मनोगत पान १

चित्रीकरणासाठी नाशिक नगरी सर्वांगसुंदर ; त्‍याचा विकास व्‍हावा

दि. १ मे १९९४ – धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्‍कृतिक वारसा लाभलेली नाशिक नगरी ही कोणत्‍याही चित्रपटाच्‍या चित्रीकरणासाठी भारतातील इतर शहरांपेक्षा सर्वांगसुंदर आहे. त्‍यादृष्टीने येथे सोयीसुविधांचा विकास व्‍हायला हवा. मला नाशिक शहर खूप आवडते.

अकरावीत असताना वडिलांनी मला गुलजार यांच्‍याकडे कामाला लावले. त्‍यानंतर त्‍यांच्‍याकडे साहाय्यक म्‍हणून काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्‍या. सुप्रसिद्ध दिग्दर्शक व्‍ही. शांताराम यांना आपण गुरू मानतो. दिग्दर्शकाला सर्व गोष्टीचे ज्ञान, माहिती आणि जाणीव हवी. हिमाँशू रॉय, बिमल रॉय, गुलजार सारखी जबरदस्‍त ताकदीची माणसे असल्‍याने मी चांगल्‍या चित्रपटांची निर्मिती करू शकलो.

दूरदर्शन हे प्रभावी माध्यम असून एखाद्या कांदबरीस तीन तासाच्‍या चित्रपटात योग्य न्‍याय देता येत नाही. त्‍यासाठी दूरदर्शन मालिका योग्य ठरते.

एन. चंद्रा


सामान्‍य माणसाच्‍या प्रगतीसाठी लोकशाही प्रणालीचा उपयोग व्‍हावा

दि. २ मे १९९४ – देशातील सामान्‍य माणसाच्‍या प्रगतीसाठी लोकशाही प्रणालीचा उपयोग व्‍हायला हवा. आजच्‍या काळात महात्‍मा गांधी यांचे विचारच देशाला तारणारे आहेत. अण्णा हजारे, टि.एन. शेषन, गो.रा. खैरनार यांच्या कृतीतून संमेलनाच्‍या भावना व्‍यक्‍त होत आहेत.

सध्या आपल्‍या देशातील पुढाऱ्यांकडून लोकशाहीचे वाभाडे काढले जात आहेत. स्‍वार्थासाठी आमदार व मंत्री हे लोटांगण घालताना दिसतात. काही कर्तव्‍यदक्ष अधिकारी हे जनतेच्‍या बाजूने त्‍यांच्या प्रश्नांसाठी कार्य करत असताना त्‍यांना निलंबित केले जाते किंवा त्‍यांच्‍या बदल्‍या केल्‍या जातात.

गॅटमुळे आपली शेती संस्‍कृती टिकणार नाही. आपला देश हा शेतीप्रधान असून जमीन, पाणी व वातावरण पोषक असल्‍याने येथील शेतीतून खरीप, रब्‍बी व हंगामी अशी तीन पिके घेता येतात. परंतु उद्योगक्षेत्राकडे जितके लक्ष दिले जाते तितके लक्ष शेतीक्षेत्राकडे दिले जात नाही हे दुर्दैव आहे.

डॉ. कुमार सप्तर्षी


गरिबांच्‍या कल्‍याणासाठी महात्‍मा गांधीच्‍या विचारांचा आधार

दि. ३ मे १९९४ – आपला देश श्रीमंत वाटत असला तरी अद्यापही देशात कोट्यवधी लोक बेरोजगारी, उपासमारी, आजारपण, महागाई, दुष्काळ, अन्‍नटंचाई, पुरेस कपडे, योग्य निवारा यांसारख्या संकटांना तोंड देत आहेत. गोरगरिबांच्या कल्‍याणासाठी आपल्‍याला महात्‍मा गांधी यांच्या विचारांचा आधार घ्यावा लागेल.

