मनोगत पान १०

पाकिस्‍तान व चीन हेच भारताचे खरे शत्रू

दि. २ मे २०१७ – भारतावर वारंवार आक्रमण करणारे चीन आणि पाकिस्‍तान हेच आपल्‍या देशाचे खरे शत्रू आहेत. त्‍यांना घूसखोरीची कोणतीही संधी देता कामा नये. सर्वप्रथम भारतीयांनी चीनच्‍या आर्थिक आक्रमणांना परतवून लावण्यासाठी त्‍यांच्या वस्‍तू खरेदी करू नये. भारतीयांनी देशप्रेम अंगीकारले पाहिजे.

भारतामध्ये अंतर्गत आणि बाह्य असे दोन दहशतवाद आहेत. भारतीय लोकांनी सर्वप्रथम नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. भारतीय नागरिकांनी एकत्र येऊन काम करायला हवे. दहशतवादी, नक्षलवादी लोकांप्रती सहानुभूती दाखवू नका. सरकार येतील आणि जातील, पण पाकिस्‍तान भारताला रक्‍तबंबाळ करत आहे, याकडे लक्ष द्या.

हेमंत महाजन (निवृत्त ब्रिगेडियर)


भगिनी निवेदिता यांचे महिलांसाठी मोठे कार्य

दि. ७ मे २०१७ – स्‍वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील भाषणाने प्रभावित होऊन मेरी मार्गारेट या भारतात येऊन स्‍वामी विवेकानंदांच्‍या शिष्या बनल्‍या आणि त्‍यांनी भगिनी निवेदिता हे नाव धारण केले. भारताचा विकास व्‍हावा, या देशातील नागरिकांना आणि मुलांना चांगले आरोग्य व शिक्षण उपलब्ध व्‍हावे, तसेच समाजव्‍यवस्‍था सुरळीत असावी, यासाठी महिलांनी शिक्षण घेणे आवश्यक आहे असा ध्यास त्‍यांनी घेतला होता.

त्‍याकाळी विधवा विवाहास बंदी, सतीची चाल यांसह अन्‍य कुप्रथा बंगलामध्ये सुरू होत्‍या. अशा परिस्‍थितीत अतिशय कमी वयात शिक्षिकेच्‍या रूपाने महिला शिक्षणात भगिनी निवेदिता यांनी मोठे योगदान दिले.

भारती ठाकूर (लेखिका)


नाम फाऊंडेशन ही माणुसकीची चळवळ

दि. १० मे २०१७ – ‘माणसाने माणसासाठी माणुसकीने चालवलेली चळवळ’ म्‍हणजे नाम फाऊंडेशनचे कार्य म्‍हणता येईल, निसर्गाचे आपण मालक नाही, त्‍यामुळे निसर्गदेवतेची पूजा करून प्रत्‍येकाने सामाजिक भान आणि माणुसकी जपावी, नाम फाऊंडेशनला अभिनेते नाना पाटेकर यांच्यामुळे लोक चळवळीचे स्‍वरूप प्राप्‍त झाले आहे.

पाणीबचत आणि अधिकाधिक झाडे लावण्यासाठी नागरिकांनी पुढकार घेणे आवश्यक आहे. शेतकरी सुखी झाला पाहिजे. आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचे कार्य नाम संस्‍थेच्‍या माध्यमातून सुरू आहे.

नाशिक शहरात चित्रनगरी उभी राहिली तसेच मराठी चित्रपटांना पुरस्‍कार मिळतात पण चित्रपटगृह मिळत नाही ही खंत आहे.

