मनोगत पान ३

देशहिताच्‍या दृष्टिकोनातून राज्‍यघटनेचा फेर आढावा

दि. १४ मे २००० – राज्‍यघटनेचा फेर आढावा हा देशहिताच्‍या दृष्टिकोनातून घेतला जात आहे. मात्र काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष त्‍याला विनाकारण विरोध करीत आहेत. खुद्द काँग्रेसनेच घटनेत यापूर्वी १९७७ मध्ये बदल केला होता. त्‍यामुळे काँग्रेसला आता विरोध करण्याचा अधिकार नाही.

राज्‍यघटनेच्‍या फेर आढाव्‍यासाठी जो आयोग नेमला आहे, त्‍यात भारतीय जनता पक्षाशी संबंधित कोणत्‍याही व्‍यक्‍ती नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्‍यघटनेच्‍या आढाव्‍याला कधीही विरोध केला नव्‍हता. त्‍यांना या संदर्भात देशव्‍यापी चर्चा अपेक्षित होती.

राजकीय अस्‍थिरता संपवण्यासाठी तसेच दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी घटना बदलण्याची आवश्यकता आहे.

प्रकाश जावडेकर


मराठी प्रेक्षकांचे नाटकाकडे दुर्लक्ष

दि. २० मे २००० – मराठी रंगभूमीची सध्या दारूण अवस्‍था झाली आहे. सन १८४३ मध्ये रंगभूमीचा जन्‍म झाला. १९८० पर्यंतचा काळ रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. कृष्णाजी खाडिलकर, किर्लोस्‍कर सारख्या दिग्‍गजांनी तो काळ गाजवला. १९२० च्‍या सुमारास रंगभूमी अस्‍ताला जाऊ लागली होती. कारण चित्रपटांचा उदय झाला होता. मात्र रंगभूमीला पुन्‍हा जिवंत करण्याचे कार्य आचार्य अत्रे, मामा वरेरकर आदिंनी केले. मनोरंजनासह लोकशिक्षण असा तेव्‍हा नाटकाचा उद्देश होता.

कालांतराने विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, पुरूषोत्तम दारव्‍हेकर यांनी नाटकांचा चेहरामोहराच बदलला. नाट्य विषयाचा त्‍यांनी विस्‍तार केला.

अखिल भारतीय नाट्य परिषदेमध्ये सर्वच घटकांचा समावेश व्‍हावा तरच रंगभूमीवरील प्रश्न सोडवण्याचे काम होऊन काहीतरी भरीव कार्य होईल.

श्रीराम लागू


कारगील युद्धात नवा बोध घेण्याची गरज

दि. २२ मे २००० – कारगील युद्ध होण्यास काही तत्‍कालीन घटना जबाबदार असून पुन्‍हा अशी परिस्‍थिती उद्‌भवू नये म्‍हणून यासाठी आढावा घेण्याची गरज आहे. इलाजापेक्षा प्रतिबंध महत्त्‍वाचा हेच तत्त्व महत्त्‍वाचे आहे.

शांतता ही सगळ्यांच्‍या विकासासाठी महत्त्‍वाची बाब आहे. युद्धजन्‍य परिस्‍थिती निर्माण होऊ नये म्‍हणून आढावा घेण्याची गरज आहे. युद्धाचे निमित्त धरून अशा परिस्‍थितीत विचार करणे गरजेचे आहे.

भारतीय सैनिकांनी कारगील युद्धात अत्‍यंत प्रतिकूल परिस्‍थितीत विजय मिळवला. आठ ते दहा-बारा हजार फूट उंचीची शिखरे प्रचंड बर्फ आदि अनेक अडचणींवर मात करून त्‍यांनी विजय मिळवला आहे. नागरिकांच्‍या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी देशाच्‍या सीमेवर शांतता नांदणे आवश्यक आहे.

कर्नल रमेश वाघमारे


व्‍यंगचित्राच्‍या माध्यमातून समाजमनाच्‍या कोंडमाऱ्याला वाट

दि. २५ मे २००० – व्‍यंगचित्र हे व्‍यक्‍त होण्याचे एक सशक्‍त माध्यम आहे. व्‍यंगचित्राच्‍या माध्यमातून समाजमनाच्‍या कोंडमाऱ्याला वाट करून देण्याचे काम करण्यात येते. व्‍यंगचित्र ही एक भाषा असल्‍याने सामान्‍य माणसांपर्यंत पटकन पोहोचते.