समाजामध्ये सामान्‍य माणसांची प्रतिष्ठा वाढावी, त्‍यांना समाधानाने जगता यावे हीच गांधीजी यांची इच्‍छा होती. शोषितांच्या बाजूने लढणारे ते एकमेव संत होते. त्‍यांना रविंद्रनाथ टागोरांनी ‘महात्‍मा’ तर सुभाषचंद्र बोस यांनी ‘राष्ट्रपिता’ ही पदवी दिली.

आजची लोकशाही निव्‍वळ उमेदवारशाही झाली आहे. जेथे लोकांच्या मताचा बाजार मांडला जातो तेथील काळ्या बाजारात लोकशाही विकली जात आहे. हा काळा बाजार टाळण्यासाठी महात्‍मा गांधी यांना या देशात रामराज्‍य अपेक्षित होते. त्‍यांच्‍या रामराज्‍य संकल्‍पनेत सर्व जाती, धर्मांचे लोक होते. त्‍यात बंधुभाव व श्रमप्रतिष्ठेला महत्त्‍व होते.

न्‍यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी


नागरिकांच्‍या पाठिंब्यामुळे भ्रष्टाचार विरूद्ध लढण्याचे बळ मिळाले

दि. ९ मे १९९४ – सर्वसामान्‍य नागरिकांचे प्रश्न पैसे किंवा लाच दिल्‍याशिवाय सरकार दरबारी सुटत नाहीत असा अनेकांचा अनुभव आहे. त्‍यामुळे नागरिक त्रस्‍त झाले होते. सर्वसामान्‍य जनतेच्‍या पाठिंब्यामुळेच मी भ्रष्टाचाराविरूद्ध लढाई पुकारली आहे.

शालेय जीवनापासून मी भ्रष्टाचाराविरूद्ध सतत लढत आलो आहे. केवळ बघ्याची भूमिका घेतली तर भ्रष्टाचार वाढत जातो हे सर्वांनी लक्षात ठेवावे.

मुंबईतील अतिक्रमणाविरुद्ध मी आवाज उठविण्याचे ठरविले तेव्‍हा माझ्यावर प्राणघातक हल्‍ले झाले. पण मी डगमगलो नाही. लहानपणापासून गरिबीमुळे प्रतिकूल परिस्‍थितीत शिक्षण घेतले. संघर्ष काय असतो हे माहीत होते.

मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळले जात नाहीत पण दाऊदचे आदेश पाळले जातात. आपली न्‍यायव्‍यवस्‍था पिंजलेली तर अधिकारी भ्रष्ट आहेत. मंत्री आणि अधिकारी भ्रष्टाचारी असतील तर देशाची प्रगती होऊ शकत नाही.

गो. रा. खैरनार


सर्वच क्षेत्रातील गुन्‍हेगारीमुळे राष्ट्रीयत्‍वाला धोका

दि. ११ मे १९९४ – सर्वच क्षेत्रात गुन्‍हेगारी वाढली असून त्‍यामुळे राष्ट्रीयत्‍वाला धोका निर्माण होऊ शकतो. राजकारणात देखील गुन्‍हेगारी वाढल्‍याने सर्वसामान्‍य जनतेचा विश्वास उडत चालला आहे. त्‍याच बरोबर शैक्षणिक, बांधकाम क्षेत्र, हॉटेल व्‍यवसाय, हिंदी चित्रपटसृष्टी, औद्योगिक क्षेत्र आदी क्षेत्रातही गुन्‍हेगारी वाढत चालली आहे.

देशात आणि राज्‍यात कायदा आणि सुव्‍यवस्‍था असेल तर सर्वसामान्‍य नागरिकांना सुखाने आणि शांततेत जगता येते. गुन्‍हेगारी नष्ट करण्यासाठी समाजाने जागरूक राहून कणखर भूमिका स्‍वीकारण्याची गरज आहे.

राजकारणात गुन्‍हेगारी डोकावली तर लोकशाही अयशस्‍वी ठरेल. जीवनाच्‍या सर्वच क्षेत्रात राजकारण घुसणे अयोग्य आणि घातक आहे. राजकारणातील गुन्‍हेगारी संपवली तरच चांगली लोकशाही निर्माण होऊ शकते.

