दि. १ मे २०१२ – विनोद आणि विचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून या विनोदाचे परिपूर्ण वैभव काय असते हे पु्.ल. देशपांडे यांचे लेखन वाचल्यावर कळते. विनोद लिहिणारा गंभीर स्वभावाचा असतो. काही लोकांना विनोद कुठे संपले आणि विचार कुठे सुरू होतो हेच कळत नाही. उपजत विनोद बुद्धी प्रत्येकाला असते. फक्त कुणी तिचा उपयोग जास्त करतो, कुणी कमी करतो. विनोद हा एक दृष्टिकोन आहे. फक्त तो समजून घ्यावा लागतो. भाषेच्या सरमिसळी मुळे हल्ली इंग्रजी शब्द वापराचे फॅड वाढले आहे. याचा अर्थ माहिती नसताना शब्द वापरला जातो. माणसे वाचण्यासाठी मस्तकाचा वापर करणे गरजेचे आहे. विनोदी लेखन करणाऱ्याला ते चांगले जमले. पु.ल. देशपांडे व आचार्य अत्रे यांना विनोदाची अफाट बुद्धी होती.
फ. मुं. शिंदे

दि. ४ मे २०१२ – चित्रपट सृष्टीची शंभर वर्षांची वाटचाल ही सामन्य माणसाप्रमाणेच हिंदोळ्याची, भरतीची, ओहोटीची आणि पूर्ण स्तब्ध होण्याची अशीच आहे. मात्र या वाटचालीपूर्वी म्हणजेच १८८५ पासूनच आपल्या देशात चित्रपट निर्मितीची सुरुवात झाली असे म्हणता येईल. कारण मुंबई बंदराला लागलेल्या परदेशी जहाजावरील एका प्रवाशाने काळी जादू नावाची हलती चित्रे दाखविली.
त्याकाळात दादासाहेब फाळके यांनी हे चित्रपट तंत्र काय आहे ते समजून घेतले त्यानंतर खूप शोध, विचार आणि पराकोटीच्या हालअपेष्टा सहन करून या माणसाने ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्याच काळात दादासाहेब तोरणे यांची देखील चित्रपट निर्मितीचा ध्यास घेतला होता.
चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ नाशिकमध्ये रोवली गेली. त्यामुळे नाशिककरांना अभिमान वाटावा, असे हे वास्तव आहे.
राजदत्त

दि. ४ मे २०१२ – भारतीय माणसाच्या नसानसांत आणि श्वासाश्वासात क्रिकेट भिनलेले असून खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्तरावर सन १९३२ पासून सुरू झाले आहे. पूर्वी क्रिकेटमध्ये आजच्या इतका पैसा आणि सुविधा नव्हत्या. अनुभवातही आपण कमी पडत असल्याने परदेशातील मैदानांवर भारतीय क्रिकेट संघासाठी विजय हे दुर्मीळ होते.
आता आपल्यासंघातील खेळाडूंकडे पैसा देखील बऱ्या प्रमाणात येऊ लागल्याने या खेळामध्ये व्यावसायिकता आली आहे. गेल्या शतकापासून त्यात वाढ झाली असून आायपीएल सामन्यांना इतके महत्त्व देणे योग्य नव्हे. तसेच २०-२० सामन्यांकडे एखादी एंटरटेन्मेंट मूव्ही म्हणून पाहावे. क्रिकेटचे स्वरूप बदलत असले तरी स्पिरिट कायम राखणे युवा खेळाडूंच्या हातात आहे.
अजित वाडेकर
दि. ५ मे २०१२ – मराठी भाषेला ज्ञानभाषा ठरवाची असेल तर मराठी भाषेतून ज्ञान घ्यावे लागेल. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषा टिकण्यासाठी मराठी भाषिकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.
एकेकाळी अमृताते पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेला आधुनिक ज्ञानयुगात ज्ञानरूप व्हावे लागेल. भाषा व तंत्रज्ञानात शेवटी आशय महत्त्वाचा आहे. बिल गेटने आशयाला महत्त्व दिले. काळानुरूप तंत्रज्ञान बदलले.
