आमच्या विषयी

About Us ≫

वसंत व्याख्यानमाला, नाशिक
नोंदणी क्र. ई १८२/नाशिक
स्‍थापना – १९०५ पुर्न:स्‍थापना – १ मे १९२२

संस्थापक

न्‍या. महादेव गोविंद रानडे

कै. कृष्णाजी वि. वझे

१ मे २०१३ – वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटन करताना आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे समवेत बाबूलाल बंब, रतन लोंढे, संजय खंदारे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, श्रीकांत बेणी, जयप्रकाश जातेगावकर, डॉ. प्रदीप पवार, अरुण शेंदुर्णीकर आदी

नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू ठरलेल्या वसंत व्याख्यानमालेचे येत्या मे महिन्यात (२०२३) शंभरावे म्हणजे शताब्दी वर्ष साजरे होत आहे. या व्याख्यानमालेला अतिशय गौरवशाली आणि अभिमानास्पद इतिहास लाभलेला आहे.

थोर समाज सुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील रहिवासी. ते नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना सन १९०५ साली मे महिन्यात त्यांनी वसंत व्याख्यानमालेला प्रारंभ केला. सन १९०८ पर्यंत ही व्याख्यानमाला सुरू होती. पुढे न्यायमूर्ती रानडे यांची बदली झाल्यानंतर व्याख्यानमालेचे कामकाज थंडावले.

नाशिक हे थंड हवेचे ठिकाण तसेच अध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. वनवास काळात प्रभू श्रीरामचंद्रांचे नाशिकमध्ये वास्तव्य होते. राजा दशरथ हे प्रभू श्रीरामचंद्रांचे वडील, त्यांच्या निधनानंतर प्रभू रामचंद्रांनी राजा दशरथ यांच्या अस्थींचे विसर्जन नाशिकच्या गोदा घाटामध्ये केले होते. तसेच दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा देखील नाशिकच्या गोदाघाटावर भरतो. त्यामुळे नाशिकचा गोदाघाट आणि रामकुंड परिसरात हा दक्षिणेची काशी म्हणून ओळखला जातो. अशा पवित्र नाशिकमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात अनेक बाहेरगावचे मान्यवर नाशिक परिसरात वास्तव्यास येत असत.

शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी हेदेखील उन्हाळ्यामध्ये नाशिकला वास्तव्यास येत असत. त्यानिमित्ताने त्यांचे गोदा घाटावर प्रवचनांचे कार्यक्रम देखील होत असत. मे १९२१ साली त्यांचे शिष्य कृष्णाजी विनायक तथा रावसाहेब वझे यांच्याशी बोलताना शंकराचार्यांनी त्यांना नाशिक मध्ये वसंत व्याख्यानमाला पुन्हा सुरू करण्याची सूचना केली. त्यानुसार वझे यांनी आपल्या मित्रमंडळींशी चर्चा करून वसंत व्याख्यानमालेचे कामकाज पुन्हा सुरू करण्याचे ठरविले. त्यांच्या प्रयत्नांने दि. १ मे १९२२ रोजी नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेचे कामकाज पुनश्च सुरू झाले.

१ मे २०१९ – भारतीय वायुसेनेचे स्क्वॉडून शहीद निनाद मांडवगणे यांच्या वीरपत्नी विजेता मांडवगणे यांची मुलाखत घेताना अपर्णा क्षेमकल्याणी समवेत स्व. निनाद यांच्या मातोश्री सुषमा मांडवगणे, वडील अनिल मांडवगणे

डॉक्टर शंकराचार्य कुर्तकोटी यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. १ मे ते ३१ मे अशी सलग महिनाभर विविध विषयांवर व्याख्यानमाला सुरू झाली. ही परंपरा गेल्या ९९ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे.

