
दि. १ मे २०१० – व्याख्यानमालांची औपचारिकता बदलायला हवी. काळानुरूप काही गोष्टी बदलणे गरजेचे आहे. माणसा-माणसांतील संवाद हरवला आहे. संक्रमणाच्या काळात तंत्रज्ञानाला महत्त्व आले आहे. मात्र हे तंत्र प्रत्येकाकडे पोहचले नाही. माणसांमध्ये सुसंवाद होणे गरजेचे आहे.
मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले असले तरी हा सुवर्णकाळ आहे, असे काही म्हणता येणार नाही. ‘नटरंग’ हा परिपूर्ण चित्रपट आहे. त्याचे सकस कथानक, सुश्राव्य संगीत, समृद्ध निर्मितीमूल्ये, रंगभूषा यांचा महत्त्वाचा भाग आहे.
आजच्या काळात सामान्य माणूस देखील लिहिता झालेला आहे. सारेच काही अधोगतीला गेलेले नाही. अलीकडे माणसाने माणसाशी संवाद साधण्याचा प्रकार कमी होत चालला आहे.
सध्या चाकोरीबाहेरचे चित्रपट येत असले तरी ते व्यावसायिकदृष्ट्या फारसे यशस्वी ठरत नाहीत. मात्र नटरंग हा परिपूर्ण सिनेमा वाटतो.
अतुल कुलकर्णी
दि. २ मे २०१० – भारतात क्रांती घडविण्यासाठी घराघरात छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले पाहिजेत. देशात पुन्हा क्रांती घडवायची असेल तर तरुणांनी एकत्र यावे, परमेश्वरावर श्रद्धा ठेवावी मात्र अंधश्रद्धेपासून दूर राहावे.
आजच्या युगात प्रत्येक मातेने जिजाऊचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा तसेच मुलांसमोर शिवबाचा आदर्श निर्माण करावा. त्यादृष्टीने पुढील पिढ्या घडवाव्यात.
शिवाजी महाराजांचे राजकारण, समाजकारण, धर्मकारण समजून घ्यायला हवे. युवा पिढी भविष्यात देशाची आधारस्तंभ आहे. क्रांती करायची असेल तर या युवा पिढीने संघटित होणे गरजेचे आहे.
परमेश्वरावर डोळस श्रद्धा ठेवावी. अंधश्रद्धा नसावी. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, नरवीर तान्हाजी यांचे पोवाडे मनामनाला चैतन्य देतात.
सुरेश जाधव
दि. १० मे २०१० – काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे परंतु पाकिस्तानाला हे मान्य नाही. काश्मीरची भौगोलिक रचना ही प्रचंड डोंगराळ भाग आणि त्यातून वाहणाऱ्या अनेक नद्या अशी आहे. येथील नद्यांवर हक्क मिळवून त्यांचे पाणी मिळेल आणि त्यापासून वीज निर्मिती होईल यासाठी अनेक प्रकारच्या कारवाया करून काश्मीरवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे.
काश्मिर प्रश्नावरून सुरू असलेल्या संघर्षाचे मूळ पाण्यात दडलेले आहे. काश्मीर ताब्यात आला तर पाणी प्रश्न सुटेल, असे पाकिस्तानला वाटते.
काश्मीर ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तान नानाविध प्रयत्न करीत असला तरी भारतीय लष्कराच्या कर्तबगारीमुळे अद्याप पाकिस्तानला शक्य झालेले नाही.
विनायक परब
दि. ११ मे २०१० – कोणत्याही राजकीय पक्षाची जनतेशी बांधिलकी असायला हवी, तरच देशाचे, राज्याचे आणि जनतेचे कल्याण होते. परंतु आजच्या काळात राजकीय पक्षांमध्ये कर्तव्य भावना, उत्तरदायित्व दिसत नाही. ज्याच्याकडे सत्ता आहे ते सत्ता भोगण्यात आणि टिकविण्यात मग्न आहेत तर ज्यांच्याकडे सत्ता नाही ते सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ बघितल्यास त्यात चैतन्य होते. अशा चळवळी महाराष्ट्रात पुन्हा उभ्या राहिलेल्या दिसत नाहीत. दुष्काळ निवारणासाठी निधी येऊनही राज्यातील दुष्काळ हटत नाही.
महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग धिमा होत चालला आहे. कारण प्रशासन व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरली आहे.
हेमंत देसाई

दि. १२ मे २०१० – सांस्कृतिक अधिष्ठानाबरोबरच वैचारिक अभिसरण प्रगत भारतासाठी आवश्यक आहे. भारत महासत्ता बनवण्यासाठी प्रगत उत्पादक देश बनला पाहिजे. परंतु आपण पहिली पायरी देखील गाठलेली नाही.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत महासत्ता हेाईल ही चर्चा थांबली आहे. भारत महासत्ता होऊ शकतो, परंतु त्यासाठी भारत आजच्या संदर्भात एक प्रगत उत्पादक देश बनला पाहिजे. तो प्रगत बनला तर राष्ट्र बनेल. त्यानंतर महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही.
स्वातंत्र्यापूर्वी संस्कृतीसाठी व्यापक अभिसरण नव्हते. नेतृत्वामध्ये असलेली दुफळी त्यामुळे उद्दिष्ट साध्य होऊ शकले नाही. साहजिकच प्रगती खुंटली.
सन १८५३ मध्ये सर जमशेदजी यांनी ब्रिटिशांना एक लाख रूपये देऊन मुंबईत दर्जेदार कला महाविद्यालय स्थापन करण्याची विनंती केली. या संस्थेचे नाव सर जे जे स्कूल ऑफ इंडस्ट्री असे होते परंतु इंग्रजांनी इंडस्ट्री हा शब्द काढून टाकला. भारत उत्पादक देश व्हावा या प्रयत्नाला तेथे प्रथम खीळ बसली होती.
रवी परांजपे

दि. १३ मे २०१० – प्रत्येक व्यक्ती आपआपली आवड शोधत असतो. आवड शोधण्याची प्रक्रिया म्हणजे अभिरूची होय. जगणे सुंदर करण्याची प्रक्रिया या अभिरूचीतून सुरू होते.
शालेय जीवनात असताना पाठांतरापासून माझ्या अभिरूचीचा प्रवास सुरू झाला. चांगले पाठांतर करून ते लोकांपुढे मांडण्यातून माझ्या अभिरूचीला वेगळे वळण मिळाले.
ग्रामीण भागातून व सामान्य कुटुंबातून पुढे येताना अभिरूचीने मला वेळोवेळी बळ दिले. वक्तृत्व स्पर्धा, पाठांतर, कथाकथन, कविता सादरीकरण, एकपात्री अभिनय, एकांकिका, नाटक असा चढता क्रम मला अभिरूची ओळखता आल्याने गाठता आला.
अभिरूची ओळखल्यानंतर आपल्या क्षेत्रात उंची गाठण्याचे स्वप्न यश देऊन जाते. आपल्याला नक्की काय आवडते याचा शोध घेता यायला हवा. असा शोध मला घेता आला म्हणून मी वेगवेगळ्या क्षेत्रात थोडे फार काहीतरी करू शकलो.
किशोर कदम

दि. १६ मे २०१० – देशात स्वातंत्र्यानंतर गेल्या ६० वर्षांत झालेल्या सुधारणा या प्रामुख्याने मध्यम वर्गाच्या पुढाकाराने झालेल्या आहेत. या उलट परिस्थिती मात्र आज बघायला मिळते आहे. जनता निद्रिस्त झाल्यामुळे सामान्यांच्या प्रश्नांविषयी कुणालाच फिकीर राहिलेली नाही. जोवर भारतातल्या दारिद्र्यरेषेखालील प्रत्येक घटकाचा विकास होणार नाही, तोवर आपण महासत्ता होणार नाही.
अमेरिकेसारख्या पाश्चात्त्य राष्ट्रांनी आपल्या जीवनपद्धतील चंगळवाद पेरला आहे. हा चंगळवाद देशाच्या विकास प्रक्रियेस बाधक आहे. आयपीएल हेही चंगळवादाचेच प्रातिनिधीक उदाहरण आहे. आयपीएल म्हणजे अनीतीने वागणाऱ्या श्रीमंतांनी सामान्य जनतेच्या पैशावर खेळलेला जुगारच आहे.