मराठी भाषा ही सध्या अस्तित्वात असून ती जतन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे संगणकात सर्वच भारतीय भाषा एकत्र सामावू शकतात. इतकेच नव्हे तर जगातील पन्नास हजार लिपी टिकू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
विवेक सांवत

दि. ६ मे २०१२ – आपल्या देशात लोकशाही असल्याने नागरिक कराच्या रूपात कष्टाचे पैसे देतात. नागरिकांना विविध प्रकारचे कर भरावे लागतात. परंतु कर रूपात सरकारच्या खजिन्यात जमा झालेल्या पैशांचे पुढे काय होते याची सर्वसामान्य जनतेला माहिती होत नव्हती. मात्र सन २००५ मध्ये माहितीच्या अधिकारातील कायदा आला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळविण्याची संधी मिळाली.
माहितीच्या अधिकाराचा वापर अद्यापही मूठभर लोकच करताना दिसतात. या कायद्याच्या आधारे सर्वांनी सजग होण्याची गरज आहे. माहितीच्या अधिकाराचा वापर हा नागरिकांच्या हितसाठी व्हायला हवा. त्यासाठी प्रत्येकाने या अधिकाराची माहिती करून घ्यायला हवी. तसेच आपला अधिकार अंमलात आणायला हवा. प्रत्येक शासकीय कार्यालयात संबंधित विभागाने सर्व तरतुदीचा जीआर लावणे बंधनकारक आहे.
विवेक वेलणकर

दि. १२ मे २०१२ – महागाई आणि विकासदर यांच्यात कायम स्पर्धा लागलेली असते. महागाई वाढल्यास विकासदरही वाढतो. तसेच साठेबाजीमुळे देखील महागाई वाढते. विकासदर वाढवायचा असेल तर पैसा बाजारात आला पाहिजे. पैसा आला म्हणजे महागाई वाढणारच. त्यामुळे ते दोन्ही घटक एकमेकांना परस्परपूरक आहेत.
विकासदर आणि महागाईचा समतोल साधण्यासाठी रिझर्व्ह बँक सातत्याने पतधोरण आखत असते. जागतिक घडामोडींच्या परिणामस्वरूप अर्थ-व्यवस्थेत दोष देखील निर्माण होत असतात.
अत्यंत वेगाने बदलणाऱ्या जागतिक घडामोडींचा परिणाम आणि बदलती अर्थव्यवस्था यांची सांगड अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँकेला घालावी लागते. यासाठी रिझर्व्ह बँक कायमच प्रयत्नशील राहते. देशातील नागरिकांचा आर्थिक विकास साधण्याला रिझर्व्ह बँक सर्वांत जास्त प्राधान्य देत आली आहे.
आशुतोष रारावीकर

दि. १९ मे २०१२ – आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश सामर्थ्यशाली होणे गरजेचे असून त्यादृष्टीने चांगली वाटचाल सुरू आहे. देशात अन्नधान्याची उपलब्धता, उच्च शिक्षणाचा प्रसार, सर्व प्रकारच्या सुखसुविधा आहेत. देशाची प्रगती होत असून आणखी झाली पाहिजे. काही प्रमाणात त्यात अपूर्णता जाणवते.
सर्व काही चांगले घडत असताना केवळ नकारात्मक भूमिकेमुळे देशाला धोकादायक दिशेकडे नेण्यात येत आहे. देशाच्या देदीप्यमान बंधुभावाचा इतिहास आज कुठे गेला याची खंत वाटते. स्वातंत्र्यलढ्याचा सुवर्णमय व तेजोमय इतिहास होता.
अनेक क्रांतिकारकांनी आपल्या संसाराची व प्राणांची आहुती दिली. केवळ देशाची प्रगती व्हावी, जनतेचे कल्याण व्हावे म्हणून स्वातंत्र्यसैनिकांनी त्याग केला. महात्मा गांधींनी देशासाठी स्वातंत्र्यलढा तीव्र केला त्याची सर्वांनी आठवण ठेवावी.