व्याख्यानमाला ज्या देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या मंदिराच्या सानिध्यात पटांगणावर भरते त्या जागेला देखील एक वेगळा आणि प्रेरणादायी इतिहास आहे. महसूल खात्यामध्ये मामलेदार म्हणून नोकरीस असलेल्या यशवंतराव महाराज यांनी इ.स. १८७०-१८७१ या वर्षी पडलेल्या प्रचंड दुष्काळात अडचणीत सापडलेल्या गरीब आणि वंचितांसाठी आपले सगळी मालमत्ता विकून टाकली आणि सर्व लोकांमध्ये वाटून टाकली. पण दुष्काळी स्थिती पाहता ती रक्कम अगदीच कमी आहे, हे यशवंतरावांना लक्षात आल्यानंतर त्यांनी सरकारी तिजोरीतील रोख रक्कम तब्बल एक लाख २७ हजार रुपये देखील गोरगरीबांना वाटून टाकली. दुष्काळाशी सामना करणाऱ्या गोरगरीब नागरिकांना अश्या पध्दतीने सहाय्य केले. हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी येऊन तपासणी केली तेव्हा आश्चर्याची बाब म्हणजे तिजोरी मध्ये एक लाख २७ हजार रुपये जसेच्या तसे आढळून आले. यशवंतराव महाराज यांचे हे सेवाभावी काम पाहून नागरिकांनी त्यांना देवमामलेदार या पदवीने गौरविले. एखादया सनदी अधिकाऱ्याला नागरीकांनी पदवी देऊन गौरविण्यात आल्याची ही दुर्मिळ घटना आहे. यशवंतराव महाराज हे ज्या ठिकाणी राहायचे त्या नदीकाठी त्यांच्या स्मरणार्थ नागरीकांनी मोठे मंदिर बांधले तसेच त्यांच्या नावाने एक मोकळे पटांगण देखील त्या ठिकाणी आहे. नदीकाठच्या याच पटांगणात सायंकाळच्या रम्य वातावरणात या व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते.

२७ मे २०१८ – वसंत व्याख्यानमालेत वक्त्या कांचन परुळेकर (उद्योजिका, कोल्हापूर) यांचा सत्कार करताना संगीता बाफना समवेत जयश्री गरुड, अनुराधा गरुड, प्रतिभा कुलकर्णी, सौम्या शिरुरकर, श्रीकांत बेणी, चंद्रशेखर शाह आदी

स्वातंत्र्यपूर्व काळात व्याख्यानमालेचे हे व्यासपीठ देशभक्तांचे आणि क्रांतिकारकांचे विचार व्यक्त करण्याचे प्रमुख केंद्र होते. त्या काळात राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मदन मोहन मालवीय, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा सारख्या महान राष्ट्रपुरुषांनी आपले विचार मांडले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात जयप्रकाश नारायण, आचार्य विनोबा भावे, आचार्य कृपलानी, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, भारतरत्न लता मंगेशकर, भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकर या सारख्या महान प्रभुतींनी आपले ज्वाज्वल्यपूर्ण विचार या व्यासपीठावरून मांडले आहेत. वसंत व्याख्यानमालेच्या या गौरवशाली परंपरेला, वेगवेगळ्या क्षेत्रातील जवळजवळ सर्व मोठ्या मान्यवरांनी हजेरी लावून या व्याख्यानमालेला एक आदराचे स्थान प्राप्त करून दिले आहे. या व्याख्यानमालेत आपले विचार मांडण्यासाठी मान्यवर नेहमीच उत्सुक असतात.

सुरुवातीच्या काळामध्ये व्याख्यानासाठी येणारे नागरिक सतरंजीवर बसत आणि व्याख्यानांचा आस्वाद घेत. काळानुरूप या ठिकाणी आवश्यक ते बदल होत गेले आणि आता भव्य व्यासपीठ, उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था आणि श्रोत्यांना बसण्यासाठी शानदार खुर्च्या अशी सुसज्ज व्यवस्था आहे. प्रारंभी व्याख्यानमाले मध्ये अध्यात्मिक विषयावर तसेच साहित्यिक विषयावर प्रामुख्याने व्याख्यान होत. काळानुरूप विविध विषयांवर व्याख्यानांचे आयोजन सुरू झाले अगदी ब्युटी पार्लर पासून ते विविध पदार्थ बनविण्याच्या रेसिपी पर्यंतचे विषय देखील व्याख्यानमालेत चर्चिले जाऊ लागले. स्पर्धा परीक्षा, पाल्याची देखभाल असे विविधांगी विषय देखील चर्चिले जाऊ लागले. त्यामुळे व्याख्यानमालेची लोकप्रियता सातत्याने टिकून आहे. नदीकिनारी भरणारी आणि सतत महिनाभर चालणारी विद्यमान काळातील भारतातील एकमेव व्याख्यानमाला अशी नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेची ओळख आहे. या व्याख्यानमालेला दररोज किमान एक हजार श्रोते हजेरी लावतात. तसेच विविध विषयांच्या अनुषंगाने आणि वक्त्याच्या लोकप्रियतेचे नुसार श्रोत्यांच्या संख्येत वाढ होत असते. सर्वाधिक श्रोते लाभणारी देखील ही एकमेव व्याख्यानमाला म्हणून देशभरात ओळखले जाते. बाहेरगावचे अनेक जिज्ञासू श्रोते देखील मे महिन्यात खास व्याख्यानमालेतील व्याख्यान ऐकण्यासाठी नाशिकला मुक्कामी येत असतात.