मकरंद अनासपुरे (अभिनेता)


स्‍वामी विवेकानंद यांनी विज्ञान व अध्यात्‍माची सांगड घातली

दि. ११ मे २०१७ – भारतीय संस्‍कृती ही तत्त्‍वनिष्ठा, तर्कनिष्ठा आणि विवेकनिष्ठा यावर आधारित आहे. हजारो वर्षांपासूनची आक्रमणे आणि गुलामगिरीनंतरही भारतीय संस्‍कृती टिकून राहिली आहे. त्‍यातील व्‍यापकता आणि व्‍यवहार्यता काम करत आहे. याचे कारण म्‍हणजे त्‍यातील लवचीकता सहिष्णूता आणि सर्वसमावेशकता होय.

अध्यात्‍म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचे काम स्‍वामी विवेकानंद यांनी केले. स्‍वामी विवेकानंद हे नेहमी आध्यात्मिक विवेचनात बसणारी विज्ञाननिष्ठा सादर करण्याचा प्रयत्‍न करीत असत. सध्या देखील भूतकाळ आणि वर्तमान काळाबरोबरच विज्ञान अणि अध्यात्‍माची सांगड घातली पाहिजे.

डॉ. वेदप्रकाश मिश्रा (कुलगुरू)


महिलांनी सक्षम होऊन स्‍वत:साठी आवाज उठवावा

दि. ३० मे २०१७ – महिलांच्या संरक्षणासाठी भूमाता ब्रिगेड काम करत आहे. आता महिलांनी संरक्षण आणि समान अधिकारासाठी लढायला शिकायचे आहे. महिलांनी स्‍वत:साठी आवाज उठवला पाहिजे. त्‍यांनी सक्षम व्‍हायला हवे.

वास्‍तविक आजच्‍या काळात बहुतांश महिला सक्षम झाली असून अद्यापही काही महिला घराबाहेर पडायला घाबरतात. महिलांना एकविसाव्‍या शतकातही आज मंदिराच्‍या गर्भगृहात प्रवेशबंदी केली जात आहे. मंदिर प्रवेशावरून महिलांना विरोध करणे म्‍हणजे भारतीय राज्‍यघटनेचा अपमान करणे होय. भारतीय स्‍त्री-पुरूषांनी समाजातील अनिष्ट रूढी शोधून त्‍याविरूद्ध लढा द्यायला हवा.

तृप्‍ती देसाई (सामाजिक कायर्कर्त्या)


मुलांवर संस्‍काराची अधिक गरज

दि. १ मे २०१८ – अल्‍पवयीन मुलींवरील अत्‍याचारांच्या घटना वाढत असताना मुलांवरच संस्‍कारांची अधिक गरज असल्‍याचे स्‍पष्ट करत सोनाली कुलकर्णी यांनी सांगितले की, देशात वाढणाऱ्या महिला आणि मुलींवरील अत्‍याचारांच्‍या घटना चिंताजनक आहेत. स्‍त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा.

जीवनात पुस्‍तक वाचन महत्त्वाचे असून मानसशास्‍त्रीय पुस्‍तके वाचण्याची आवड आहे. नाशिकचे मुरलीधर खैरनार यांची ‘शोध’ कांदबरी आवडली.

हिंदी चित्रपट सृष्टीत व्‍यावसायिकता फार असून मराठीत काम करताना घरात काम केल्‍यासारखे वाटते. मराठी रंगभूमीवर काम करण्याची इच्‍छा आहे.

सोनाली कुलकर्णी (नटरंगफेम)


भावगीतांची स्‍मरण यात्रा व मुलाखत

दि. २ मे २०१८ – प्रसिद्ध गायक स्‍व. अरूण दाते यांनी पूर्वी गायलेल्या भावगीतांमागील किस्‍से, प्रसंग, त्‍यांच्‍यासह विविध भावगीते सादर करत अरूण दाते यांचे चिरंजीव अतुल दाते यांनी रसिकांना स्‍मरणयात्रा घडवत अनेक आठवणींना उजाळा दिला.