व्‍यंगचित्रातून विनोद व्‍यक्‍त करता येतो. तसेच भावना देखील मांडता येतात. मी व्‍यंगचित्रातून मान्‍यवरांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

पूर्वीच्‍या काळी पुण्यात हसणे हे पाप समजले जात असे. अशा परिस्‍थितीत मी माझ्या मनातल्‍या सुप्‍त गुणांना चित्रातून वाट मोकळी करून दिली. सुरुवातीला मी नाटके देखील लिहिली. नंतर मात्र व्‍यंगचित्राकडे वळालो. सहज काढलेली व्‍यंगचित्रे खोडकर स्‍वभावाची असतात तर दैनिकांतील व्‍यंगचित्रे ही मनाचा कोंडमारा व्‍यक्‍त करतात.

मंगेश तेंडुलकर


बदलत्‍या परिस्‍थितीत संवेदनाक्षम प्रेक्षकांची गरज

दि. २६ मे २००० – बदलत्‍या परिस्‍थितीत अतिशय संवेदनाक्षम प्रेक्षकांची गरज आहे. सध्याच्‍या मराठी कलावंतांमधून शिस्‍तप्रियता आदि गुणांचा लोप होत चालला आहे. मराठी प्रेक्षक देखील चांगले मराठी चित्रपट सोडून टाकाऊ हिंदी चित्रपट बघत आहेत.

दूरदर्शनवर बातम्‍या देत असताना मी चित्रपटाची आवड असल्‍याने या क्षेत्रात अचानक आले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ‘चौकटराजा’ चित्रपटाला बक्षीस मिळावे असा ध्यास असताना या चित्रपटाने माझ्या व्‍यक्‍तिमत्त्वात बदल घडत गेला.

चित्रपट क्षेत्रात पदार्पण केल्‍यावर मला तळवलकर घराण्याने संपूर्ण पाठिंबा देऊन सहकार्य केले. ‘तू तिथे मी’ आणि ‘कळत नकळत’ सारख्या चित्रपटांच्‍या माध्यमातून मला देखील खूप काही शिकता आले.

स्‍मिता तळवलकर


लावणीला प्रतिष्ठा लाभत असल्‍याचे समाधान

दि. ३० मे २००० – काही वर्षांपूर्वी ‘लावणी’ हा शब्द बोलण्यास उच्‍चभ्रू समजली जाणारी मंडळी तोंड वाकडे करत असत परंतु आता लावणीला सर्व स्‍तरामधून प्रतिष्ठा मिळत आहे.

आईवडिलांचा तमाशाचा फड होता त्‍यामुळे वयाच्‍या आठव्‍या वर्षापासून मी तमाशात माईक समोर उभे राहून गात असे. शिक्षण फारसे झालेच नाही, पण प्रेक्षकांचे मनोरंजन आणि समाजप्रबोधन हा माझा कार्यक्रमाचा हेतू आहे.

लावणीला आता महिलावर्ग देखील येऊ लागला आहे. तमाशा, संगीत पार्टी आणि रंगमंचीय प्रयोग यात फरक असतो.सन १९९८ च्‍या मुंबईतील लावणी महोत्‍सवात माझ्या नावाला प्रतिष्ठा मिळाली. तेथून माझ्या यशाचा प्रवास सुरू झाला. ‘नटरंगी नार’ कार्यक्रम प्रेक्षकांना भावला.

‘या रावजी बसा भावजी’ ही लावणीतील अदाकारी बघून संगीतकार नौशाद यांनी कौतुक करून शाबासकी दिली होती.

सुरेखा पुणेकर


कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी वेळ लागतो, सहनशीलता हवी

दि. १ मे २००१ – मी अमर उपाध्याय असलो तरी ‘क्‍योकी साँस भी कभी बहु थी’ या मालिकेत मला ‘मिहिर’ ची भूमिका साकारावी लागल्‍याने मी आता सर्वत्र मिहिर म्‍हणूनच परिचित झालो आहे. ही मालिका मला नशिबाने मिळाली. पदवी मिळाल्‍यानंतर नऊ-दहा वर्षानंतर संघर्ष संपला असून मी आज स्‍थिरावलो आहे. चित्रपटात भूमिका मिळण्याची खात्री नव्‍हती. मित्राने मालिकेमध्ये काम करण्याचा प्रस्‍ताव मांडला. अनेक युवकांमधून माझी निवड झाली.

