फादर फ्रान्‍सीस दिब्रिटो


स्‍वत:च्‍या चुका मान्‍य करण्यात मोठेपणा

दि. १५ मे २००५ – प्रत्‍येक माणूस हा आत्‍मकेंद्री असतो. त्‍याच्‍या हातून घडणाऱ्या चुकांचे तो समर्थन करतो. पण जेव्‍हा तो स्‍वत:च्‍या चुका मान्‍य करतो तेव्‍हाच तो मोठा माणूस होऊ शकतो.

प्रत्‍येक माणसाच्‍या मनात स्‍वत:बद्दल एक अहंकार असतो आणि त्‍यामुळेच इतरांसमोर तो स्‍वत:ला अवास्‍तव प्रस्‍तुत करतो. इतरांपेक्षा तो स्‍वत:ला वेगळा समजायला लागतो. याच मानवी मनातील अवास्‍तव कल्‍पना म्‍हणजे अहंकार आणि गर्व होय. तो इतरांसमोर स्‍वत:ला आजमावण्याचा प्रयत्‍न करतो.

प्रामुख्याने राजकारणी व्‍यक्‍ती एकावेळी असणे, भासवणे आणि उपदेश करणे या तिन्‍ही गोष्टी करीत असतात. त्‍यामुळे लोकांचा त्‍यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे.

भास्‍कर आव्‍हाड


ब्रिटिशांना आझाद हिंद सेनेची भीती वाटत होती

दि. १७ मे २००५ – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेला ब्रिटिश सरकार घाबरले होते. त्‍यामुळे ब्रिटिशांनी एक वर्ष अगोदरच भारताला स्‍वातंत्र्य बहाल केले. ज्‍या सैन्‍याच्‍या जोरावर बिटिशांनी भारतावर राज्‍य केले त्‍या सैन्‍यावर आता ब्रिटिशांचा ताबा राहिला नव्‍हता.

स्‍वातंत्र्यप्राप्‍तीनंतर सैन्‍यदलावर तत्‍काळ निर्वासितांची जबाबदारी देण्यात आली आणि सैन्‍यदलाने ही जबाबदारी चोखपणे बजावली. सैन्‍यदलाने प्रचंड पराक्रमाच्‍या जोरावर कामगिरी केल्‍याने देशाचे सर्वाभौमत्‍व अबाधित ठेवणे सहज शक्‍य आहे.

भारत-पाकिस्‍तान विभाजनाच्‍यावेळी सेनादलाचे विभाजन करणे अशक्‍य होते. तेव्‍हा भारताला २ लाख ६० हजार सैनिक तर पाकिस्‍तानला १ लाख ४० हजार सैनिक मिळाले होते.

कर्नल जयंत चितळे


परदेशातही भारतीय संस्‍कृतीचा प्रभाव

दि. २० मे २००५ – जगातील बहुसंख्य लोक भारताच्‍या तत्त्‍वज्ञानाकडे आपुलकीने पाहात आहेत. एवढेच नव्‍हे तर भारतातील मानवधर्माच्‍या विचारधारेचा प्रभाव हा पाश्चात्त्य व पौर्वात्‍य देशावर देखील उमटत आहे. विशेषत: चीन, जपान, मंगोलिया, कंबोडिया, थायलंड, तिबेट, श्रीलंका आदि देशातील नागरिक हे भारतीय विचारप्रणालीने भारावले आहेत.

जपान, चीनमध्ये भारतीय सांस्‍कृतिक वातावरणाचा पगडा आहे. पूर्वेकडील देशांवर हाच प्रभाव दिसून येतो. जपानमध्ये ब्रह्मदेव पूजन, अग्निपूजा, सरस्‍वती देवी पूजन केले जाते. जपानमध्ये सुमारे ३०० वर्षांपूर्वी संस्‍कृत भाषेचा स्‍वतंत्र अभ्यास सुरू झाला आहे.

भगवान गौतम बुद्धाचा अभ्यास करताना संस्‍कृत भाषेचा अभ्यास असणे आवश्यक आहे. त्‍यामुळे जपानमध्ये संस्‍कृत भाषेचा अभ्यास सुरू आहे.

एस. के. कुलकर्णी


चमत्‍कार ही एक फसवणूक; श्रद्धेची चिकित्‍सा व्‍हावी

दि. २८ मे २००५ – संतांनी कधीही चमत्‍कार केले नाहीत तसेच त्‍याचे समर्थन देखील केले नाही. श्रद्धा ही एक आध्यात्‍मिक प्रक्रिया आहे. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको. श्रद्धेची चिकित्‍सा होण्याची गरज.

या जगात चमत्‍कार कोणीही करू शकत नाही, चमत्‍कार ही जादू प्रमाणे फार तर हातचलाखी किंवा दृष्टिभ्रम असतो. त्‍यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा देवाधर्माला विरोध नाही. मात्र त्‍या नावाखाली लुबाडणूक करणाऱ्या तांत्रिक, मांत्रिक बाबा, अंगात येणारे यांच्या चमत्‍कारिक प्रकाराला आहे.

आजच्‍या राजकीय नेत्‍यांप्रमाणेच अन्‍य क्षेत्रातील मान्‍यवरही चमत्‍काराने भारावून जातात ही खेदाची बाब आहे. गाडगेबाबा महाराज, तुकडोजी महाराज यांनी प्रबोधनावर भर दिला होता. त्‍यांच्या विचारांची आजच्या काळात गरज आहे.

श्याम मानव