स्‍व. अरूण दात यांचे मंगेशकर कुटुंबियांशी फार जिव्‍हाळ्याचे संबंध होते. लतादीदींनी अरूण दाते यांच्यासोबत ‘संधिकालिया अशा’ हे एकच युगल गायले. परंतु ते खूपच प्रसिद्ध झाले. अरूण दाते यांच्या प्रेमापोटी कुमार गंधर्व प्रथमच गझल गायले. हृदयनाथ मंगेशकर यांचे ‘स्‍वरगंगेच्‍या काठावरती’ हे गाणे मोहम्मद रफी यांना गायची इच्‍छा होती. परंतु हृदयनाथ यांनी ते अरूण दाते यांना दिले. त्‍यानंतर इतिहास घडला.

अतुल अरुण दाते


सैनिकांच्या त्‍यागाची प्रत्‍येकाने आठवण ठेवावी

दि. ७ मे २०१८ – आपल्‍या प्राणांची पर्वा न करता भारतीय सैनिक हिमालयाच्‍या अत्‍यंत उच्‍च बर्फाळ शिखरावर सुमारे १८ हजार फुटांवरील सीमेवर उणे ४० ते ५० अंश सेल्‍सिअस तापमानात डोळ्यात तेल घालून मृत्‍यूशी झुंज देतात. अशा परिस्‍थितीत देशवासियांनी संरक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांच्‍या धैर्य आणि त्‍यागाची आठवण ठेवावी. तसेच प्रत्‍येक सैनिकाबद्दल भारतीयाला आदर आणि अभिमान असायला हवा.

सैनिकांचे अदम्‍य साहस आणि शौर्यामुळे आपण देशात सुरक्षित आहोत. सैनिकांच्या बळावरच देशाचे अखंडत्‍व टिकून आहे. कारगीलची शौर्यगाथा पाहताना सैनिकांच्या साहसाचे दर्शन घडते.

अनुराधा प्रभुदेसाई


आकर्षण म्‍हणून करिअरची निवड करू नका

दि. ८ मे २०१८ – जीवन साचून राहता कामा नये, जीवनातून काहीतरी निर्मिती झाली पाहिजे, त्‍यासाठी आपल्‍याला आवडते ते करा. खरे म्‍हणजे आपले हृदय आपल्‍याला जे सांगते तेच काम करा म्हणजे आयुष्य यशस्‍वी होईल, आकर्षण म्‍हणून करिअर करू नका, शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे.

मातेच्‍या स्‍तरावर जाऊन शिकवतो तो मास्‍तर होय. शिक्षणाचा अर्थ समजणे आणि समजून घेणे असा होतो. परंतु बारावी पर्यंत शिक्षण झाले तरी विद्यार्थ्याला काही समजत नाही. पदवी घेतली तरी काहीही येत नाही, तेव्‍हा इतरांना प्रश्न पडतो की हा इतका शिकला कसा ?

चांगले वाचन, चांगल्‍या लोकांचा सहवास आणि योग्य-आनंददायी ठिकाणी प्रवास या तीन गोष्टींवर भर दिला तर जीवन बदलून जाईल. जीवन मौल्‍यवान असून त्‍याचे महत्त्‍व समजून घेण्याची गरज आहे.

केवळ पद, पैसा, प्रतिष्ठा मिळेल म्‍हणून शिक्षण व करिअर करण्याचा प्रयत्‍न सध्या सुरू असल्‍याने श्रमप्रतिष्ठा संपुष्टात येऊ लागली आहे. चुकीची शिक्षणपद्धती विद्यार्थ्याला मारक ठरत आहे.

यजुर्वेद महाजन


शरीर- मनाच्‍या आरोग्यासाठी सण- उत्‍सव आवश्यक

दि. ११ मे २०१८ – भारतीय संस्‍कृतीला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आहे. भारतीय संस्‍कृतीत सण-उत्‍सवांना दिलेले महत्त्‍व आजही टिकून आहे. अनेकदा सण-उत्‍सवांवर टीका केली जाते मात्र शरीर व मन सुदृढ ठेवण्यासाठी सण-उत्‍सवांना महत्त्‍व असून त्‍याची विज्ञानाशी सांगड घालण्यात आली आहे.