गोपीनाथ मुंडे


नाट्य हा व्‍यवसाय नव्‍हे तर कला मानावी

दि. २३ मे १९९४ – नाट्य हा व्‍यवसाय नव्‍हे तर कला मानावी तरच तिची सेवा करता येते. मी नाट्यव्‍यवसायाला कला मानल्‍यामुळे लखोबा लोखंडे प्रभावीपणे सादर करता आला. नाट्याभिनय मनाला सुखावणारा, चिंतनशील बनविणारा असल्‍यामुळे मी सर्वांगाने अभिनय करीत आलो आहे.

मी प्रथमत: नट असून नंतर निर्माता दोन्‍ही भूमिका सर्वांगांनी करण्याचा मी प्रयत्‍न केला आहे. सर्वच भूमिकांना मी न्‍याय देण्याचा प्रयत्‍न केला आहे.

चांगल्‍या अभिनयातून समाजसेवेचेही काम करीत असतो. मराठी नाटके पूर्वीपासूनच समाजाचे अंतरंग उलगडत आली आहेत. मामा वररेकरांनी नाटकात जिवंत विषय हाताळल्‍यामुळे एक नवी परंपरा मराठी नाटकात निर्माण झाली आहे. ही परंपरा पुढील पिढीनेही जपायला हवी.

प्रभाकर पणशीकर


सत्तेच्‍या हत्तीला योग्य नीती- नियमांचा अंकुश हवा

दि. ३० मे १९९४ – सत्ता आणि राजकारण हे धुंदीसारखे असते. त्‍याची झिंग चढली तर सत्तेचा हत्ती मदमस्‍त होतो त्‍यामुळे राजकारणाच्‍या हत्तीला नीती-नियमाचा अंकुश घालण्याची गरज आहे.

भारतीय संस्‍कृतीत हत्ती हे मांगल्‍याचे, शक्‍तीचे प्रतीक मानण्यात येते. राजकारणाचा हत्ती पावित्र्य व मांगल्‍याची अंबारी वाहण्याच्‍या ऐवजी भ्रष्टाचाराच्‍या कर्दमात मदांध झालेल्या दुर्जनांची अंबारी वाहत आहे. राजकारणाच्‍या हत्तीला सत्तेची धुंदी चढली असून तो निरंकुश सत्ता उपभोगीत आहे. अशा भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना जुलमाचा रामराम सर्वसामान्‍य माणूस करीत आहे. त्‍यामुळे भ्रष्टाचाराला प्रतिष्ठा लाभत आहे.

लोकांच्या आत्‍म्‍यावर, चांगुलपणावर हे आक्रमण असून त्‍याचीच चिंता वाटते. भ्रष्टाचार वाढत असून लोकांचा चांगल्‍या गोष्टीवरूनही विश्वास उडत चालला आहे.

चांगल्‍या चारित्र्यवान माणसांना निवडणुकीत तिकीट द्यायला हवे, तसेच त्‍यांनाच निवडून दिले पाहिजे. पूर्वीच्‍या काळी विनोबा भावे, जयप्रकाश नारायण सारखी चारित्र्यवान ऋषितुल्‍य माणसे नीतिमूल्‍यांची जपणूक करणारी होती पण आता काळ बदलेला आहे.

विद्याधर गोखले


भ्रष्टाचार विरोधी आंदोलन हे व्‍यक्‍तीच्‍या नव्‍हे प्रवृत्तीच्‍या विरोधात

दि. ३१ मे १९९४ – भ्रष्टाचार विरोधी आंदोलन हे एखाद्या व्‍यक्‍तीच्‍या किंवा पक्षाच्‍या विरोधात नसून प्रवृत्तीच्‍या विरोधात आहे. राष्ट्र व समाज उन्‍नत करण्यासाठी तरूणांनी त्‍यात सहभागी व्‍हावे.