रावसाहेब शिंदे

दि. २६ मे २०१२ – राजकारणी व समाजव्यवस्थेचा बळी ठरल्यानेच राज्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. एकेकाळी महाराष्ट्र कृषिप्रधान राज्य म्हणून गणले जात होते. शेतीचा आलेख हा चढता होता. औद्योगिक व शेती क्षेत्रात इतर राज्यांच्या तुलनेत राज्याची पिछेहाट झाली आहे.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी असणारे नेतृत्व खुजे झाले आहे. त्यामुळे राज्याची व शेतकऱ्यांची प्रगती देखील खुंटली आहे. कृषी क्षेत्राची असणारी अवस्था लक्षात घेता शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.
शेतकऱ्यांची शेती तोट्यात असताना राजकारणी आणि उद्योजक यांनी शेती खरेदीचा सपाटा लावला आहे. हे गूढ उकलावे लागणार आहे. राजकारण्यांना शेतकऱ्यांशी काही बांधीलकी नाही.
कृषी मालाचे भाव वाढले की, निर्यात रोखली जाते. पण भाव वाढले की त्याचा सर्व फटका हा एकट्या शेतकऱ्यांना सोसावा लागतो.
राजू शेट्टी

दि. १ मे २०१३ – सुख दिल्याने जीवनात शांती, समाधान प्राप्त होते. निसर्ग आणि व्यवहारात देणे-घेणे सुरू असते. परंतु व्यवहारात नुसता व्यवहार पाहिला जातो. त्यात आनंद नसतो. निसर्ग कायम देत असतो. तो आपल्याकडून काहीही अपेक्षा करत नाही. आपल्याला सुख हवे असेल तर आपण इतरांना प्रेम द्यायला हवे.
निसर्ग आणि व्यवहारात देणे-घेणे चालूच असते. परंतु आजच्या काळात व्यवहारात नुसता व्यवहार पाहिला जातो. त्यात आनंद नसतो. याउलट निसर्ग हा कायम देत असतो. तो आपल्याकडून काहीही अपेक्षा करत नाही. आपण जे देतो ते पुन्हा आपल्याकडेच येत असते. सुख ही मिळवण्याची गोष्ट नाही तर देण्यातच सुख असते. जीवनात आनंदी राहायचे असेल तर किमान स्वार्थासाठी परमार्थ करायला हवा. आयुष्यात आपल्याला काहीही कमी पडणार नाही.
सद्गुरू प्रल्हाद पै

दि. २ मे २०१३ – ग्रामीण भागातील महिलांमध्ये रोजगाराच्या संधी आवश्यक असून अशी संधी मिळाल्यास त्यांच्यामध्ये आत्मसन्मान वाढतो. आमच्या संस्थेने गोधडीच्या व्यवसायातून महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला आहे. गावातील महिलांच्या सहकार्यामुळेच आमची गोधडी परदेशात पोहचली आहे.
लहानपणी उपेक्षित समाजासाठी काहीतरी करावे अशी भावना जागृत झाली होती. त्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षीच समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात एम.ए. चे शिक्षण घेतल्यावर डॉ. कालबाज यांच्या सल्ल्याने भारतभरातील विविध संस्थांना भेटी दिल्या. आणि त्यांची कार्यपद्धती जाणून घेतली. त्यानंतर काय करायचे नाही याची एक यादीच तयार केली. त्यात सरकारचा पैसा घ्यायचा नाही, गावात पुढारीपण करायचे नाही आणि कोणत्याही पुरस्कारासाठी अर्ज करायचा नाही असे ठरविले. त्यातून बचतगटाच्या माध्यमातून काम करताना अनेक अडचणी आल्या परंतु त्यातून मार्ग काढला; मग यश मिळत गेले.