२ मे २०१० – महाराष्ट्र गीतांचा कार्यक्रम सादर करताना शिवशाहीर सुरेश जाधव व सहकारी

या व्याख्यानमालेला प्रारंभापासून नाशिक नगरपालिकेचे अनुदान मिळत आले आहे. त्यानंतर नाशिक महानगरपालिका देखील अनुदान रूपाने व्याख्यानमालेला मदत करत राहिली आहे. व्याख्यानासाठी येणारे नागरिक देखील आपले योगदान नियमितपणे देत असतात. स्मृती व्याख्यान योजनेच्या माध्यमातून लाभलेले देणगीदार आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळणारे अनुदान यातून हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. अभिमानाची बाब म्हणजे आता वसंत व्याख्यानमालेचे सन २०१४ पासून स्वतःचे कार्यालय सुरू झाले आहे. त्यासाठी नाशिकच्या माजी आमदार आणि राज्याच्या माजी मंत्री शोभाताई बच्छाव यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नामदार विलासराव देशमुख यांच्याकडून पाठपुरावा करून महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे सन २०१४ पासून वसंत व्याख्यानमाला स्वतःचे कार्यालय हे उपलब्ध झाले आहे. त्यामुळे व्याख्यानमालेचे जुने अहवाल आणि यापुढे वेळोवेळी उपलब्ध होणारे कागदपत्र याचे जतन होणार आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या खासदार निधीतून व्याख्यानमालेला भव्य व्यासपीठ देखील प्राप्त झाले आहे. स्मृती व्याख्यान योजनेच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांनी काटकसर करून कामकाज केल्याने या संस्थेकडे सुमारे ४० लाख रुपयांचा निधी मुदत ठेव रूपाने उपलब्ध आहे .

नाशिक मधील वृत्तपत्र नियमितपणे व्याख्यानमालेच्या बातम्या प्रसिद्ध करतात. तसेच विविध वृत्तवाहिन्या देखील बातम्या प्रक्षेपित करता. गेल्या काही वर्षांपासून व्याख्यानांचे प्रक्षेपण स्थानिक केबल वृत्तवाहिनीच्या माध्यमात केले जाते. त्यामुळे हा व्याख्यानमालेचा प्रवास अखंडपणे सुरू आहे.

२१ मे २०१३ – वसंत व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते सेवा निवृत्त पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचा परिचय करून देताना ज्येष्ठ पत्रकार पदमा सोनी व्यासपीठावर चंद्रशेखर शाह, अभिमन्यू सूर्यवंशी, शिवाजी तुपे, वक्ते अरविंद इनामदार, बाळ देशपांडे, श्रीकांत बेणी

येत्या मे महिन्यामध्ये वसंत व्याख्यानमालेचा शताब्दी वर्ष महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा कार्यकर्त्यांचा मनोदय आहे. त्याकरिता महाराष्ट्र राज्याचे बंदरे आणि खाण विकास मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच स्वागत समिती स्थापित करण्यात आली आहे. या समितीमध्ये सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी यांचा समावेश आहे. यंदाच्या व्याख्यानमालेची वैशिष्ट्य म्हणजे, जगभरामध्ये विविध देशांमध्ये उत्तुंग कामगिरी करून भारताचे नाव अभिमानाने घडविणाऱ्या ११ व्यक्तिमत्व व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, साऊथ कोरिया, दुबई आदी देशांमधून ही मराठी व्यक्तिमत्व येणार असून आपले प्रेरणादायी विचार नाशिककरांच्या समोर मांडणार आहे. त्याचबरोबर भारताच्या विविध राज्यातील दहा वक्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. व्याख्यानमालेच्या उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमासाठी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, शरद पवार, तसेच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना व्याख्यानमालेने आमंत्रित केले आहे. त्याबरोबर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी, केंद्रीय पर्यावरण मंत्री नामदार भूपेंद्र यादव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. प्रामुख्याने तरुण वर्गाला आकर्षित करणारी व्याख्याने आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे हा भव्यदिव्य सोहळा हा नाशिककरांना निश्चितपणे आकर्षित तर करेल, परंतु त्याचबरोबर राज्याच्या विविध भागातून तसेच देशभरातून ही व्याख्यानमाला ऐकण्यासाठी जिज्ञासू श्रोते नाशिकला येतील असा आम्हाला विश्वास वाटतो.