तसेच प्राचीन ऋषिमुनींनी आहारशास्‍त्राला सणांची जोड दिली. त्‍या आहाराला वेगवेगळ्या ऋतुंमधील सणांचीदेखील जोड दिसून येते. उदाहरणार्थ श्रावणात पचनशक्‍ती मंदावत असल्‍याने हलका आहार घ्यावा म्‍हणून उपवास सांगितले आहेत. हिवाळ्यात खूप भूक लागते म्‍हणून दिवाळीत नानाविध फराळाचे पदार्थ करतात तर संक्रांतीला तिळगुळाचे लाडू करण्याची प्रथा आहे.

जगात फक्‍त भारतात चंद्र व सौर कालगणनेची सांगड घालण्यात आली आहे. माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे म्‍हणजे धर्मपालन होय.

दा. कृ. सोमण


मालककेंद्रीत माध्यमामुळे लोकशाही धोक्‍यात

दि. १५ मे २०१८ – लोकशाहीचा चौथा स्‍तंभ (खांब) म्‍हणून माध्यमे ओळखली जातात. परंतु आजच्‍या काळात भांडवलशाही धोरणांचा अवलंब करत राजकारण आणि माध्यमे यांची सरमिसळ केली जात आहे. यामुळे माध्यमे मालककेंद्रीत होत असून लोकशाहीसाठी घातक ठरत आहे.

वृत्तपत्र तसेच टिव्‍ही, रेडिओ आणि सोशल मिडिया या सारख्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमांचा विकास झाला आहे. परंतु या माध्यमांचा गैरवापर देखील वाढला असून तो लोकशाहीला धोकादायक ठरणार आहे. अनेक माध्यमांतून लोकांना खरी माहिती देण्याऐवजी गोंधळात टाकले जात आहे. अनेक माध्यमे ही भांडवलदारांच्या हातात आहेत.

बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्‍महत्‍या या महत्त्वाच्‍या विषयाकडे लक्ष देण्याऐवजी माध्यमे किरकोळ विषयात त्‍यांचा स्‍वत:चा आणि लोकांचा वेळ वाया घालवताना दिसतात. ही गोष्ट देशाच्‍या लोकशाहीला मारक आहे.

ॲड. असीम सरोदे


अपेक्षांचे ओझे कमी करून आनंदी राहा

दि. २६ मे २०१८ – आजच्‍या स्‍पर्धेच्‍या युगात प्रत्‍येकजण पैशाच्‍या मागे धावताना दिसतो. अपेक्षांचे ओझे वाढल्‍याने इच्‍छापूर्तीसाठी संपूर्ण आयुष्यभर व्‍यस्‍त राहून धडपड केली जाते. जीवनाच्‍या या संघर्षात आनंद उपभोगला जात नाही. त्‍यामुळे जीवनात आनंदी राहायचे असेल, तर अपेक्षांचे ओझे कमी केले पाहिजे.

मानवी जीवन हे अनमोल असून प्रत्‍येकाने जीवन जगण्याचा आनंद उपभोगला पाहिजे. दैनंदिन जीवनात सकारात्‍मक विवार करत कामे केली पाहिजेत. सकाळची सुरूवात हसत हसत केली तर पूर्ण दिवस चांगला जातो. सकारात्‍मक विचारांचे अदानप्रदान जीवनात आनंदी राहायला प्रोत्‍साहन देत असते. नकारात्‍मक विचारातून नेहमी चुकीच्‍या घटना घडतात. त्‍याचा जीवनावर आयुष्यभर वाईट परिणाम होतो म्‍हणून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.