नीलिमा मिश्रा
दि. ३ मे २०१३ – आपल्या देशात पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जात आहे. स्त्री-पुरूष ही विषमता माणसानेच निर्माण केली असून आर्थिक शोषण व जातीय व्यवस्थेत स्त्रियांचा बळी जात आहे. कुठल्याही धर्मातील स्त्रियांना पुरूषांच्या तुलनेत दुय्यम स्थान असल्याचे दिसत आहे.
देशात प्रत्येक वीस मिनिटाला एका महिलेवर अत्याचार होत असतो. देशाची आर्थिक प्रगती व शिक्षणाचा दर्जा वाढत असताना मुलींची संख्या मात्र कमी होताना दिसत आहे. मात्र गुणात्मक पातळीवर मुली मुलांच्या पुढे आहेत. शिक्षणात मुली वेगाने पुढे जाताना दिसत असताना त्यांना मोठ्या प्रमाणावर सर्वच क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. देशातील व समाजातील पन्नास टक्के घटक महिला असून त्यांना मागे ठेवून देशाची प्रगती होऊ शकत नाही.
हरी नरके
दि. ५ मे २०१३ – देशभक्तीवर बोलणे सोपे परंतु प्रत्यक्ष कृती करणे अवघड असते. सध्या देशभक्ती हा एक उद्योग होऊ पाहत आहे. देशभक्तीवर आंदोलने केवळ प्रसिद्धी पुरती केली जात असतात.
आम्ही मार्च १९८४ मध्ये वंदेमातरम् ही संस्था स्थापन केली. ऑपरेशन ब्लू स्टार नंतर संस्थेने पंजाबमध्ये जाऊन तेथील लोकांसोबत काम केले. १९८८ मध्ये एका शीख कुटुंबाला वाचविताना संस्थेच्या एका सदस्याने बलिदान दिले. त्याच्या बलिदानाने संस्थेच्या कामात विश्वास निर्माण झाला.
कालांतराने काश्मीर प्रश्न पेटल्यावर सरहद संस्थेच्या माध्यमातून आम्ही तेथे कामाला सुरुवात केली. तेथील जनतेमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत हा विश्वास निर्माण केला. स्थानिक माणसांना सोबत घेतल्याशिवाय युद्ध जिंकता येत नाही. तेथील मुलांमध्ये भारत विरोधी असलेली प्रतिमा पुसून टाकण्याचे काम केले. काश्मिरींच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे.
संजय नहार
दि. ७ मे २०१३ – आपल्या देशात सध्याच्या काळात अनेक प्रश्न गंभीर बनलेले आहेत. देशाची सुरक्षा, शिक्षण, आरोग्य असे ज्वलंत प्रश्न असताना समाजात धार्मिक वातावरण बिघडलेले आहे. राजकारणात स्पर्धा वाढलेली दिसते. राजकारणी लोक जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. या सर्व राजकीय-सामाजिक स्थिती बिघडण्याला नागरिकच जबाबदार आहे.
पूर्वीची आणि आताची सामाजिक व राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पूर्वीचे राजकारण समाजासाठी केले जात होते. सध्याचे राजकारण हे स्वत:साठी केले जाते. त्यामुळे जागृत मतदार होऊन मतदान करण्याची गरज आहे.
स्वातंत्र्यानंतर सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार वाढत चालला आहे. राजकारणात तो मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या सर्व घडणाऱ्या घडामोडींवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. देशातील केवळ २० टक्के मुलेच उच्च शिक्षणापर्यंत पोहचतात.
गिरीश गांधी
दि. १० मे २०१३ – पोवाडे आणि लोकगीतांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबर प्रबोधनाचे काम केले. सुसंस्कृत महाराष्ट्र हा आज पोवाड्यांच्या माध्यमातून उभा आहे. शाहीर महाराष्ट्राच्या मातीशी एकनिष्ठ राहून कलेची सेवा करीत आहे.
‘ वैभव महाराष्ट्र, वैभवाने डोले, चमके शिवबाची तलवार’ यातून छत्रपती शिवरायांच्या शूर वीरतेचे दर्शन घडते. छत्रपती शिवाजी महाराज हे एका विषयामुळे मर्यादित नव्हते. तत्कालीन परिस्थितीत शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था कशी होती हे दाखविण्याचे काम शाहिरांनी पोवाड्यातून केले.