भारतात ३७ टक्के लोक दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असताना क्रिकेट खेळावर कोट्यवधी रूपये खर्च केले जाता आणि हा खेळ पाहण्यात भारतीय माणूस प्रचंड वेळ वाया घालतो.
महेश म्हात्रे
दि. १८ मे २०१० – संतांनी मराठी भाषेत नव्हे तर मराठी बोलीत साहित्य निर्माण केले. हे संत साहित्य युगानुयुगे टिकणारे आणि जीवनात गोडवा निर्माण करणारे आहे. संत साहित्याचा विचार हा समाजातून उमटतो तसाच तो आध्यात्मिकतेलाही पोहोचतो. असे साहित्य समजून घेण्यासाठी साहित्याच्या अंतरंगात पोहचता आले पाहिजे.
संतांच्या साहित्यात वैश्विकतेचे भान आहे. माणसाच्या मनातील भावना व्यक्त करणारे हे साहित्य चिरंतन आणि चिरकाळ टिकते. संतांची भाषा ही हृदयाला भिडते. साहित्य निर्मितीला प्रतिभा लागते. तसेच साहित्य समजून घेण्यासाठी अंत:करण हळुवार केले पाहिजे. तसेच त्याचे वाचन केले पाहिजे तरच त्याचे आकलन होऊ शकते.
द. भि. कुलकर्णी
दि. २३ मे २०१० – कोणत्याही लेखकाने केलेले लिखाण हे प्रत्येक वाचकाला आवडेलच असे नाही. प्रत्येक वाचकाची आवडनिवड ही वेगळी असू शकते. त्यामुळे वाचकांच्या स्मृतीबरोबरच टीकेला देखील सामोरे जावे लागते.
जीवनात आपण जे काही ठरवतो ते पूर्ण होतेच असे नाही. त्यामुळे चित्रकलेची आवड असूनही मी लेखन तथा साहित्य क्षेत्रात आले. भरपूर वाचन करताना समज वाढत गेली मग त्यातून लिखाण सुरू केले.
काळानुरूप साहित्यात बदल होतच राहणार. वास्तववादी लिखाण करताना काही प्रश्न हे भावनेने आणि तीव्रतेने मांडणे अपेक्षित असते. आजच्या काळात सामाजिक साहित्याचे विषय देखील बदलले आहेत. समाजातील प्रश्नांचे जे वास्तव आहे ते साहित्यात उमटायला हवे म्हणून मी तसा प्रयत्न केला आहे.
कविता महाजन
दि. २५ मे २०१० – देशाच्या विकासाचे मुख्य केंद्र स्त्री आहे यामुळे भारतीय संस्कृतीत स्त्रीच्या आचार-विचारांना विशेष महत्त्व आहे. स्त्री वर्गाने आचार-विचारांची उंची गाठत जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघावे.
घराचा, कुटुंबाचा, शहराचा, गावाचा, राज्याचा, देशाच्या विकासाचा भार समाजाने महिलांच्या खांद्यावर टाकला आहे. या महिलांनी तो स्वीकारला आहे. त्यांना योग्य साथ देणे हे पुरूषांचे कर्तव्य आहे.
आजच्या काळात सगळीकडे मोठी वृक्षतोड सुरू आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. प्रत्येक व्यक्तीने घरासमोर एकतरी तुळशीचे व कडूलिंबाचे झाड लावण्याचा संकल्प केला आहे.
तुळस औषधी असून वातावरण शुद्ध करते. ऑक्सिजन देणारी तुळस स्वाईन फ्ल्यू सारखा आजार नष्ट करते. तिला भारतीय संस्कृतीत खूप महत्त्व आहे. झाडे लावा, झाडे वाढवा तसेच पाणी म्हणजे जीवन – थेंब थेंब पाणी वाचवा.
चंदाबाई तिवाडी
दि. २९ मे २०१० – आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विज्ञानाच्या प्रगतीची अनेक दालने खुली झाली आहेत. परंतु अद्यापही मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे (मिडिया) महत्त्व टिकून आहे. प्रसिद्धी माध्यमांमुळेच देशातील अनेक प्रश्नांना वाचा फुटते.
स्वातंत्र्यपूर्व काळात प्रसिद्धी माध्यमांनी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यानंतरच्या काळातही प्रसिद्धी माध्यमे समाजाच्या समस्या तडीस लावण्यासाठी प्रयत्नशील राहिली. म्हणून आजही त्यांचे महत्त्व टिकून आहे.