सामाजिक वनीकरण खात्‍यातील १७ अधिकाऱ्यांनी संगनमताने भ्रष्टाचार केला, त्‍याचे पुरावे हाती आले असता गुंता सोडविण्याचा प्रयत्‍न केला असता हा गुंता वरिष्ठांच्या पायापर्यंत अडकलेला आढळला. त्‍यामुळे ४२ दिवसांचे मौन पाळले, सहा दिवसांचे उपोषण केले, त्‍याचप्रमाणे वृक्षमित्र पुरस्‍कार व पद्‍मश्री पुरस्‍कार परत केले.

भ्रष्टाचार निपटण्यासाठी गाव पातळ्यांवर समित्‍या स्‍थापन कराव्‍यात, वेळेच्‍या आत सात-बारा उतारा मिळायला हवा.

सत्त्‍व जाणून सेवा हेच जीवनाचे ध्येय मानून कार्य करीत राहिल्‍यास देशाचे चित्र बदलता येईल. म्‍हणून भ्रष्टाचार विरोधी आंदोलन ही देखील देशसेवाच आहे.

अण्णा हजारे


वैचारिक मंथनासाठी व्‍याख्यानमालांची आवश्यकता, शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज

दि. १ मे १९९६ – विचारवंतांचे विचार समाजापर्यंत पोहचण्याचे कार्य व्‍याख्यानमालांच्‍या माध्यमातूनच होते. त्‍यामुळे वैचारिक मंथनासाठी व्‍याख्यानमाला आवश्यकच ठरतात. व्‍याख्यानमाला सांस्‍कृतिक अभिरूची जपण्याचे कार्य करतात.

विद्यार्थी आणि युवक हा आपल्‍या देशाचे भवितव्‍य घडविणारा असला तरी शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठ यांच्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. सामाजिक, सांस्‍कृतिक दृष्ट्या देश प्रबळ व्‍हायचा असेल तर दर्जेदार शिक्षणाची आवश्यकता आहे.

उच्‍च शिक्षणातील दर्जा सुधाऱण्यासाठी एकच विषय अनेक विद्यापीठात शिकवण्याची पद्धत बंद केली पाहिजे. वंचित घटकाला शिक्षणाच्‍या प्रवाहात आणावे लागेल.

कुलगुरू उत्तमराव भोईटे


धर्मग्रंथाची तपासणी होण्याची गरज

दि. ४ मे १९९६ – रूढी, परंपरा मोडून न्‍यायाच्‍या दिशेने धर्मशास्‍त्रज्ञांनी जायला हवे. परंतु अनेकदा अशा धर्मशास्‍त्रज्ञांना समाजाने साथ दिली नाही. आपण जर कठोर होऊन आपल्‍या धर्मग्रंथांची तपासणी केली तर या गोष्टी लक्षात येतील. परंतु कोणत्‍याच धर्मग्रंथांची तपासणी होत नाही. वात्‍सायन, चार्वाक, वराहमिहिर, देवळे आदि धर्मशास्‍त्रज्ञांनी समानता येण्यासाठी प्रयत्‍न केले.

वैदिक संस्‍कृतीपासून स्‍त्रिया आणि शुद्रांना समाजात स्‍थान नव्‍हते. गार्गी, मैत्रेय या सारख्या विदुषी अपवादात्‍मक दिसतात. नंतर परिस्‍थिती बदलत गेली. स्‍त्रियांना समाजात स्‍थान प्राप्‍त झाले. यात समाजसुधारकांचे योगदान आहे.

आज पुन्‍हा नैतिक अध:पतन होत असून उपभोगवादी संस्‍कृतीच्‍या वाढत्‍या प्रस्‍थामुळे स्‍त्री एक उपभोग्य वस्‍तू बनली आहे. संस्‍कृती लयास जाऊ नये म्‍हणून प्रयत्‍न हवा.

डॉ. आ. ह. साळुंके


सावित्रीबाई फुले यांचे तत्त्‍वज्ञान सामान्‍यांपर्यंत पोहोचवावे

दि. ८ मे १९९६ – महिलांच्या प्रश्नांच्‍या संदर्भात सातत्‍याने लक्ष देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे तत्त्वज्ञान काव्‍यरचना आणि कार्यप्रणाली तळागाळातील सामान्‍य माणसांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे.