सध्या अनेक समस्या उभ्या आहेत. काही मानवनिर्मित तर काही नैसर्गिक आहेत. शेतकरी देशाचा कणा असून खऱ्या शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. आम्ही शाहीर पोवाड्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत असतो. महाराष्ट्रासह देशाला दुष्काळाने ग्रासले आहे. त्यामुळे उद्याचे भविष्य अंधारात आहे. संतांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगितले असून तरूण पिढी मात्र साज शृंगाराच्या मागे लागली आहे.
शाहीर शिवाजीराव पाटील
दि. १५ मे २०१३ – आपल्या देशातील लोकांची मानसिकता बदलून स्त्रियांवरील अत्याचार कमी होणार नाहीत. त्यासाठी कायद्याचा बडगा उभारण्याची गरज आहे. तसेच स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे करण्याची गरज आहे.
या देशात लेकींच्या जन्मासाठी झगडावे लागते. जगाच्या पाठीवर असा अत्याचार करणारा कुठलाही देश नाही. भारतात एकीकडे स्त्रीची देवी म्हणून पूजा केली जाते. नवरात्रोत्सव साजरा केला जातो. मात्र दुसरीकडे तिच्यावर रोज अत्याचार होतो. स्त्रियांना आपण शक्ती स्थानी मानतो परंतु शक्तिमान पुरूषाला म्हटले जाते. सरस्वती ही बुद्धीची देवता आहे. परंतु पुरूषांना बुद्धिमान समजले जाते. आणि बायकांना अक्कल नसते असे सहजपणे बोलले जाते.
आपल्या देशात स्त्रियांच्या अवमान करण्याला जणू काही मान्यता आहे. हजारो वर्षांपासून तिला दुजाभावाने वागविले जाते. भारतात स्त्रियांच्या संरक्षणासाठी ४२ कायदे आहेत. हे सर्व कायदे एकाच छताखाली आणण्याची गरज आहे.
वर्षा देशपांडे
दि. १६ मे २०१३ – मनुष्याला अध्यात्म आणि विज्ञान यांच्यातील फरक ओळखता येत नाही. त्यामुळे अनेकांच्या जीवनात दु:खं भरली आहेत. संतांचे विचारच मानवजातीला उद्धारक आहेत. आंतरिक शक्तीत काहीतरी अनुभवास येते त्या अनुभवास शक्तीचा शोध म्हणजे अध्यात्म म्हटले जाते.
विज्ञान हे बहिर्मुख असून पंचेंद्रियाचे क्षेत्र म्हणजे विज्ञान होय. पंच ज्ञानेद्रियांना जाणीव देणारे चैतन्य म्हणजे अध्यात्म होय. सर्वच बहिर्मुख असल्याने विज्ञान हे सर्व प्रश्नांचे उत्तर वाटते. माहितीला ज्ञान म्हटले जाते मात्र अध्यात्मात ज्ञान हा शब्द आत्मज्ञानासाठी वापरला जातो.
ज्ञानेश्वरांनी सातव्या अध्यायात ज्ञान विज्ञानाची व्याख्या केली आहे. शक्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेणे याला अध्यात्म म्हटले जाते. शास्त्रज्ञ हे स्थूलबुद्धीचे तर संत हे सूक्ष्मबुद्धीचे आहेत. निष्काम माणसाला सुखाची प्राप्ती होत असते. आपल्याला अंतरंग तपासता आले तर स्वरूपाचा बोध होतो.
विजय पांढरे
दि. १८ मे २०१३ – एखाद्या देशाचे उत्पन्न वाढले की त्या देशाचा विकास दर वाढतोच असे म्हणता येणार नाही. याउलट तो कमी होतो. आर्थिक विकास झाला तर त्याच्या सोबत सामाजिक, आर्थिक, आरोग्य व शैक्षणिक विषमता देखील वाढते.