ब्रह्मकुमार सूरजभाई


महिलांचे आर्थिक सबलीकरण काळाची गरज

दि. २७ मे २०१८ – महिलांचे सबलीकरण झाल्‍यास त्‍यांचे परावलंबित्‍व दूर होऊन त्‍या सक्षम होतील. तसेच स्‍वंयविकासातून कौटुंबिक विकासही साधतील. सद्य:स्‍थितीत आर्थिक विकास हा धर्म झाला असल्‍याने महिलांनी आत्‍मभान, आत्‍मनिर्भरता आणि स्‍वावलंबनाची कास धरून भविष्याचा वेध घेतला पाहिजे.

आर्थिक सक्षमीकरणासाठी महिलांनी स्‍वत:च पुढकार घेणे गरजेचे आहे. शासनाने महिलांसाठी विविध क्षेत्रात आरक्षण दिले असले तरी अद्यापही पंचायतराजमध्ये महिलांच्या आरक्षण जागांवर ७५ टक्‍के पुरूषच कार्यभार पाहत आहेत. त्‍यामुळे महिलाचे आर्थिक सबलीकरण होण्याची गरज आहे. लोककला, हस्‍तकलेला व्‍यापक बाजारपेठ मिळावी. आई घरात केंद्रबिंदू असेल तर मुलांना उद्योजक होण्याचे बाळकडू घरातच मिळते. महिलांना आधुनिक यंत्रे हाताळता आली पाहिजेत तर महिलांचा आर्थिक विकास होईल.

कांचन परूळेकर


नोकरी केंद्रीत शिक्षण व्‍यवस्‍था बदलणे आवश्यक

दि. २९ मे २०१८ – सध्याच्‍या काळात आपल्‍या देशात शिक्षण व्‍यवस्‍था ही पूर्णत: तांत्रिक आणि नोकरी केंद्रीत असल्‍याने ती बदलल्‍याशिवाय समृद्ध देशाची निर्मिती होऊच शकणार नाही. त्‍यासाठी दर्जेदार उच्‍च शिक्षणाची गरज आहे.

देशातील शिक्षण पद्धती अतिशय महागडी होत असून सर्वांना माफक दरात शिक्षण उपलब्ध होणे गरजेचे आहे. श्रीमंत लोकांची मुले खाजगी शाळेत आणि गरिबांची मुले ही महापालिका आणि जिल्‍हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असल्‍याने या क्षेत्रात दरी वाढत असल्‍याने निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

उच्‍च शिक्षणाची गुणवत्ता घसरत चालली आहे. उच्‍च शिक्षणातील मूल्‍ये हरवत चालली असून ते दिशाहिन झाले आहे. गुणवान विद्यार्थ्यांशिवाय देशाची प्रगती होणार नाही.

लक्ष्मीकांत देशमुख


कलेचा अधिक प्रसार व्‍हावा

दि. ३० मे २०१८ – कला ही प्रत्‍येकाच्‍या आयुष्यात एक वेगळाच आनंद निर्माण करते. प्रत्‍येक व्‍यक्‍ती ही कलासक्‍त असते. अंगभूत कलागुण अनेकदा प्रकाशात येत नाही, त्‍यामुळे ते आपल्‍याला आणि इतरांना म्‍हणजे समाजाला माहीत होत नाही.

जीवन जगताना माणसाचा कलेशी संबंध प्रत्‍येक ठिकाणी येत असतो. प्रत्‍येक जण हा कलेशी प्रत्‍यक्ष आणि अप्रत्‍यक्षपणे जोडलेला असतो. परंतु कलेच्‍या अंगभूत जाणिवा वाढविण्याची गरज आहे.

चित्रकलेमुळे एकाग्रता वाढते त्‍यामुळे लहान मुलांना विविध कलेचा आनंद घेऊ द्या. त्‍यांच्यातील उपजत कला गुणांना वाव द्या. समाजात कलासाक्षरता वाढायला हवी. कलात्‍मक दृष्टिकोन असेल तर जीवन आणखी सुंदर होते.