आजच्‍या आधुनिक युगात स्‍त्री पुरूषांना समान संधी हे तत्त्व असले तरी त्‍याप्रमाणे समाजात आचारण होत नाही. स्‍त्रियांकडे समाजातील बहुतांश लोक भोगवादी दृष्टिकोनातून पाहत असल्‍याने समाज संस्‍कृतीचा दिवसेंदिवस ऱ्हास होत आहे. त्‍यासाठी स्‍त्रियांना संघटित होऊन अशा प्रवृत्तीच्‍या लोकांविरूद्ध बंड पुकारण्याची गरज आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन, महिलांमध्ये आत्‍मविश्वास निर्माण करणे, महिलांना सर्व क्षेत्रात संधी देणे यांसारख्या कार्याची आजही समाजात गरज आहे. सामान्‍य माणूस आणि स्‍त्रिया यांच्यावर आजही सर्वच बाबतीत अन्‍याय होत आहे.

मंगल खिंवसरा


मराठी भाषेचे संरक्षण म्‍हणजे इतर भाषांचा द्वेष नव्‍हे

दि. १४ मे १९९६ – आपली मायबोली मराठी भाषा ही समृद्ध आहे. परंतु मराठी भाषेचे संरक्षण करण्याची आज गरज आहे. परंतु मराठी भाषेचे संरक्षण करणे म्‍हणजे इतर भाषांचा द्वेष करणे नव्‍हे. भाषेचा मूळ गाभा कायम ठेवून आवश्यक तेथे परभाषिक शब्दांचा स्‍वीकार केला पाहिजे. स्‍वत:चे सुंदर शब्द विकसित केले त्‍यातच भाषेचा गौरव आहे. ज्ञानदेवांच्‍या काळापासून ते इंग्रज राजवटीपर्यंत मराठी भाषेत खूप बदल होत गेले. संस्‍कृत, उर्दू, अरबी, इंग्रजी, हिंदी अशा अनेक भाषांतील शब्दांची सरमिसळ मराठीत आली. तरीही मराठी भाषेचे सौंदर्य कायम राहिले आणि वाढत गेले. भाषा ही खळखळत्‍या नदीप्रमाणे प्रवाही हवी. भाषेचा मूळ गाभा कायम ठेवून जेथे शब्द तेथे प्रतिशब्द निर्माण करायला हवेत. तरूणांनी मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी प्रयत्‍न करावेत.

शांता शेळके


शासनाच्‍या दुटप्‍पी भूमिकेमुळे शेतकरी नेहमी संकटात

दि. २८ मे १९९६ – देशात शेतकऱ्यांचे स्‍थान महत्त्वाचे आहे. परंतु शासनाची शेतकऱ्यासंबंधी असणारी दुटप्‍पी भूमिका व त्‍यांच्‍या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शेतकरी आज संकटात सापडला आहे.

भारतात शेतकऱ्याकडे अन्‍नदाता म्‍हणून पाहिले जात होते. परंतु समाजात आज मोठ्या प्रमाणावर राजकारण, अर्थकारण निर्माण झाल्‍याने त्‍यांच्याकडेही केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच बघितले जाते ही खेदाची बाब आहे.

देशात कोरडवाहू जमिनीचा प्रश्न मोठा आहे. पाणी, वीज, खतावरील सबसिडीचा फायदा फक्‍त बागायती जमीनधारकांना मिळतो. कोरडवाहू जमीन असणारे मात्र त्‍यापासून वंचित आहेत. त्‍यांच्या घामाला दाम नाकारण्याचा प्रयत्‍न समाजात नेहमी होत आहे.

विजय जावंधिया


मराठी अस्‍मितेसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज

दि. १ मे १९९७ – संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीत जसे सर्व जण म्‍हणजे राजकीय पक्ष, धर्म-पंथ, जात-पात विसरून एकत्र आले होते. तशीच वेळ आज पुन्‍हा एकदा आली आहे. मराठी माणूस ताठ मानेने जगण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.