जीवनातील सर्व चढ-उतार सहन करीत लोकांकडून माहिती अनुभव घेत आज लोकांच्या प्रेमामुळे टिव्‍ही मालिकेच्‍या माध्यमातून लोकप्रिय झालो आहे. ‘क्‍योकी साँस भी कभी बहु थी’ मालिकेत माझा मृत्‍यू झाला तेव्‍हा वास्‍तवात मी जिवंत असताना घरातील लोक मालिका पाहून रडत होते.

अमर उपाध्याय – (क्‍योकी साँस भी कभी बहु थी मालिकेतील ‘मिहिर)


यशवंतराव चव्‍हाण यांच्या परंपरेची जपणूक व्‍हावी

दि. २ मे २००१ – महाराष्ट्रात चाळीस वर्षांत सेवेची, समर्पण भावना लयास जात आहे. समाजसेवची, परिवर्तनाची पकड ढिली होत आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक चारित्र्य हरवत चालले आहे. यशवंतरावांच्‍या परंपरेची जपणूक आवश्यक आहे.

यशवंतराव चव्‍हाण यांनी अखंड महाराष्ट्राची जडणघडण केली. यशवंतरावांनी अल्‍प उत्‍पन्‍नाच्‍या पालकांच्या पाल्‍यांना मोफत शिक्षण व गावागावात सत्ता नेण्याचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबविला. यशवंतरावांनंतर शेतकऱ्यांमधून आलेले वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला अन्‍नधान्‍याच्‍या दृष्टीने स्‍वयंपूर्ण केले. शरद पवार यांनी उद्योग, रोजगार वाढविण्यासाठी मुख्यमंत्री पदावर असताना कार्य केले. सध्या विलासराव देशमुख राज्‍याला पुढे नेत आहेत. महाराष्ट्राला सेवेची आणि त्‍यागाची परंपरा आहे.

मधुकर भावे


देशाच्‍या आर्थिक सुरक्षेला प्राधान्‍य देण्याची गरज

दि. ३ मे २००१ – आपल्‍या भारतीय संस्‍कृतीत वेदांमध्येही खाद्यान्‍न व पाण्याच्‍या सुरक्षिततेला प्राधान्‍य देण्यात आले आहे. त्‍यानुसार देशाच्‍या आर्थिक सुरक्षेला अगोदर प्राधान्‍य देण्याची गरज आहे. सैन्‍य शस्‍त्र खरेदीवर करोडो रुपये खर्च करण्या अगोदर ग्रामीण भागाच्‍या विकासाला महत्त्‍व देण्याची आवश्यकता आहे.

सध्या एकमेकांच्या द्वेषावर राजकारण चाललेले आहे. या देशातील जनताच उद्धार करू शकते. गाव स्‍वावलंबी झाले तर देशही स्‍वावलंबी होईल. देशातील ऊर्जा सुरक्षाही तितकीच महत्त्‍वाची आहे.

देशाची अर्थव्‍यवस्‍था ज्‍या शेतकऱ्यांवर उभी आहे ते शेतकरी आज आत्‍महत्‍या करीत आहेत. देशातील नागरिकांच्या मनांचे विभाजन झाले तर या देशाची सुरक्षितता टिकू शकणार नाही.

सध्या देशात एकमेकांच्या द्वेषावर राजकारण चाललेले आहे. या देशाचा उद्धार या देशातील जनताच करू शकते. गाव स्‍वावलंबी झाले तर देशही स्‍वावलंबी होईल.

विष्णू भागवत


कोणतेही ध्येय जीवनात तपश्चर्येविना अशक्‍य

दि. ४ मे २००१ – कोणतेही ध्येय तपश्चर्येविना शक्‍य नाही. लता मंगेशकर गीत गायन करते ती एक तपश्चर्याच असते. साहित्‍य, ललित कलेतून माणसाला ओलसर काळीज लाभते. साहित्‍यातून मला लाभलेली ही श्रीमंती बालपणी मला नाशिकने मिळवून दिली.

आजच्‍या काळात घराघराला प्रसार माध्यमांचे कुलूप लागलेले आहे. पूर्वी आई-वडील, आजी-आजोबा समवेत गोलमेज परिषदेसारखे जेवण करायला बसत असत. आता याउलट जेवण करताना टिव्‍ही समोर एक-एक जण बसतात.

पालकांकडून मुलांवर लहानपणा-पासूनच संस्कारांची गरज असून मुलांना लहानपणीच माणसांमधील हिमालय दाखवला पाहिजे. आजची शिक्षण पद्धतीही वस्‍तुनिष्ठ स्‍वरूपाची बनली आहे. गुणवत्ता यादीला फाजील महत्त्‍व दिले जात असल्‍याने पालक-विद्यार्थी मनोरूग्ण बनत आहेत.