प्रसाद कांबळी


युद्ध टाळून प्रेमाने आणि चर्चेने प्रश्न सोडविणे सर्वांच्याच हिताचे

दि. १ मे २०१९ – युद्धात प्रत्‍येक देश सुमारे १० ते १५ वर्षे मागे जात असतो. युद्धाचे दुष्परिणाम हे सामान्‍य माणसापासून सर्वांनाच भोगावे लागत असतात.त्‍यामुळे युद्धाची भाषा करण्याऐवजी प्रेमाने आणि चर्चेने प्रश्नांची सोडवणूक करून युद्ध टाळले पाहिजे.

युद्धात शहीद होणारे सैनिक, नागरिक त्‍यांच्या कुटुंबाचे देखील अपरिमित हानी होत असते. त्‍यामुळे शक्‍य तेवढे युद्ध टाळून प्रेमाने आणि चर्चेने प्रश्न सोडविणे सर्वांच्याच हिताचे आहे.

भारतीय सैनिकाप्रमाणे देशाच्‍या प्रत्‍येक नागरिकाने आपआपल्‍या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केले आणि आपआपले कर्तव्‍य चोखपणे पार पाडले तर भारत देश देखील जगातील बलाढ्य देश होण्यास वेळ लागणार नाही.

विजेता मांडवगणे


खुश नुबा जिंदगी

दि. २९ मे २०१९ – जीवनात आलेल्या आनंदी क्षणाच्‍या स्‍मृती वेळोवेळी ताज्‍या करत राहिल्‍याने जीवनातील आनंद कायम टिकून राहतो. मनुष्य नैराश्याचे गर्तेत बुडत नाही. ताणतणावापासून सुटका करून घेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. चांगल्‍या स्‍मृती नेहमीच आनंद देत राहतात.

आपल्‍या जीवनात कटु प्रसंग यावेत असे कोणालाही वाटत नाही. मात्र जीवनाचा तो देखील एक भाग आहे. त्‍यामुळे आलेल्या कटू प्रसंगाला तसेच दु:खदायक घटनांना मानवाला सामोरे जावेच लागते. मात्र त्‍या घटना मानवाने विसरणे गरजेचे असते. परंतु मनुष्याचे नेमके या विरुद्ध घडते. तो आनंदी क्षण विसरून जातो आणि दु:खदायक वेदनादायी प्रसंगांना कवटाळून बसतो. त्‍यामुळे जीवन निराशावादी बनत जाते.

ब्रह्मकुमार रूपेश / गीता दीदी


बंधुभाव व सहकार्यानेच दक्षिण आशिया महासंघाचा विकास शक्‍य

दि. १ मे २०२२ – जगातील एकूण लोकसंख्याच्‍या सर्वाधिक गरीब लोक हे दक्षिण आशिया देशांमध्ये म्‍हणजेच पाकिस्‍तान, बांगलादेश, अफगाणिस्‍तान, श्रीलंका, भारत या देशात राहतात. त्‍यामुळे त्‍यांची स्‍थिती सुधारण्याची खरी गरज आहे. बंधुभाव आणि परस्‍पर सहकार्यानेच दक्षिण आशिया महासंघाचा विकास होऊ शकतो.

भारत, पाकिस्‍तान यांच्यात प्रत्‍यक्ष व्‍यापार झाल्‍यास दोन्‍ही राष्ट्रांना त्‍याचा फायदा होईल. शांततेच्‍या मार्गाने काश्मीरसह इतर सर्वच प्रश्न सुटू शकतात.

भारत आणि पाकिस्‍तान या दोन्‍ही देशात शांतता राहावी अशी अपेक्षा आहे. या भावनेला जतन केले पाहिजे. ७५ वर्षांत इथले लोक पाकिस्‍तानमध्ये निर्भयपणे जाऊ शकले नाहीत तसेच तिथले लोक आपल्‍या भारतात येऊ शकले नाहीत. सन २०४७ मध्ये फाळणीला १०० वर्ष होतील पण शत्रुत्‍व कायम ठेवावे का हे आता आपण सर्वांनी ठरवायचे आहे.