मराठी माणसाला जातीचा रंग चढला आहे. यामुळे आपण कमी पडू लागलो आहोत. महाराष्ट्र राज्‍य होऊन आज ३६ वर्षे लोटली तरी मराठी माणूस आणि मराठी भाषा यांचा जणू ३६चा आकडा झाला आहे. त्‍यामुळे मराठी दिवस पाळण्याची वेळ यावी ही अत्‍यंत खेदाची बाब आहे.

महाराष्ट्रात रोजगार वाढत असल्‍याने बाहेरील प्रांतांचे लोंढे वाढू लागले आहेत. त्‍यामुळे एक दिवस मराठी माणूस उपरा ठरण्याची शक्‍यता आहे. त्‍यातून पुन्‍हा संघर्ष पेटण्याची शक्‍यता आहे. याकरिता मराठी अस्‍मिता जपण्याची गरज आहे. इंग्रजी भाषा जरूर शिकली पाहिजे परंतु मायमराठीचा विसर पडता कामा नये.

रामदास फुटाणे


विनोदबुद्धीतून उत्‍कृष्ट व्‍यंगचित्राची निर्मिती शक्‍य

दि. २ मे १९९७ – व्‍यंगचित्र ही कला चित्रकलेपेक्षाही कठीण कला आहे. एकवेळ चित्र काढणे सोपे परंतु व्‍यंगचित्र काढणे खूप कठीण काम असते. व्‍यंगचित्रकाराकडे असलेल्‍या विनोदबुद्धी -मुळेच उत्‍कृष्ट व्‍यंगचित्र साकार होऊ शकते. तसेच कोणतेही चित्र काढताना तुम्‍हाला इतिहास, भूगोल यासह सर्वच सामाजिक विषयांचे ज्ञान हवे. त्‍याचप्रमाणे सद्य:स्‍थिती सामाजिक परिस्‍थितीची जाणीव हवी, निसर्गाबद्दलही माहिती हवी.

व्‍यंगचित्रकार कोणत्‍याही गोष्टीकडे सरळ बघत नाही तर त्‍या गोष्टींचा उलटसुलट सर्व बाजूने विचार करतो. तरच तो उत्‍कृष्ट व्‍यंगचित्र काढू शकतो. एखादा मोठा लेख किंवा निबंध लिहिण्यातून तुम्‍हाला जो काही संदेश द्यायचा असतो तो केवळ एका छोट्याशा चित्रातून किंवा व्‍यंगचित्रातून दाखविता येऊ शकतो. आपल्‍या देशाला आणि राज्‍याला प्रसिद्ध आणि मान्‍यवर व्‍यंगचित्रकारांची परंपरा लाभली आहे. नव्‍या पिढीने ही कला आत्‍मसात करायला हवी.

प्रभाकर झळके


संत एकनाथ यांनी धर्म सामान्‍यांपर्यंत पोहचविला

दि. ३ मे १९९७ – संत एकनाथ यांनी संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचे सूत्र तसेच धर्मसुलभ करून सर्वसामान्‍य लोकांपर्यंत पोहोचविला. तसेच धर्माच्‍या नावाखाली अनिष्ट रीतींवर कडाडून प्रहार केला. सर्व धर्मीयांमध्ये समतेचा विचार निर्माण करण्याचे काम संत एकनाथ महाराज यांनी केले. त्‍यामुळे संत एकनाथ केवळ धर्मप्रसारक नव्‍हे तर लोकशिक्षक होते.

धर्मप्रसारात एकनाथांनी ज्ञानेश्वरीचे महत्त्व ओळखले त्‍यामुळे ते ज्ञानेश्वरीचे पहिले संशोधक ठरतात. संत एकनाथ हे उत्‍कृष्ट कीर्तनकार होते. तसेच त्‍यांनी भारूड हा काव्‍यप्रकार प्रथम निर्माण केल्‍याने ते त्‍याचे जनक ठरतात. एकनाथांच्या भारूडात जैन, शीख, इस्‍लाम, शूद्र अशा अठरा पगड जाती-जमातीं मधील चित्रण आढळते.