जागतिक आर्थिक विकासात अनेक बदल होत आहेत. काही वर्षांपूर्वी भारताचा विकासदर नऊ टक्के होता. तो आता खाली घसरून पाच टक्क्यावर आला आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
भारताने आज उत्पन्नाचा महत्त्वाचा टप्पा गाठलेला असताना दुसरीकडे देशात आर्थिक विषमता वाढत आहे. ही विषमता केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक शैक्षणिक आरोग्य व संपत्तीच्या बाबतीत आहे.
भारता प्रमाणेच चीन मध्येही आर्थिक विषमता वाढत आहे. आजमितीस भारतीयांचे सरासरी दरडोई उत्पन्न ७५ हजार रूपये आहे.
अजित रानडे
दि. १९ मे २०१३ – सध्या देशाची आणि समाजाची परिस्थिती बिकट आहे. लोक स्वार्थाशिवाय दुसरा विचारच करत नाहीत. अशा परिस्थितीत शाश्वत मूल्यच संस्कृतीचे रक्षण करू शकतात.
सत्य, नि:स्वार्थी सेवा, प्रेम, दानाची इच्छा ही मूल्ये बदललेली नाहीत. परंतु आजच्या काळात मानसिकता आणि रीतीरिवाज बदललेले आहेत. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
आपल्या उपनिषदांमध्ये मूल्यांचा विचार मांडलेला आहे. दुसऱ्याचे धन घेऊ नये हा मूल्य विचार इशोनिषदात सांगितला आहे. मात्र या मूल्यांचा विचार होत नाही, त्यामुळे देशाचे वाटोळे केले जात आहे.
सध्या अधिकाधिक सत्ता हे साध्य बनले आहे. नीती-विचारांना बाजूला टाकले जात आहे. मूल्यांचे झरे आटत ते राष्ट्र जगू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला मूल्ये दिली. मूल्य विचारच संस्कृतीचे रक्षण करू शकेल.
अरविंद इनामदार
दि. २६ मे २०१३ – आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत, जिद्द, परिश्रम, चिकाटी आणि प्रामाणिकपणा असणे गरजेचे आहे. अपयशाने खचून जाऊ नये, प्रयत्न केल्यास हमखास यश मिळते. अपयशच यशाची पहिली पायरी असते.
हिंमत असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते. भारतीय प्रशासकीय सेवेच्या स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम चिकाटी याला पर्याय नाही.
माझ्या घरची परिस्थिती हालाखीची असल्याने शैक्षणिक प्रवास कायमच खडतर राहिला. सधन कुटुंबातील मुलेच आयएएस होतात हा समज सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी कायमच काढून टाकावा. कठोर परिश्रम व आत्मविश्वासाच्या बळावर स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होता येते. मी स्वत: सहा वेळा आयएएसची परीक्षा दिली, मग यशस्वी झालो. यशानंतरही सामाजिक बांधिलकी कायम ठेवावी.
भरत आंधळे
दि. २९ मे २०१३ – भ्रष्टाचार, महागाई आणि अन्य अनेक कारणांमुळे देशातील नागरिकांचा राजकारणावरून विश्वास उडत चालला आहे. काँग्रेस पक्षाच्या काळात ५ लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला. महागाईने उच्चांक मोडला.
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचा लोकांना चांगला अनुभव आला आहे. सन २००९ मध्ये २०६ जागा जिंकून काँग्रेस पक्ष दुसऱ्यांदा सत्तेत आला. मात्र चार वर्षाच्या काळात या पक्षाने महागाई व भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यामुळे जनतेचा रोष ओढवून घेतला.
तसेच त्यापूर्वी सन १९९९ मध्ये भाजपाचे सरकार सत्तेवर होते. त्यानंतर साडेचार वर्ष चालले असताना या पक्षानेही विश्वासार्हता गमावली होती. त्यामुळे भारतात प्रादेशिक पक्षांचा प्रभाव दिसून येतो.
सुनिल चावके