प्रवीण दवणे


उदारीकरण, जागतिकरणाने औद्योगिकीकरणाला चालना

दि. १५ मे २००१ – योग्य पद्धतीने आणि दूरदृष्टीने नियोजन केल्‍यास उदारीकरण हे देशाला वरदान ठरू शकते. तसेच बौद्धिक विकास साधून स्‍पर्धेच्‍या युगात मोठ्या ताकदीने प्रवेश केल्‍यास जागतिकीकरण आपल्‍यासाठी वरदान ठरू शकते.

नवीन उद्योगपर्वाचे जनक म्‍हणून राजीव गांधी यांच्याकडे बघावे लागेल. मनमोहन सिंह अर्थमंत्री असताना त्‍यांनी मुक्‍त अर्थव्‍यवस्‍थेचा पुरस्‍कार केला.

शिक्षणानीतीत परिवर्तन आणून सॉफ्टवेअर उद्योगाला चालना दिल्‍यास जागतिकीकरण देशाला वरदान ठरू शकते. जागतिकीकरणाला विरोध करण्याऐवजी देशातील साधनसंपत्ती, युवा पिढीची गुणवत्ता, कार्यक्षमता यात वाढ करणे गरजेचे आहे. करोडोंचे मनुष्यबळ आमच्‍या हातात आहे, या संपत्तीचा योग्य वापर केला पाहिजे.

अमरीश पटेल


उदारीकरणामुळे देशाच्‍या गरिबीत वाढ

दि. १६ मे २००१ – उदारीकरणाच्‍या धोरणामुळे देशातील उद्योगधंदे बंद पडून बेकारीत आणि पर्यायाने गरिबीत वाढ झाली आहे. उदारीकरणाच्‍या माध्यमातून आपले सरकार युरोप आणि अमेरिकेला खूश करत आहे.

स्‍वातंत्र्यानंतर देशाचा विकास कोणत्‍या मार्गाने करायचा याबाबत दोन विचारप्रवाह होते. स्‍वदेशी व स्‍वावलंबनाच्या माध्यमातून विकास करावा असे महात्‍मा गांधी, जयप्रकाश नारायण यांचे मत होते तर युरोपीय देशाच्‍या मदतीने आपला विकास करावा, असे पंडित नेहरू, व्‍ही. जे. कृष्णमेमन आदिंची मते होती. स्‍वातंत्र्यानंतर स्‍वदेशीचा विचार मागे पडला.

स्‍वातंत्र्यानंतर देशाला जागतिक बँकेकडून कर्ज घ्यावे लागले. त्‍यानंतर वारंवार असे कर्ज घेण्याची वेळ आपल्‍या देशावर येत आहे. जागतिक बँकेकडून कर्ज मिळाविण्यासाठी भारताला रुपयाचे अवमूल्‍यन करावे लगले होते.

राजीव दीक्षित


महाराष्ट्राची सांस्‍कृतिक जडणघडण टिकवण्याची गरज

दि. १८ मे २००१ – महाराष्ट्राची संस्‍कृती ही अमूर्त संकल्‍पना असून मराठी जनमानसाचे जीवन तिचे सांस्‍कृतिक रूप आहे. सांस्‍कृतिक जडणघडणीच्‍या वन, ग्राम व नागर संस्‍कृतीपैकी वन संस्‍कृतीचा धागा अजूनही अन्‍य दोघा संस्‍कृतीपासून लोकजीवनापासून तुटलेला आहे. त्‍यामुळे महाराष्ट्राच्‍या सांस्‍कृतिक परंपरेला मर्यादा पडतात.

व्‍यक्‍तीकेंद्री जीवनपद्धती आणि त्‍यातून असलेले तुटलेपण हे जडणघडणीपुढे असलेले मोठे आव्‍हान आहे. संत-कवींनी केलेल्‍या महाराष्ट्राच्‍या वर्णनावरून एकजिनसी महाराष्ट्राचे दर्शन घडते. मात्र वनसंस्‍कृती अद्यापही शहरी व ग्रामीण संस्कृतीपासून दूर असून त्‍यांना शहरात काय चालले, सरकार म्‍हणजे काय हे पुरेसे माहीत नाही तर दुसरीकडे ग्रामीण संस्‍कृती नष्ट होत आहे.