प्रसार माध्यमांच्या नकारात्मक बाबींवर बोट ठेवण्याची मनोवृत्ती समाजात बळावली आहे. प्रसंगी योग्य भूमिका मांडणारी विधायक बाबींवर प्रकाशझोत टाकणारी माध्यमेही समाजात आहेत. अशा माध्यमांना समाजाने समर्थन देणे गरजेचे आहे. पत्रकाराने आपले नैतिक कर्तव्य विसरू नये.
राजीव खांडेकर
दि. ३१ मे २०१० – वसंत व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रवीशंकर यांचे शिष्य व ख्यातनाम गायक विक्रम हाजरा यांच्या अभंग गायनाने श्रोते तल्लीन झाले होते.
माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी, ओम हर ओम, शिव ओम हर हर, साई की नगरी या सारखी अनेक गीते गायक विक्रम हाजरा यांनी सादर केली.
कधी हर हर भोलेचा गजर, तर कधी जय दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, अशी शक्तीची आराधना, कधी साईचे अंत:करणाला पावन करणारे गीत तर कधी श्रवणेंद्रियांना सर्वसुखाची गोडी देणारे संगीत अशाप्रकारे हाजरा यांच्या भक्तिगीत मैफलीने नाशिककरांना मंत्रमुग्ध केले होते.
विक्रम हाजरा
दि. १ मे २०११ – छत्रपती शिवरायंनी मोगलांशी झुंज देऊन स्वराज्याची स्थापना केली म्हणून आज आपण अत्यंत अभिमानाने महाराष्ट्राचा ५१ वा वर्धापनदिन साजरा करू शकतो. शिवाजी महाराजांचे स्फूर्तिदायक जीवन चरित्र कायम स्मरणात ठेवून त्यांच्या कर्तृत्वाबद्दल भारतीयांनी ऋणी राहिले पाहीजे.
मोगलांनी सर्वत्र उच्छांद मांडला असताना जिजाबाईच्या पोटी शिवबांचा शिवनेरीवर जन्म झाला. शिवरायांचे मूळ कूळ राजस्थानामधील आहे. १२व्या शतकातील देश वैभवात होता. दह्या-दुधात न्हाऊन निघालेल्या या महाराष्ट्रातील आजची परिस्थिती मात्र बिकट आहे. मात्र शाहिराच्या शिवगीतांमधून शिवशाही उभी राहते. अशी शिवशाही घडविण्याचे आता पुढच्या पिढीच्या हातात आहे.
विजय तनपुरे
दि. ३ मे २०११ – संत एकनाथ महाराजांचे भारूड, संत तुकडोजी महाराज यांचे अभंग, वासुदेवाचे गीत, विविध भक्तिगीते आणि खंजिरीचा खणखणीत आवाज याद्वारे साक्षरता, अंधश्रद्धा निर्मूलन, कुटुंबनियोजन आदिंबाबत समाज प्रबोधनाचे कार्य खंजिरीसम्राज्ञी मीराताई उमप यांनी केले.
गणराज गजनाना, नाचत यावे बांधून पैंजणा, भक्तीची देवाने कसोटी घेतली, अरे देवा इंद्रायणी थांबली, सांगा मी काय करू, भक्ती करू की पोट भरू आदि अभंग, गवळण, भारूड तसेच वासुदेव गीतातून साक्षरता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
तसेच रामप्रहरी वासुदेव आला, ‘धरीला पंढरीचा चोर’ हे भक्तिगीत सादर केले.
मीराताई उमप
दि. ८ मे २०११ – कोणताही माणूस वाईट नसतो तर परिस्थितीमुळे तो तसा होतो. मीही तत्कालीन परिस्थितीमुळे डाकू झालो. मात्र त्या १४ वर्षाच्या काळात मला कधीही शांत झोप लागली नाही.
चंबळच्या डोंगरात वास्तव्य करीत असताना प्रजापिता ब्रह्मकुमारीमुळे जीवनात परिवर्तन झाले. प्रत्येक व्यक्तीत सुप्त असलेला विवेकरूपी प्रकाश त्याला योग्य मार्गावर चालण्यास मदत करतो.