एकनाथांनी विपुल आणि विविध विषयांवर लेखन केले. त्‍यातून विविध जाती धर्मांचे लोक एकत्र आले. त्‍यांच्यात समतेची भावना निर्माण झाली. त्‍यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केले म्‍हणून ते केवळ संत नव्‍हे तर समाजसुधारक होते.

डॉ. यू. म. पठाण


विकासासाठी लोकांनी स्‍वत:हून पुढे येण्याची आवश्यकता

दि. ६ मे १९९७ – कुठलेही शासन आपला संपूर्ण विकास प्रश्न सोडवू शकत नाही. त्‍याकरिता लोकांनी स्‍वत: पुढे येण्याची गरज आहे. सरकार हे जनतेच्‍या पैशातून निधी उभारूनच काम करत असते. छत्रपती शिवरायांसारखे कार्य करण्याकरिता शिवशाही सरकार प्रयत्‍न करत आहे.

समाजजीवनामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसे ही खऱ्या अर्थाने उपक्रमशील असतात. त्‍याच्‍या माध्यमातून विधायक काम करून घेता येईल.

राजकीय परिवर्तनातून सर्वच प्रश्न सुटणार नाहीत. कुठलाही समाज हा विचारांवर टिकून राहतो. आपल्‍या देशाला सामर्थ्यशाली व समृद्ध राष्ट्र बनवायचे आहे. त्‍याकरिता विचार करण्याची वेळ आली आहे. लोकांनी स्‍वत:हून पुढे आले तरच समाजाचे, राज्‍याचे आणि देशाचे प्रश्न लवकर सुटतील.

नितीन गडकरी


परमेश्वराने दिलेल्या बुद्धीचा परिपूर्ण वापर व्‍हावा

दि. ७ मे १९९७ – प्रत्‍येक मनुष्य हा मुळातच बुद्धिवान असतो. परमेश्वराने माणसाला बुद्धी दिली परंतु मानव या बुद्धीचा वापर फक्‍त व्‍यवहारापुरता करत असतो. बुद्धीचा परिपूर्ण आणि सर्वांगीण वापर केला तर जीवनातील तसेच समाजातील अनेक प्रश्न सहज सुटतील.

मनुष्य हा जन्‍मजातच बुद्धिमान असून फक्‍त ती बुद्धी कशी व कोठे वापरावी यावर त्‍याचे कौशल्‍य अवलंबून असते. तसेच उपासनेमुळे मनस्‍वी इच्‍छा जागृत होते. त्‍यामुळेच आत्‍मबळ काम करते.

ज्‍योतिषशास्‍त्रासह इतर शास्‍त्रांचा पाया हा अध्यात्‍म आहे. आध्यात्‍मिक ज्ञान असल्‍यास ज्‍योतिषशास्‍त्रातील निर्णय चटकन घेता येतात. या शास्‍त्राच्‍या मार्गदर्शनाने माणसाचे आयुष्य बदलू शकते. प्रत्‍येक जण अभ्यासाने प्रगती साधू शकतो.

पंडित खानझोडे


रंगभूमीद्वारे समाजात / सुसंवाद निर्माण करण्याचे काम

दि. ९ मे १९९७ – सध्या जगात झपाट्याने तांत्रिक क्रांती घडत असून सुकर दर्जाच्‍या चित्रपटांमुळे सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे. भोगवादी संस्‍कृतीमुळे मानवाचा गळा आवळला जात असताना समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे काम रंगभूमी करत आहे.

प्राचीन काळापासून श्रम केल्‍यानंतर मनोरंजनाचे साधन म्‍हणून नाटकाचा जन्‍म झाला. सध्या अनुकरणाच्‍या माध्यमातून रंगभूमीचे संक्रमण होत आले आहे.