सुधीर निरगुडकर


मानसिक तणावामुळेच हृदयविकाराचे प्रमाण वाढले

दि. १९ मे २००१ – हृदयातील रक्‍तपुरवठा करणाऱ्या धमन्‍यांमध्ये अडथळा उत्‍पन्‍न झाला तर हृदयविकाराचा झटका येतो. अनुवंशिकता आणि मानसिक ताणतणावामुळे हृदयविकाराचा धोका बळावतो. हृदयविकार टाळण्यासाठी माणसाने नियमित व्‍यायाम करणे आवश्यक आहे. तसेच नियमित शारीरिक तपासणी करणे देखील आवश्यक आहे.

हृदयाच्‍या झडपांचा रोग हा प्रामुख्याने तणावग्रस्‍त माणसामध्ये अधिक होतो. अनुवंशिकता व मानसिक तणावामुळे हार्टॲटॅक येण्याचे प्रमाण वाढते आहे. मधुमेहही हृदयविकराचा झटका येण्यास कारणीभूत ठरतो. मधुमेह हा कर्करोगापेक्षा वाईट रोग आहे. त्‍यावर अजून रामबाण उपाय सापडलेला नाही. स्‍त्रिया सहनशील असल्‍याने त्‍यांच्‍यात हार्टॲटॅकचे प्रमाण कमी आहे.

डॉ. नितू मांडके


जाहिरात कंपन्‍याचे वर्तमानपत्रावर नियंत्रण असल्‍याने जनतेच्‍या प्रश्नांकडे दुर्लक्ष

दि. २० मे २००१ – वृत्तपत्र हे जनतेच्‍या प्रश्नाला वाचा फोडणारे सशक्‍त माध्यम असले तरी सध्याच्‍या काळात विविध प्रकारच्‍या उपभोग्य वस्‍तू निर्माण करणाऱ्या कंपन्‍या आणि विविध जाहिरात कंपन्‍या यांची अभद्र युती वर्तमानपत्रांवर सूक्ष्म नियंत्रण ठेवत आहे. त्‍यामुळे जनतेच्‍या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.

पत्रकारांनी केवळ बातमीचा वेध घेतला पाहिजे, बातमी व्‍यतिरिक्‍त मतप्रदर्शन करणे टाळावे. वर्तमानपत्रांनी राजकीय विचारसरणीचा अवलंब करू नये. पत्रकार आणि राजकीय नेत्यांमध्ये निव्‍वळ मैत्री होऊ शकत नाही. मैत्री की व्‍यवसाय असा विचार करताना प्रथम पत्रकारिता निवडावी कारण राजकीय नेते सर्व बाबतीत राजकारण मोजतात.

अंबरिश मिश्र


कुमार गंधर्वांकडून नव्‍या संगीताची घडण

दि. २३ मे २००१ – कुमार गंधर्वांचे खरे गाणे देवधरांकडे फुलले. आपल्‍या आजारपणाच्‍या काळात कुमार गंधर्वांनी लोकगीतांचा अभ्यास करून रागांचे संशोधन केले. कृष्णराव कोल्‍हापुरे, चिंतामणराव कोल्‍हाटकर व दीनानाथ मंगेशकर यांची संगीत कंपनी होती.

सुरांची अमाप साठवण असलेल्या कुमार गंधर्वांनी रागांमध्ये संशोधन करून अनेक बंदिशींचा खजिना रसिकांसाठी भरून ठेवला. मास्‍टर दीनानाथ मंगेशकर यांचा भाचा आणि चिंतामण कोल्‍हाटकर यांच्या सान्निध्यात आपल्‍या संगीत शिक्षणाला सुरुवात झाली. हळूहळू मास्‍टर दीनानाथ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याबरोबर नाटकात सहभाग वाढविला. दीदींबरोबर मी ‘पुण्यप्रभा’ या नाटकात युवराजाची भूमिका साकारत होतो.

पंढरीनाथ कोल्‍हापुरे


जागतिकीकरणात आजचा शेतकरी उद्याचा शेतमजूर

दि. २४ मे २००१ – जागतिकीकरणात आजचा शेतकरी हा उद्याचा शेतमजूर होत आहे. जागतिकीकरण ही आपत्ती नसून एक संधी आहे, असे वाटत होते. परंतु ती एक संधी नसून अपत्‍य आहे. म्‍हणजे त्‍याचा सर्वांना सांभाळ करावा लागणार आहे. म्‍हणजे त्रास वाढणार आहे. जागतिकीकरणानंतर सरकारकडून शेतकऱ्यांना सवलती व सुविधा देण्याची, वाढण्याची गरज आहे. परंतु ते घडताना दिसत नाही.