१९५८ मध्ये वयाच्या २७व्या वर्षी निवडणुकीत मला कारण नसताना मारहाण झाल्याने डाकू मानसिंहच्या टोळीत सामील झालो. माझ्यावर अन्याय करणाऱ्या २ जणांना गोळ्या घातल्या. मात्र दरोड्याच्या पैशातून गोरगरिबांच्या मुलामुलींचे विवाह लावले, शाळेला मदत केली, अडलेल्यांना पैसे दिले पण समाधान लाभत नव्हते. आमच्या सरकारने बक्षीस ठेवले. पकडलो गेला तर फाशी होणार होती परंतु १९७२ मध्ये विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांच्या कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पणाचा सल्ला दिला. मला नवा जन्म मिळाला अन् वयाच्या ८२ व्या वर्षी प्रजापिता ब्रह्मकुमारी साधकाचे काम करीत आहे.
राजयोगी पंचम

दि. १० मे २०११ – आपला भारत देश भ्रष्टाचार मुक्त व्हावा म्हणून अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनात त्यांचा संघर्ष व रचनात्मक काम यांचा मिलाफ जनतेला भावला. प्रत्येकाला आपल्या मनातील भावना व्यक्त झाल्याचे समाधान लाभले. त्यामुळेच अभूतपूर्व प्रतिसाद या आंदोलनात मिळाला.
जगाला चारित्र्याचे धडे देणारा आपला देश आज मात्र भ्रष्टाचारामुळे रसातळाला जाईल की काय अशी भीती सामान्य माणसाला वाटत होती.
घोटाळ्यांमुळे हा देश काहीच करू शकत नाही असे वाटत असताना अण्णा हजारे सारख्या सामान्य माणसाने एक लढा दिला त्यामुळे देशातील जनतेला एक दिशा मिळाली. त्यामुळे जनतेचा लोकशाहीवरील विश्वास वाढला.
जनलोकपाल विधेयकाची मूळची कल्पना ही अरविंद केजरीवाल यांची असून अण्णा हजारे, शांतीभूषण, स्वामी अग्निवेश, संतोष हेगडे, किरण बेदी यामुळे या विधेयकाला एक वलय प्राप्त झाले.
विनोद तावडे

दि. ११ मे २०११ – कायदा सर्वांसाठी समान असून सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम अशक्य नसते. युरोपात मनुष्याच्या जीवाला किंमत असून भारतात मात्र याच्या विरुद्ध चित्र दिते. प्रामाणिकपणे केलेले कोणतेही काम वाया जात नाही. त्यामुळे मोठे समाधान मिळते.
देशाची भावी पिढी जबाबदार आणि सर्व नियम कायद्याचे तंतोतंत पालन करणारी अशी निर्माण करू शकलो तर भारताची हानी टाळून राष्ट्राचा विकास गतिमान होईल. त्यासाठी कायदा सुव्यवस्था बाबत जनजागृती व मानसिकता सकारात्मक होण्याची गरज आहे.
पोलीस अधिकारी म्हणून गुन्हे शाखेत औरंगाबादला कार्यरत असताना गुन्हेगार असलेल्या नगरसेवकांना अटक केली. मोठ्या गुंडावर प्रथम कारवाई केली की बाकीचे आपोआपच गप्प बसतात.
हरिश बैजल

दि. १५ मे २०११ – जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला आणि कुटुंबाला पैसे आवश्यक असतो. त्याशिवाय चांगले जीवन जगता येत नाही. त्यासाठी मराठी माणसाने नोकरी ऐवजी उद्योग-व्यवसायाची मानसिकता जपण्याची गरज आहे.
त्याचबरोबरच काव्य, साहित्य कला यामध्ये रममाण होऊन जीवन अधिक समृद्ध करता आले पाहिजे. अनेक जणांना त्याची जाणीव आयुष्याच्या सायंकाळी येते. असे होऊ नये म्हणून अंगी बचत करून योग्य वेळी खर्च करता यायला हवा.
सरस्वती आणि लक्ष्मीची पूजा करता यावी म्हणून प्रत्येकामध्ये उद्योग करण्याची मानसिकता असली पाहिजे. मारवाडी, अग्रवाल, माहेश्वरी, जैन, राजस्थानी, सिंधी समाज आम देशाच्या कानाकोपऱ्यात उद्योग व्यवसाय करतो. उद्योग व्यवसायात नफा दिसतो पण धोका देखील पत्कारावा लागतो.