रंगभूमीचे लोकरंगभूमी व संस्‍कृत अभिजात रंगभूमी असे दोन प्रकार असून त्‍यातून ऐतिहासिक सत्‍याची उकल होते. प्रत्‍येक प्रांतातील संस्‍कृती वेगळी असल्‍याने जनमानसावर त्‍याचा वैचारिक पगडा बसला आहे.

आधुनिक व प्रगत रंगभूमी ही पश्चिम बंगाल व महाराष्ट्रात अधिक विकसित झाली असून जगात तांत्रिक कांती वेगाने घडत आहे. समाजाला जवळ आणण्याचे सामर्थ्य रंगभूमीत आहे. रंगभूमीकडे समृद्ध वारसा आहे.

प्रा. कमलाकर सोनटक्‍के


मैत्री म्‍हणजे भरदुपारी सांडलेले रेशमी चांदणे

दि. १० मे १९९७ – मैत्री म्‍हणजे भरदुपारी सांडलेले रेशमी चांदणे, मैत्री म्‍हणजे गद्य जगण्यातील सुरेल गाणे अशी मैत्रीची महती आहे.

दूरदर्शनवरील वृत्तनिवेदक अनंत भावे, महाराष्ट्र टाईम्‍सचे कार्यकारी संपादक अशोक जैन आणि हिरे व्‍यापारी व अभिनेते श्रीकांत लागू यांनी तिरंगी गप्‍पात आपल्‍या तिघांची एकमेकांशी मैत्री कशी झाली याचे अनेक किस्‍से कथन केले.

या तिघांनी सांगितले की, मैत्रीला कोणतेही बंधन नसते. एक समान विचारांचा धागा हा मैत्रीला जोडून बांधून ठेवतो. आमच्‍या मैत्रीत काही समान घटक आहेत. आम्‍ही नानाविध विषयांवर गप्‍पा मारताना एकमेकांच्या फिरक्‍या घेतो. गप्‍पांमुळे आमच्‍या आयुष्यात अनेक थोर माणसे आली. त्‍यांना आम्‍ही भेटलो आणि त्‍यांच्याशी गप्‍पा मारल्‍या, संवाद साधला. जीवनात मैत्री करणे म्‍हणजे आनंदाचे क्षण निर्माण करणे होय असेही सांगितले.

श्रीकांत लागू / अनंत भावे / अशोक जैन


भारतातील मुस्‍लीम सर्वाधिक सुखी : सलोखा कायम राहावा

दि. ११ मे १९९७ – जगाच्‍या पाठीवरील मुस्‍लिमांपैकी भारतातील मुस्‍लीम सर्वाधिक सुखी आहेत. हिंदूबरोबर त्‍यांचे चांगले संबंध आहेत. पण पाकिस्‍तान सारखी राष्ट्रे छेद देत आहेत. यापुढेही भारतातील हिंदू-मुस्‍लीम संबंध सलोख्याचे राहावेत म्‍हणून प्रयत्‍न करण्यात यावेत.

शेजारील राष्ट्राप्रमाणे आपल्‍याच देशातील काही राजकारणी हा धार्मिक व जातीय सलोखा नष्ट करण्याचा प्रयत्‍न करत आहेत. परंतु सामंजस्‍य आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाने तोंड देणे गरजेचे आहे. समान नागरी कायदा आणायला हवा. मुस्‍लीम स्‍त्रियांना कायद्याचे संरक्षण हवे. तोंडी तलाक प्रथा चुकीची आहे.

धर्म हा राजकारणाचा पाया होऊ शकत नाही पाकिस्‍तान आणि बांगलादेश फाळणीतून हे लक्षात आले आहे. समाजा-समाजात वाद निर्माण होऊ नये म्‍हणून प्रयत्‍न व्‍हावेत. माणसात चांगुलपणा निर्माण करणारी माणसे प्रत्‍येक धर्मात तयार व्‍हावीत. लोकसंख्येला आळा घातल्‍यास गरिबी दूर होईल. काश्मीर हा भारताचा अविभाज्‍य भाग आहे.

सय्यदभाई