सुधींद्र कुलकर्णी


कलेतून मन प्रसन्न होऊन नवी ऊर्जा मिळते

दि. ११ मे २०२२ – कलेतून मन प्रसन्‍न होऊन सकारात्‍मक ऊर्जा मिळते. कलेची आवड नेहमी आपल्‍याला जीवनात प्रसन्‍नता आणि चैतन्‍य निर्माण करते. आपल्‍या देशातील प्रत्‍येक राज्‍यातील लोककला ही वेगवेगळी असून लोकनृत्‍य, लोकगीतांच्‍या माध्यमातून लोकांचे पिढ्यान्‌ पिढ्या मनोरंजन करण्यात येत आहे.

प्रत्‍येक माणसांच्या अंगात कला असते. मी देखील कथक कला जोपासत स्‍वत:ची वेगळी कलाशैली जोपासत देशात व परदेशात स्‍वत:चा चाहता वर्ग निर्माण केला. आजकाल कथा वाचनासोबतच नृत्‍य म्‍हणजे कला पण असते. यात प्रत्‍येकाला आनंद अनुभवता येतो.

वाराणसी येथील रामलीला पाहण्यासाठी शेकडो देशातील रसिक येतात.प्रदर्शनकारी कला म्‍हणजे रामलीला होय. लोकनृत्‍य प्रकारात महाराष्ट्राची लावणी वरच्‍या स्‍थानावर आहे.

भरतमुनी यांचा ‘नाट्यशास्‍त्र’ हा ग्रंथ आजही मार्गदर्शक ठरणारा आहे. कलाकार गायन, वादन, नृत्‍य अशा विविध कलांच्‍या माध्यमातून प्रदर्शन करतात. त्‍याला रसिकांनी दाद द्यायला हवी.

विधी नागर


ताणतणाव मुक्‍तीसाठी योग, अध्यात्‍म उपयोग

दि. १५ मे २०२२ – आजच्‍या धावपळीच्‍या युगात मानसिकदृष्ट्या प्रत्‍येक जण ताणतणावाखाली वावरत असतो. या तणावापासून मुक्‍ती मिळवण्यासाठी अध्यात्‍माचा मार्ग स्‍वीकारला पाहिजे. नाम, चिंतन आणि योगसाधना मन एकाग्र आणि शांत करण्याचे काम करते.

मन शांत झाल्‍यावर मानसिक आणि शारीरिक आराम मिळतो. भरकटलेले मन एकाग्र करण्यासाठी अध्यात्‍म हाच एकमेव उपाय आहे. त्‍यामुळे प्रत्‍येकाने आध्यात्‍मिक मार्गावर वाटचाल करत ध्यान, योगसाधना करावी.

जीवनात नेहमी चांगल्‍या गोष्टींचे स्‍मरण करावे त्‍यामुळे नकारात्‍मकतेचे ओझे कमी होते. नाकाने श्वास घेताना सकारात्‍मक विचार येतात तर श्वास बाहेर सोडताना नकारात्‍मक विचार बाहेर पडतात.

जगभरात दोन वर्षांपूर्वी थैमान घातलेल्या कोरोनाने माणसाला आपल्‍या आत डोकावून बघायला शिकविले. शरीरातील मोठ्या प्रमाणावर साचलेला तणाव कालांतराने आजाराचे रूप धारण करतो. म्‍हणून मेडिटेशन तथा ध्यान आवश्यक आहे.

ब्रह्मकुमारी हुसेन इमाम


नागरिकांमध्ये लोकशाहीतील हक्‍क, कर्तव्‍याबाबत जागृतीची आवश्यकता

दि. १९ मे २०२२ – देशात आणि समाजात शांतता संयम आणि सामंजस्‍यपणा असेल तर समाजाचा विकास अधिक वेगाने होतो. शांततेच्‍या मार्गाने समाजातील प्रत्‍येक घटकाचा विकास करणे हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्‍व आहे. त्‍यामुळेच लोकशाहीने दिलेले हक्‍क आणि कर्तव्‍य याबाबत समाजात जागृतीची गरज आहे.