गिरीश जखोटिया
दि. २० मे २०११ – आंतरराष्ट्रीय दहशतवादी लादेनचा खात्मा झाला म्हणजे अल-कायदा संपेल व अल-कायदा संपला म्हणजे दहशतवादाचा अंत झाला, अशा भ्रमात कोणीही राहू नये.
पाकिस्तानमध्ये लपलेल्या लादेनचा ठावठिकाणा कळल्यावर अमेरिकेने पाळत ठेवून त्याला गोळ्या घातल्या. पाकिस्तानचा इतिहास हा कायम ब्लॅकमेलिंगचा आणि वारंवार अमेरिकेकडून पैसे काढण्याचा आहे.
पाकिस्तानला कायम काश्मीरचा ध्यास असून काश्मीर ताब्यात घेऊन दिल्लीवर हल्ला करण्याचे मनसुबे पाक सरकार नेहमीच रचत असते. स्वातंत्र्यकाळापासून पाक वारंवार कुरापती काढून काश्मीरवर हल्ले करत आहे. अमेरिका व चीन हे पाकला कोट्यवधी डॉलर्सची मदत करत असते. त्यामुळे पाकची हिंमत वाढत जाते.
अरविंद गोखले

दि. २१ मे २०११ – जगातील कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि दाद हाच मोठा पुरस्कार असतो. पुरस्कारासाठी काम न करता तरुणांनी नाट्यस्पर्धांमध्ये जावे, मग पदवीपर्यंत शिक्षण घेऊन आई-वडिलांच्या आशीर्वादाने स्वत:चा मार्ग स्वत:च निवडावा.
जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करावेत, कारण चांगले काम दाखविल्याशिवाय काम मिळत नाही, हे लक्षात ठेवावे.
अभिनय क्षेत्र हे मृगजळासारखे आहे, त्यात तुमच्याजवळ सहिष्णुता लागते. रंगभूमीने मला एक चेहरा दिला. त्यामुळे रंगभूमीवर काम करणे अधिक आवडते.
अभिनय करताना नाटकात खूप कस लागतो, भरत जाधव बरोबर काम करताना खूप मजा येते. मला विनोदी अभिनेत्याच्या चौकटीत अडकायचे नाही.
अभिनेता सिद्धार्थ जाधव

दि. २६ मे २०११ – जिद्द आणि चिकाटी यामुळे कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश साधता येते. तसेच आत्मविश्वासामुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते त्यामुळे पालकांनी मुलांवर फारशी बंधने लादू नयेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्यावे.
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेगळी गोष्ट असते. त्यामुळे ती व्यक्ती ओळखली जाते. आपण कोण आहोत याचा शोध लागला की, आपल्या यशाचा मार्ग सापडतो.
आता परिस्थिती व काळ बदलला आहे. मुलांना त्यांच्या पद्धतीने जगू द्यावे. मुलांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष द्यावे. नवी दिल्ली मध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी केंद्रीय स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण व्हावेत म्हणून महाराष्ट्रीयन मंडळी प्रयत्नशील आहेत.
गणेश रामदासी
दि. ३० मे २०११ – क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर राहूल द्रविड सारखी शिस्त अंगीकारण्याची गरज आहे. पूर्वी क्रिकेट मध्ये इतका पैसा नव्हता. परंतु पहिल्या आयपीएलमध्ये टाकण्यात आलेल्या प्रत्येक बॉलसाठी बॉलर (गोलंदाज) याला एक लाख रूपये मिळाले.
सेहवाग हा सुनिल गावस्कर नंतर सर्वांत चांगला फलंदाज आहे. क्रिकेटमध्ये शिस्तीला खूप महत्त्व आहे. क्रिकेटने मला भरपूर दिले. कपिलची १७५ ची विक्रमी खेळी बघायला मिळाली. गावस्करची अनेक शतके पाहण्याचे भाग्य लाभले. सुनिल गावस्करने भारतीयांना शतकाचे वेड लावले. सचिन तेंडूलकर आणि गावस्कर सारखे खेळाडू लाभणे हे भारताचे भाग्य आहे.
द्वारकानाथ संझगिरी