परदेशात जागतिकीकरणात खतांच्या किंमती कमी होताना दिसतात आणि शेतमालाला विशेषत: भाताला भाव दिसून येतो. या उलट भारतात खतांच्‍या किंमती प्रचंड असून भाताला म्‍हणजे शेतकऱ्यांच्‍या मालाला भाव नाही. त्‍यामुळे शेतकरी हा अधिक कर्जबाजारी होऊन आत्‍महत्‍या वाढू शकतात.

प्रा. एन.डी. पाटील


पर्यावरण संतुलनासाठी शाकाहार आवश्यक

दि. २९ मे २००१ – पर्यावरणाच्‍या संतुलनासाठी शाकाहार आवश्यक आहे. शाकाहार हा योगाचा मार्ग आहे, तर मांसाहार हा रोगाचा मार्ग आहे. शाकाहारासंबंधी समाजात गैरसमज आहेत. तसेच निरपराध प्राण्यांची हत्‍या करून मानव आपली उपजीविका का करतो याचे कोडे उलगडत नाही.

मानवाची शरीररचना शाकाहारी प्राण्यांसारखी आहे. जे प्राणी ओठांनी पाणी पितात ते शाकाहारी व जे प्राणी जिभेने पाणी पितात ते मांसाहारी अशी साधी सोपी व्याख्या आहे.

परदेशातील लोक शाकाहारकडे वळत आहेत. राजकीय लोकांनी मदत केली तर सर्व लोक शाकाहारी होतील. प्राण्याची कत्तल थांबली तर जगात सुखशांती लाभेल.

रतनलाल बाफना


महाभारतातील खरा नायक युगंधर श्रीकृष्णच

दि. ३० मे २००१ – महाभारतातील शेकडो व्‍यक्‍तिरेखा या पंचमहाभुतांच्या अजब रसायनातून घडलेल्‍या आहेत. मात्र श्रीकृष्ण ही व्‍यक्‍तिरेखा युगायुगाने धारण करावी तशी जीवनतत्त्वे प्रत्‍यक्ष आयुष्यात धारण करणारी खऱ्या अर्थाने युगंधर आहे. श्रीकृष्ण व्‍यक्‍तिरेखा ही केवळ तत्त्वज्ञान सांगून थांबत नाही तर तो स्‍थितप्रज्ञ असतो कसा, वागतो कसा हे प्रत्‍यक्ष जगून दाखविणारी आहे.

श्रीकृष्णाच्‍या जीवनक्रमाचे गोकुळा-तला बाळकृष्ण, मथुरेतला योद्धा, अन्‌ समरांगणावरचा तत्त्‍वचिंतक असे तीन टप्‍पे आहेत. चैतन्‍य, पराक्रम, दातृत्‍व, पौरूषत्‍व, वर्णनिर्भयता आदि बाबतींमध्ये श्रीकृष्ण व कर्ण या एकाच नाण्याच्‍या दोन बाजू असल्‍याचे आपल्‍याला दिसून येते.

शिवाजी सावंत


सत्तेच्‍या विकेंद्रीकरणाची आजच्‍या काळात गरज

दि. १ जून २००१ – शासन व प्रशासनाने प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे दैनंदिन जीवन सर्वांगाने व्‍यापलेले आहे. त्‍यामुळे सत्तेचे केंद्रीकरण होत असून सत्तेच्‍या विकेंद्रीकरणाची आज गरज निर्माण झाली आहे.

कायदा व सुव्‍यवस्‍था नीट राहावी, हक्‍क व अधिकारांवर अतिक्रमण येऊ नये ही मूलभूत अपेक्षा सर्वसामान्‍य नागरिकांची शासनाकडून असते . यासाठी आज कायदे अनेक आहेत, मात्र त्‍याची अंमलबजावणी व्‍यवस्‍थित होत नाही ही वस्‍तुस्‍थिती आहे.

प्रशासकाचे अधिकार कमी करत त्‍याचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. उद्योजक व नागरिकांना योग्य प्रशिक्षण देऊन जागतिकीकरणात त्‍यांना संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. प्रशासन पारदर्शक करून जनतेला माहिती मिळविण्याचा अधिकार दिला पाहिजे तरच सत्‌ म्‍हणजे चांगले प्रशासन जनतेला मिळेल.

द.म. सुकथनकर