आपल्‍या देशात अद्यापही बहुतांश जनतेला लोकशाही हक्‍काची जाणीव नाही. त्‍यांना ही जाणीव करून देण्याची गरज आहे. लोकशाहीने नागरिकांना मूलभूत अधिकार दिले आहेत. जनतेला ते समजावून सांगितले पाहिजेत.

देशातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता राजकारणात येणाऱ्या नव्‍या कार्यकर्त्यांना या क्षेत्रात कशाप्रकारे वागायचे, लोकांशी कशा पद्धतीने संवाद साधायचा याबाबत प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तरुणांमध्ये प्रचंड क्षमता आहे त्‍याचा देशकार्यासाठी वापर व्‍हावा.

आमदार सुधीर तांबे


आयुर्वेदात आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा परिपाठ

दि. २६ मे २०२२ – आयुर्वेदशास्‍त्रात उत्तम आहार आणि उत्तम विहार यांना प्राधान्‍य दिलेले आहे. भारतीय उपखंडात आयुर्वेदाचा उगम असल्‍याने ती भारतीय जीवनशैलीशी अनुरूप आहे. त्‍यामुळे कोणत्‍याही आजाराच्‍या प्रारंभास आयुर्वेदाची उपचार पद्धती सुरू केल्‍यास त्‍याचा चांगला उपयोग होऊ शकतो.

आजच्‍या काळात टिव्‍ही, मोबाईलमुळे आठ तासांची झोप ही सहा तासांवर असल्‍याने आपण शंभर वर्षे निरोगी आयुष्य कसे जगणार हा प्रश्न आहे. आजकाल वाढत्‍या स्‍पर्धेमुळे तरूणांमध्ये हृदयविकार तणावामध्ये वाढ झाली आहे.

रोज आठ-नऊ तास झोप घेणे आवश्यक आहे. तरूणांना झोप येत नसल्‍याच्‍या तक्रारी वाढल्‍या आहेत. रोज गरम पाणी प्‍यावे, अद्रक सुंठ, त्रिफळा चूर्ण याचा वापर केल्‍याने आरोग्य चांगले राहते.

शैलेश गुजर


स्‍वामी समर्थांच्‍या भूमिकेमुळे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले

दि. ३० मे २०२२ – कुठलाही अभिनय साकारताना त्‍यात एकरूप व्‍हावे लागते. अभिनय साकारणे कठीण नाही, मात्र प्रेक्षकांना त्‍यातून आपलेसे करणे महत्त्‍वाचे असते. मला ‘स्‍वामी समर्थ’ मालिकेत प्रत्‍यक्ष स्‍वामी समर्थांची भूमिका करण्याची विचारणा झाली तेव्‍हा आश्चर्य आणि आनंदही वाटला. त्‍यानंतर लगेच ऑडिशनच्‍या तयारीसाठी दुसऱ्या दिवशीच तपोवनात गेलो.

स्‍वामी समर्थ मालिकेत जे स्‍वामी मला दिसले तेच मी मालिकेद्वारे साकारण्याचा प्रयत्‍न करत आहे. मला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या मालिकेचा प्रेक्षक सर्व गटातील आहे त्‍यामुळे मुलांवर सुसंस्‍कार होतील.

शाळेत असताना पासून अभिनयाची आवड होती. काही वर्ष नोकरी केल्‍यावर एकांकिका, राज्‍यनाट्य, कामगार कल्‍याण स्पर्धांमध्ये सहभाग घेत होतो. त्‍यातून कलाक्षेत्रातील अनेक गोष्टी उलगडत गेल्‍या.

अक्षय मुडावतकर